देशभरात मक्याचा तुटवडा जाणवतो आहे. मक्याचे दर आजवरच्या उच्चांकी पातळीवर आहेत. मक्याच्या दरात तेजी का आली आणि किती दिवस राहील, याविषयी…
देशभरात मक्याच्या दराची स्थिती काय?
देशभरातील बाजार समित्यांमध्ये मक्याचा खडखडाट आहे. सरासरी १८ ते २२ रुपये प्रति किलोवर असलेले मक्याचे दर २६ ते ३० रुपयांवर गेले आहेत. २२ जुलै रोजी अमरावती बाजार समितीत मका सरासरी २,०५० रुपये क्विंटल, जळगावात २,५००, पुण्यात २,७०० आणि मुंबईत प्रति क्विंटल ३,३५० रुपयांवर गेला आहे. गेल्या वर्षी देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. त्यामुळे पेरण्या आणि मक्याची लागवड कमी झाली होती. त्यामुळे उत्पादनात घट झाली होती. मागणीच्या तुलनेत उपलब्धता कमी असल्यामुळे मक्याचा तुटवडा निर्माण होऊन दरवाढ झाली आहे.
जागतिक मका उत्पादनात भारत कुठे?
जगभरात दर वर्षी सुमारे ११,६०० लाख टन मक्याचे उत्पादन होते. मका उत्पादनात अमेरिका आघाडीवर असून, एकूण उत्पादनाच्या २५ ते ३० टक्क्यांपर्यंत अमेरिकेचा वाटा आहे. त्या खालोखाल चीन, ब्राझील, अर्जेंटिना, युक्रेन, भारत, मेक्सिको, कॅनडाचा क्रमांक लागतो. भारत जागतिक मका उत्पादनात पाचव्या, सहाव्या क्रमांकावर आहे. मक्याच्या वापरात अमेरिका, चीन, युरोपियन युनियन, ब्राझील, मेक्सिको यांच्या नंतर भारताचा समावेश आहे. जगातिक मका आयातदार देशात जपान, मेक्सिको, कोरिया, व्हिएतनाम, आखाती देश आणि स्पेनचा क्रमांक लागतो. देशात कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बिहार ही प्रमुख मका उत्पादक राज्ये आहेत. आता आंध्र प्रदेश, तेलंगण, तमिळनाडू, उत्तर प्रदेशात मका लागवडीखालील क्षेत्रात वाढ होऊ लागली आहे. देशभरात दर वर्षी सरासरी ५० लाख हेक्टरवर मक्याची लागवड होऊन सरासरी ३५० ते ३८० लाख टन मक्याचे उत्पादन होते.
हेही वाचा >>>लोक अडकले, वाहने बुडाली, वाहतूक ठप्प; पावसाने मुंबई, पुण्यातील जनजीवन कसं विस्कळीत केलं?
मक्याचा वापर कशासाठी आणि किती?
देशात दर वर्षी सरासरी ३५० ते ३८० लाख टन मक्याचे उत्पादन होते, तर देशाची मक्याची गरज सरासरी ४०० लाख टनांवर गेली आहे. आता इथेनॉलसाठी दरवर्षी ५० लाख टन मक्याचा वापर होईल, असे सांगितले जात आहे. मक्याचा वापर पशुखाद्या, साखर उद्याोग, कापड उद्याोगासाठी लागणाऱ्या स्टार्चसाठी मोठ्या प्रमाणावर होत आहे. एकूण मक्यापैकी ४७ टक्के मक्याचा वापर कुक्कुटपालन उद्याोगात कोंबडी खाद्यासाठी केला जातो. १३ टक्के मक्याचा वापर गायी-म्हशींच्या पशुखाद्यासाठी होतो. १३ टक्के वापर मानवी खाद्यापदार्थांसाठी होतो. ७ टक्के मक्याचा वापर प्रक्रियायुक्त पदार्थांसाठी होतो. १४ टक्के मक्याचा वापर स्टार्च उद्याोगासाठी होतो. सहा टक्के मका निर्यातीसह अन्य उद्याोगांत वापरला जातो. कुक्कुटपालन उद्याोगात मका अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याने या दरवाढीमुळे कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत आला आहे.
इथेनॉल निर्मितीसाठी मक्याचा किती वापर?
केंद्र सरकारचे जैवइंधनाला प्रोत्साहन देण्याचे धोरण आहे. जैवइंधनात इथेनॉलचा वाटा मोठा आहे. देशभरात उसाचा रस, पाक, साखर आणि मळीपासून इथेनॉल निर्मिती प्रकल्प उभारण्यात आले आहेत. पण, साखर टंचाईच्या भीतीने केंद्र सरकारने त्यापासून इथेनॉल निर्मितीवर बंधने आणली आहेत. २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट आहे. पण, निर्बंधामुळे ते शक्य नाही. त्याला पर्याय म्हणून मक्यापासून इथेनॉल निर्मितीला चालना दिली जात आहे. देशातील इथेनॉल प्रकल्पांना वर्षाला ५० लाख टन मक्याची गरज भासेल, असा प्राथमिक अंदाज आहे.
हेही वाचा >>>जीवघेण्या संसर्गास कारणीभूत ठरणाऱ्या जीवाणूचा अमेरिका-कॅनडात उद्रेक; काय आहे लिस्टेरिओसिस?
भविष्यात मक्याचे दर कसे असतील?
‘जैवइंधन धोरण २०१८’नुसार, विविध पिकांपासून इथेनॉल तयार करण्यास परवानगी देण्यात आली. खराब झालेला भात, मका, गहू आदींपासून इथेनॉल तयार करण्यास परवानगी असून, असे उद्याोग पंजाब, ओडिशात वाढू लागले आहेत. २०२१-२२ मध्ये देशात ४३३.६ कोटी लिटर इथेनॉलचे पेट्रोलमध्ये मिश्रण करण्यात आले. त्यात मोठा वाटा साखर उद्याोगाचा आहे. २०२५ पर्यंत मिश्रण पातळी २५ टक्क्यांपर्यंत घेऊन जाण्याचे उद्दिष्ट असून, त्यासाठी इथेनॉल उत्पादन क्षमता १७०० कोटी लिटरपर्यंत वाढविण्याची गरज आहे. सध्या एकूण इथेनॉल निर्मितीपैकी सुमारे ८० टक्क्यांहून जास्त इथेनॉल साखर उद्याोगातून निर्माण होते. पण, या निर्मितीला मर्यादा आहेत. दुष्काळ, कमी पाऊस, अति पाऊस आदीमुळे साखर उद्याोग अस्थिर आहे. भविष्यात साखर उद्याोगाला इथेनॉल निर्मितीचा मुक्त परवाना मिळण्याची शक्यता धूसर आहे. देशात आजवर धान्य आधारित १४१ प्रकल्पांना केंद्राने मंजुरी दिली आहे. त्यामुळे भविष्यात मक्याची मागणी वाढतच जाणार आहे. तो भविष्यात ३३ रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. यंदा मक्याच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी १५ जुलै रोजी देशात ४३.८४ लाख हेक्टरवर मक्याची लागवड झाली होती. यंदा १५ जुलैअखेर ५८.८६ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. मक्याच्या उत्पादनात कितीही वाढ झाली, तरी तो पूर्वीसारखा २० रुपयांच्या खाली येण्याची शक्यता धूसर आहे.