संजय जाधव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टेस्लाने सर्वप्रथम मोटारींमध्ये ऑक्टोबर २०१५ मध्ये स्वयंचलित म्हणजेच ऑटोपायलट संगणक प्रणाली सुरू केली. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांची ही संकल्पना होती. नंतर इतर कंपन्यांनीही तिचा समावेश केला. यामुळे मोटार एकाच मार्गिकेत राहण्यास आणि पुढील व मागील मोटारीत योग्य अंतर कायम राखण्यात आपोआप मदत होऊ लागली. मात्र, मस्क यांची स्वयंचलित प्रणाली इतर कंपन्यांपेक्षा प्रगत होती. या प्रणालीमुळे एका मार्गिकेतून स्वयंचलित पद्धतीने दुसऱ्या मार्गिकेत जाता येत होते. भविष्यातील मोटार चालविण्याची पद्धत पूर्णपणे बदलून टाकणारी ही प्रणाली ठरली. आता आठ वर्षांनी ही प्रणाली असलेल्या मोटारी माघारी घेण्याची वेळ टेस्लावर आली आहे. हे नेमके का घडले?

स्वयंचलित प्रणाली नेमके काय करते?

मोटारींतील प्राथमिक स्वयंचलित प्रणाली एकाच मार्गिकेत मोटारीला दिशा देण्यासोबत वेग वाढवू शकते आणि ब्रेक लावू शकते. ऑटोस्टीअर आणि ट्रॅफिक अवेअर क्रूझ कंट्रोल अशी ही दोन वैशिष्टय़े आहेत. पुढील टप्प्यातील स्वयंचलित प्रणालीत मार्गिका बदलणे आणि वाहतूक कोंडीत अडकू नये यासाठी चालकाला मार्गदर्शन केले जाते. ऑटोस्टीअरचा वापर काही महामार्गावर मर्यादित स्वरूपात करता येतो. मात्र, शहरातील रस्त्यांसाठी ऑटोस्टीअर हे आणखी एक वैशिष्टय़ आहे. टेस्लाकडून पूर्णपणे स्वयंचलित संगणक प्रणालीवर सध्या चाचण्या सुरू आहेत. सध्याची संगणक प्रणाली ही पूर्णपणे स्वयंचलित नसून ती केवळ चालकांना साहाय्य करणारी आहे. चालक कधीही त्यात हस्तक्षेप करू शकतात.

हेही वाचा >>>७० लाखांचा खर्च, जंगलातून प्रवास अन् अनेक संकटं; अमेरिकेत जाण्याच्या ‘डाँकी रुट’ची कहाणी, वाचा सविस्तर…

समस्या काय आहे?

मानवाने स्वयंचलित तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला की तो निवांत होऊन त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, असे अनेकदा संशोधनातून पुढे आले आहे. स्वयंचलित प्रणालीचा मोटारींमध्ये वापर सुरू झाल्यानंतर अपघात सुरू झाले. पहिला अपघात जून २०१६ मध्ये घडला. फ्लोरिडातील विलिस्टनमध्ये टेस्लाची एस मोटार समोरून रस्ता ओलांडणाऱ्या ट्रकच्या खाली घुसली. त्यात चालक मृत्युमुखी पडला. या अपघाताची चौकशी राष्ट्रीय महामार्ग वाहतूक सुरक्षा प्रशासनाने केली. चौकशीत समोरील ट्रक न दिसल्याबद्दल चालक आणि टेस्ला यांना दोषी ठरविण्यात आले. या चौकशीनंतर फारसे काही घडले नाही. मात्र, टेस्लाकडून सुरू असलेल्या स्वयंचलित प्रणालीच्या गाजावाजावर टीका होऊ लागली.

यात चालकांची चूक काय ?

 स्वयंचलित प्रणालीतील दोषांबरोबर चालकांची अतिहुशारीही समस्या बनल्याचे यानिमित्ताने पुढे आले. स्वयंचलित प्रणालीत गाडीच्या स्टीअिरगवर चालकाचा हात किती वेळ आहे, याची सातत्याने तपासणी होते. मात्र, काही चालकांनी यावर अतिहुशारीने पर्याय शोधून काढला. त्यामुळे टेस्लाच्या मोटारींचे अपघात वाढू लागले. महामार्गावर असलेल्या आपत्कालीन मदतीच्या वाहनांवरच टेस्लाच्या मोटारी धडकू लागल्या. अखेर राष्ट्रीय महामार्ग वाहतूक सुरक्षा प्रशासनाने पुन्हा सुरक्षा सुरू केली. टेस्लाच्या स्वयंचलित प्रणालीमुळे झालेल्या ३२२ अपघातापैकी ३५ अपघातांत १७ जण मृत्युमुखी पडल्याचे उघड झाले. तंत्रज्ञान सक्षम असण्याबरोबरच ते वापरणाराही सजग हवा, हे यानिमित्ताने पुढे आले.

हेही वाचा >>>शाहरुख खानच्या ‘डंकी’ चित्रपटात दाखवलेला अमेरिकेत जाण्याचा खरा ‘डाँकी’ मार्ग जीवघेणा का आहे?

टेस्लाची भूमिका काय आहे?

टेस्लाने २०१२ पासून विकलेल्या २० लाख मोटारी परत बोलाविण्याचा निर्णय घेतला आहे. टेस्लाची चालक नियंत्रण व्यवस्था सदोष असल्याचा ठपका नियामकांनी ठेवला आहे. या व्यवस्था सदोष असल्याने तिचा गैरवापर होण्याचा धोका अधिक असल्याचेही नियामकांनी स्पष्ट केले आहे. टेस्लाने हे आरोप फेटाळले असले तरी संगणक प्रणाली आणखी सक्षम करून देण्याचे पाऊल उचलले आहे. त्यात दृश्य यंत्रणा इशारे, ऑटोस्टीअर सुरू अथवा बंद करण्याची पद्धती, ऑटोस्टीअरचा बंदी असलेल्या रस्त्यांवर वापर होतो आहे की याचा इशारा देणारी यंत्रणा आदी बाबींचा समावेश आता प्रणालीमध्ये केला जाईल, असे कंपनीने म्हटले आहे.

आता काय करावे लागणार आहे?

अमेरिकेतील नियामकांनी टेस्ला कंपनीला स्वयंचलित प्रणाली असलेल्या मोटारी माघारी घेण्यास सांगितले आहे. यामुळे अमेरिकेतील विक्री झालेल्या मोटारी कंपनीला ग्राहकांकडून परत घ्याव्या लागतील. यामागे चालक नियंत्रण व्यवस्था शिथिल असल्याचे कारण आहे. या प्रणालीतील इशारे आणि मर्यादा यावर कंपनीला काम करावे लागणार आहे. स्वयंचलित संगणक प्रणाली कोणत्या परिस्थितीत कार्य करते, यात ती सुधारणा अद्ययावत करून द्यावी लागेल. मात्र, तज्ज्ञांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. केवळ चालकाचे हात स्टीअिरगवर आहेत की नाहीत, हे तपासणे पुरेसे नाही. यासाठी चालकावर नजर ठेवणारा कॅमेरा मोटारीत असावा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta explained the reverse gear of tesla automatic cars print exp 1223 amy
Show comments