किरकोळ बाजारात टोमॅटोच्या दराची स्थिती काय?

जून महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर ८० रुपये प्रति किलोवर गेले होते. एका आठवडय़ात प्रति किलो ४० रुपयांनी दरवाढ झाली होती. आता जुलैच्या पहिल्या आठवडय़ात दर्जेदार टोमॅटोचे दर १०० रु. किलोवर गेले आहेत. सध्या किरकोळ बाजारात दर्जानिहाय टोमॅटोचे दर ७५ रु.ते १०० रु.पर्यंत आहेत. प्रामुख्याने पुणे, मुंबईत दरांत तेजी आहे. मुंबई, पुण्यापेक्षा बेंगळूरु, चेन्नईत टोमॅटोचे दर अधिक आहेत. त्या तुलनेत उत्तरेत दरात फारशी तेजी नाही. मागील वर्षी जुलै – ऑगस्टमध्ये दिल्लीत टोमॅटोचे दर २२५ ते २५० रु.वर गेले होते. सध्या तरी तशी स्थिती नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे, मुंबईत टोमॅटो कुठून येतो?

मुंबई, पुणे या देशातील मोठय़ा बाजार समित्या आहेत. दरवर्षी उन्हाळय़ात टोमॅटोला चांगला दर मिळतो, म्हणून राज्याबाहेरून टोमॅटोची आवक होत असते. प्रामुख्याने कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणामधून टोमॅटोची आवक होते. यंदा ही आवक होताना दिसत नाही. उत्तरेत उत्पादित होणाऱ्या टोमॅटोमुळे उत्तरेची गरज पूर्ण होत आहे. काही प्रमाणात उत्तरेतील टोमॅटो दक्षिणेत जात आहे. त्यामुळे राज्यात दक्षिणेतून आणि उत्तरेतून राज्यात टोमॅटो येत नाही. सध्या मुंबई, पुण्याच्या बाजारात असलेला टोमॅटो प्रामुख्याने नारायणगाव (पुणे), संगमनेर (नगर), कळवण (नाशिक) आणि बारामती, फलटण परिसरातून येत आहे.

हेही वाचा >>>विश्लेषण: फुटबॉलमध्ये ‘हँडबॉल पेनल्टी’ कशी देतात? युरो स्पर्धेत स्पेनविरुद्ध जर्मनीवर अन्याय झाला का?

उत्पादन घटण्यामागे हवामानबदल?

मागील वर्षी जून, जुलै, ऑगस्टमध्ये टोमॅटोला उच्चांकी दर मिळाल्यामुळे यंदा राज्यात फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, या काळात सरासरीच्या २५ ते ३० टक्क्यांनी लागवडी वाढल्या होत्या. पण, तापमान वाढीमुळे टोमॅटोचे पीक अनेक भागांत वाया गेले आहे. सरासरी ३८ अंश सेल्सिअसच्या वर तापमान गेल्यानंतर झाडांची वाढ खुंटते. पानांचा आकार वाढत नाही, फुले कमी येतात. फळधारणा होण्यापूर्वीच फुले गळून पडतात.  टोमॅटोचा आकार वाढत नाही. टोमॅटो लहान राहतात. यंदा टोमॅटो उत्पादक भागात तापमान सरासरी ४२ ते ४५ अंश सेल्सिअसवर गेले होते. त्यामुळे उत्पादनात सरासरी ६० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. एकरी सरासरी ४० टनांपर्यंत टोमॅटो निघत होता, यंदा १५ ते २० टन टोमॅटो निघत आहे, त्याचाही दर्जा कमी आहे. अनेक ठिकाणी टोमॅटोच्या लागवडी पूर्णपणे वाया गेल्या आहेत.

उत्तरेतून टोमॅटो दक्षिणेत का जातो?

पावसाळय़ाच्या सुरुवातीस दक्षिणेतून म्हणजे आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणातून राज्यात टोमॅटोची आवक होत असते. यंदा वाढलेल्या तापमानामुळे दक्षिणेतील टोमॅटो लागवडीवर लिपकल, टास्पो या विषाणूंसह अन्य विषाणू आणि रोगांचा मोठय़ा प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. टोमॅटोच्या उत्पादनात मोठी घट झाल्यामुळे दक्षिणेकडे टोमॅटोचा तुटवडा निर्माण होऊन किमती भडकल्या आहेत. त्यामुळे दक्षिणेकडून देशाच्या अन्य भागात टोमॅटो विक्रीसाठी जाणे थांबले आहे. चांगला दर मिळत असल्यामुळे गुजरात, मध्य प्रदेशातून बेंगळूरु, हैदराबादला टोमॅटो जात आहे. परिणामी राज्यात टोमॅटोचा तुटवडा निर्माण झाला आहे. तुलनेने पंजाब, हिमाचल प्रदेशातील टोमॅटो दिल्लीत येत असल्यामुळे दिल्लीत टोमॅटो सरासरी ५० ते ६५ रुपये किलोवर आहे. 

हेही वाचा >>>जगातील आद्य कला ५१ हजार २०० वर्षे जुनी; नवीन संशोधन काय सांगते?

टोमॅटोचे दर कधी आवाक्यात येणार?

यंदा उन्हाळा, तापमान वाढ, अवकाळी पाऊस आदींमुळे टोमॅटोच्या लागवडी वाया गेल्या आहेत. बाजार समित्यांमध्ये येणारी आवक पन्नास टक्क्यांनी घटली आहे. टोमॅटो काढणीनंतर २४ तासांत बाजारात आणावा लागतो. राज्यातील उत्पादन कमी झाल्यामुळे टोमॅटोची राज्यातच विक्री होते, राज्याबाहेर पाठवावा इतके उत्पादन होत नाही. मोसमी पाऊस लगेच सुरू झाल्यास अन्य भाज्यांची आवक वाढून टोमॅटोचे दर आवाक्यात येतील, अशी अपेक्षा होती. पण आजघडीला राज्यात पुरेसा आणि शेतीउपयोगी पाऊस झालेला नाही. त्यामुळे किमान जुलै महिनाभर दर चढेच राहण्याचा अंदाज आहे. पाऊस लांबल्यास किंवा खंड पडल्यास ऑगस्टच्या मध्यापर्यंत दर चढे राहू शकतात. टोमॅटो काढणीला येण्यास ६० ते ८० दिवस लागतात. मार्चअखेर आणि एप्रिलच्या मध्यापर्यंत झालेल्या लागवडीपासून उत्पादित झालेला टोमॅटो बाजारात येत आहे. संपूर्ण मे व जूनच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत राज्याला तापमान वाढीचा सामना करावा लागला. या काळात फारशी लागवड झाली नाही आणि उत्पादनातही घट झाली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta explained tomato production decreased due to increase in temperature bad weather print exp 0724 amy
Show comments