युक्रेन युद्ध संपण्याची कोणतीही चिन्हे दृष्टिपथात नसताना अचानक युक्रेनच्या एका धाडसी कृतीमुळे ते नवीन वळण घेण्याची शक्यता आहे. इतके दिवस, खरे तर महिने रशियाने युक्रेनच्या अनेक प्रांतांमध्ये घुसखोरी केली आणि रशियनांना हुसकावून लावण्यासाठी युक्रेन जिवाचे रान करत आहे. पण युद्ध सुरू झाल्यानंतर प्रथमच युक्रेनने रशियाच्या कुर्स्क प्रांतात मुसंडी मारली. अशा प्रकारे रशियाचीच सीमा ओलांडून युक्रेनने त्या देशाला अनपेक्षित कोंडीत पकडले. अर्थात बावरलेला रशिया सावरून प्रतिहल्ला करणार हे नक्की. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युक्रेनचा प्रतिहल्ला कुठे?

युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या कुर्स्क या रशियन प्रांतात ७ ऑगस्ट रोजी युक्रेनचे सैनिक आणि चिलखती तुकड्यांनी मुसंडी मारली. या फौजा आणि तुकड्या युक्रेनमधील सुमी शहरातून निघाल्या आणि रशियाची सीमा ओलांडून जवळपास ३० किलोमीटर आत सुझा शहराजवळ त्या पोहोचल्याची माहिती पाश्चिमात्य वृत्तसंस्थांनी दिली आहे. सध्या नेमकी स्थिती काय आहे, याविषयी तपशील उलटसुलट येत आहे. १० ऑगस्टपर्यंत कुर्स्क प्रांतातून ७६ हजार नागरिकांनी पलायन केले आणि रशियाच्या सरकारला तेथे आणीबाणी जाहीर करावी लागली. जवळपास २८ शहरे आणि गावे युक्रेनच्या ताब्यात गेल्याची कुर्स्कच्या गव्हर्नरांनीच दिली आहे. हल्ला बराचसा अनपेक्षित असल्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याविषयी योजनाच रशियन सरकारला आखता आली नाही. एकूणच संपूर्ण युद्धात रशियन सरकारवर होत असलेल्या ढिसाळपणाच्या आरोपाला युक्रेनच्या ताज्या आक्रमणानंतर आणखी धार आली. 

हेही वाचा >>>विश्लेषण: सोयाबीन, कापूस उत्पादकांना अर्थसाहाय्यातून कितपत दिलासा?

हल्ल्याचा उद्देश काय?

नेमका उद्देश स्पष्ट नसला, तरी दोन कारणांस्तव हा प्रतिहल्ला युक्रेनने सुरू केला असावा असा अंदाज आहे. युक्रेनच्या पूर्वेकडील रशियन फौजांना कुर्स्ककडे म्हणजे युक्रेनच्या ईशान्येकडे वळवणे आणि ताब्यातील रशियन भूभागाच्या बदल्यात वाटाघाटी करणे. रशियाने २४ फेब्रुवारी २०२२ रोजी युक्रेनवर हल्ला केला आणि सध्या युक्रेनच्या आग्नेय आणि पूर्वेकडील चार प्रांतांच्या कमी-अधिक भागांवर रशियाचा कब्जा आहे. परंतु या युद्धात आजतागायत निर्णायक आणि मोठा विजय रशियाला मिळवता आलेला नाही हे वास्तव आहे. मात्र तरीही दोन्ही बाजूंकडील आणि विशेषतः युक्रेनचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे दररोज नुकसान सोसत बसण्यापेक्षा रशियावर प्रतिहल्ला करून त्यांना वाटाघाटींसाठी भाग पाडावे, अशी युक्रेनची धाडसी योजना आहे. यानिमित्ताने युक्रेनने प्रथमच रशियन सीमा ओलांडून हल्ला केला. कारण आजवरच्या युक्रेनच्या हल्ल्यांचे स्वरूप बचावात्मक प्रतिहल्ल्यांचे होते आणि हे प्रतिहल्ले युक्रेनच्या भूराजकीय सीमेमध्येच सुरू होते. 

हल्ल्यास यश येत आहे का?

अनेक जखमी आणि मृत रशियन सैनिकांची छायाचित्रे युक्रेनचे सैनिक समाजमाध्यमांवर टाकत आहेत. किती भूभागावर ताबा मिळवला याविषयी रशिया आणि युक्रेनच्या दाव्यांमध्ये तफावत दिसते. युक्रेनच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत १२ नागरिकांचा मृत्यू झाला असून, जवळपास २००० रशियन नागरिक युक्रेनच्या ताब्यात असल्याचा अंदाज आहे. रशियाच्या १ हजार चौरस किलोमीटर भूभागावर वर्चस्व मिळवल्याचे युक्रेनचे म्हणणे आहे. पण या दाव्याची पुष्टी पाश्चिमात्य वृत्तसंस्थांना करता आलेली नाही. १२ मैलांच्या सीमेवरून युक्रेनच्या फौजा ७ मैल आत आल्या आहेत, असे रशियन सरकाने म्हटले आहे. युक्रेनच्या हल्ल्याची व्याप्ती वाढू शकते अशी शक्यता रशियाकडूनच व्यक्त केली जात आहे. शेजारच्या बेलगोरोड प्रांतामध्ये युक्रेनचे आक्रमण होऊ शकते, या भीतीने तेथील सीमावर्ती गावांतील नागरिकांना इतरत्र हलवण्यात येत आहे. याचा अर्थ युक्रेनची धास्ती रशियाने घेतली असावी, असा काढता येतो. कुर्स्कवरील हल्ल्याबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात युक्रेन यशस्वी ठरला. किमान पहिल्या टप्प्यात तरी हा हल्ला यशस्वी ठरला असे म्हणता येऊ शकते. 

हेही वाचा >>>मंगळावर जीवसृष्टी? शास्त्रज्ञांना ग्रहावर सापडला पाण्याचा मोठा साठा; याचा नेमका अर्थ काय?

रशियाची प्रतिक्रिया काय?

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनच्या या हल्ल्याबद्दल पाश्चिमात्य देशांवर आगपाखड केली. युक्रेनच्या माध्यमातून पाश्चिमात्य देश आमच्याशी लढत आहेत. शत्रूला योग्य ते प्रत्युत्तर आम्ही देऊच, असे पुतिन गरजले. युक्रेनच्या १८ टक्के भूभागावर सध्या रशियाचे नियंत्रण आहे. मात्र युक्रेनची अपेक्षा आहे त्यानुसार रशियाने पूर्व आघाडीकडून कुर्स्कच्या दिशेने ज्यादा कुमक अद्याप पाठवलेली नाही. कुर्स्कचा बचाव सध्या मध्यम स्वरूपाच्या फौजांच्या माध्यमातून सुरू आहे. याउलट युक्रेनच्या पूर्वेला आणि आग्नेय दिशेला रशियन रेटा अजूनही तीव्र आहे. 

कुर्स्कच्या हल्ल्याने युद्धाची दिशा बदलेल?

या टप्प्यावर तसा निष्कर्ष काढता येत नाही. कारण युक्रेनला कुर्स्कची राजधानी असलेल्या कुर्स्क शहरापर्यंत जाणार का, हे अद्याप स्पष्ट नाही. तसे करण्यासाठी त्यांना अजून काहीशे किलोमीटरचा पल्ला गाठावा लागेल. त्यासाठी तयारी आणि त्याग या दोन्हींची गरज लागेल. रशियाने डोनबास प्रांतातून कुमक वळवलेली नाही, पण खारकीव्ह येथून काही तुकड्या कुर्स्कच्या बचावासाठी रवाना झाल्या आहेत. गेल्या वर्षी बराच गाजावाजा करूनही युक्रेनला प्रतिहल्ला मोहीम सुरू करता आली नव्हती. यावेळी कोणताही गाजावाजा न करता त्यांनी थेट रशियन सीमा ओलांडून शत्रूला बेसावध पकडले. ही छोटी बाब त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta explained ukraine attacked across the russian border for the first time print exp amy