सतीश कामत : satish.kamat@expressindia.com
उन्हाळा जवळ येऊ लागला की सर्वानाच आंबा-काजू-फणस यांसारख्या खास कोकणातील फळांचे वेध लागतात. त्यातही हापूस आंब्याचा तोराच वेगळा. पण गेल्या काही वर्षांपासून या फळाच्या उत्पादनाचे गणित इतके बिघडले आहे की, सर्वसामान्यांनी तो विकत घेऊन खाण्याची परिस्थिती निर्माण होईपर्यंत हंगामच संपून जातो.
कोकणात हापूस आंबा कसा विस्तारला?
हापूस आंब्याचा इतिहास अगदी पोर्तुगीजांशी जोडलेला असला तरी सुमारे ३०-३५ वर्षांपूर्वीपर्यंत त्याची कोकणातही फार मोठय़ा प्रमाणात, व्यापारी तत्त्वावर लागवड नव्हती. पण १९९३-९४ मध्ये शरद पवार मुख्यमंत्री असताना रोजगार हमी योजनेअंतर्गत येथे फळबाग लागवड मोहीम हाती घेण्यात आली, तेव्हापासून या फळपिकाने अशी गती घेतली की, आजमितीला रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ६७ हजार हेक्टर, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३९ हजार हेक्टरवर आंबा लागवड झाली आहे. जमीन आणि हवामानाच्या अनुकूलतेमुळे उत्पादनाचा आलेखही दरवर्षी उंचावू लागला आणि लवकरच कोकणातील पहिल्या क्रमांकाचे नगदी पीक, अशी ओळख निर्माण झाली.
नियमित पुरवठय़ाचे निसर्गचक्र कसे असते?
या फळाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, कोकणात तो एकाच वेळी सर्वत्र पिकत नाही. समुद्र किनारी भागातील अनेक बागांमध्ये आंबा लवकर तयार होतो. त्या मानाने अंतर्गत भागात त्याचे आगमन उशिरा होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध देवगडचा आंबा सर्वात आधी फेब्रुवारी-मार्च महिन्यातच बाजारात दाखल होतो. त्यामुळे त्याचा हंगामही लवकर संपतो. पण त्या पाठोपाठच राजापूर, रत्नागिरी तालुक्यांतील गावखडी, पावस, जयगड, संगमेश्वर, मंडणगडमधील बाणकोट या परिसरांतील आंबा तयार होऊ लागतो. जंगल भाग किंवा नदी किनारी परिसरातील आंबा म्हणजेच संगमेश्वर, चिपळूणमधील आंबा साधारणत: एप्रिल-मे महिन्यात पिकतो. पण त्यामुळेच, आंब्याचा एकूण हंगाम सुमारे साडेतीन-चार महिने चालू राहतो.
आंबा उत्पादनाचे वेळापत्रक का बिघडले?
गेल्या सुमारे दहा-बारा वर्षांत मात्र आंबा उत्पादनाचे वेळापत्रक कमालीचे बिघडले आहे. २००९ च्या नोव्हेंबर महिन्यात ‘फयान’ या चक्रीवादळाचा तडाखा रत्नागिरीच्या किनारपट्टीला बसला. त्या वर्षी स्वाभाविकच मोहोर धरण्यापासून सर्व टप्पे लांबत गेल्याने उत्पादनाला फटका बसला. पण त्यानंतरही गेल्या दहा-बारा वर्षांत कोकणातील वातावरण प्रचंड बदलले आहे. लांबणारा पावसाळा, कमी काळ टिकणारी थंडी आणि भाजून काढणारा उन्हाचा कडाका, असे तिन्ही ऋतूंचे विपरीत वर्तन त्याचा घात करत आहे. हे कमी होते म्हणून की काय, गेली दोन वर्षे ऐन मे-जूनमध्ये चक्रीवादळांनीही त्याला झोडपले. या बदललेल्या हवामानाचा उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. दरवर्षी कोकणातून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुमारे एक लाख पेटी आंबा वाशीच्या घाऊक बाजारपेठेत जातो. यंदा हा आकडा २१ हजारांवर अडकला. दरवर्षी पाडव्यानंतर पुढे उत्पादन वाढत जाते, परंतु यंदा तेही कमी झाले आहे.
वातावरणातील बदलांमुळे फैलावणाऱ्या कीडरोगाचेही प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षी मोसमी पावसाचा कालावधी ऑक्टोबपर्यंत लांबल्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच अपशकुन झाला. त्यानंतरही प्रत्येक महिन्यात हजेरी लावलेल्या अवकाळी पावसाने मोहोर, कणी आणि कैरीला फटका बसला. फुलकिडी, तुडतुडा, बुरशीजन्य रोगांनी बागायतदार त्रस्त झाले. यामधून सावरण्यासाठी खते, औषधांच्या फवारण्या वाढल्या. त्यामुळे उत्पादन खर्चातही वाढ झाली, पण उत्पादनात घट झाली.
यंदा सर्वसामान्य ग्राहकाला आंबा कधी?
आंब्याची प्रतीक्षा करत असलेल्या सर्वसामान्य ग्राहकासाठी या काळय़ाकुट्ट चित्राला चंदेरी किनार अशी आहे की, येत्या सुमारे १५ दिवसांत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून हापूसची आवक वाढेल, असे चित्र सध्या दिसत आहे. अवकाळी पावसानंतर वाढलेल्या तापमानामुळे आंबा वेगाने तयार होऊ लागला आहे. परिणामी, बागायतदार झाडावरील फळ काढणीकडे जास्त भर देऊ लागला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात अगदी एप्रिलच्या मध्यापर्यंत सर्वात कमी उत्पादनाची नोंद यंदा झाली आहे. त्यामुळे बाजारातील दर वधारलेले होते. पाच डझनच्या पेटीला सर्वाधिक साडेपाच हजार रुपये दर मिळत होता. तर डागी किंवा सात डझनपेक्षा अधिकच्या पेटीचा दर साडेतीन हजार रुपयांपर्यंत होता. १५ एप्रिलनंतर त्यात घसरण सुरू झाली असून ती अजून चालू आहे. हे चित्र लक्षात घेता, अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात येईल, असा कयास आहे. याचबरोबर, करोना ही बागायतदार आणि ग्राहकासाठीही इष्टापती ठरली आहे. आंब्याची सुमारे ७० टक्क्यांपेक्षा जास्त बाजारपेठ दलालांच्या हातात असते. करोनाकाळातील निर्बंधांमुळे वितरण व्यवस्थेतील हा घटक थोडय़ा प्रमाणात का होईना, बाजूला झाल्यामुळे बागायतदार थेट ग्राहकांपर्यंत पोहोचला. गेली दोन वर्षे ही प्रणाली राबवून काही बागायतदारांनी स्वतंत्र विक्री यंत्रणा निर्माण केली. राज्य पणन मंडळाच्या पुढाकाराने मोठय़ा शहरांमध्ये निर्माण केली जात असलेली थेट विक्री यंत्रणा किंवा ‘आंबा महोत्सव’ही त्याला साथ देत आहेत.
मुंबई, पुण्याव्यतिरिक्त अन्य जिल्ह्यांमध्ये हापूस प्रथमच जास्त प्रमाणात पोहोचू लागला आहे आणि तेथील व्यापारीही थेट शेतकऱ्याच्या दारात येऊ लागले आहेत.
या राजाचे भविष्य काय?
मुळात नाजूक प्रकृतीच्या या फळांच्या राजाला गेली काही वर्षे हवामान बदलाचे फटके सातत्याने सहन करावे लागत आहेत. त्यातच माणसाच्या लोभीपणापायी संजीवके (कल्टार) आणि इतर खतांच्या अतिरेकी माऱ्यामुळे अल्प काळात भरपूर उत्पादन, पण नंतर वठण्याचाही धोका याच्या नशिबी आला आहे. हवामान बदलाचे अरिष्ट टळण्याची नजीकच्या काळात तरी शक्यता दिसत नाही. अशा परिस्थितीत ‘नगदी पीक’ हे बिरुद मिरवण्यासाठी किमान उत्पादन आणि दराची हमी, हे दोन्ही निकष हा राजा गमावून बसण्याची भीती आहे.