राखी चव्हाण
नागपूरसह विदर्भ हा भूकंपप्रवण नसतानाही नागपूर परिसरात तीन दिवस बसलेल्या भूकंपसदृश सौम्य धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रत्यक्षात हा तो खाणींमधील ‘ब्लास्टिंग’चा परिणाम असल्याचे अभ्यासक सांगतात.
नागपूर आणि परिसरातील भूकंपाच्या सौम्य धक्क्यामागील कारणे काय?
नागपूर परिसरात या वर्षात चार ते पाच वेळा भूकंपाचे सौम्य धक्के बसले. पण ते भूकंपाचे नव्हते, तर मानवनिर्मित आणि खाणींशी संबंधित होते. या सौम्य धक्क्यांमागे कोळसा तसेच इतर खाणी असल्याचे या क्षेत्रातील अभ्यासक खात्रीने सांगतात. क्षमतेपेक्षा अधिक कोळसा काढल्यानंतर रिकाम्या खाणीत नदीचे पाणी गेल्यामुळे जमिनीच्या आतल्या बाजूला असलेले खडकांचे थर खचतात. त्यामुळे जमिनीच्या खाली हालचाली होऊन असे धक्के बसतात. त्यासोबतच अवैध ‘ब्लास्टिंग’मुळे भूकंपतरंग निर्माण होऊन धक्के बसतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. नागपूर आणि परिसरात अशा खाणी आहेत. भूकंपाचे सौम्य धक्के आणि ‘ब्लास्टिंग’च्या वेळा या एकच आहेत.
नागपूर जिल्ह्यात २०२४ मध्ये कुठे व किती भूकंप नोंद?
दिल्ली येथील राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने २७ मार्चला नागपूर जिल्ह्यात तीन लहान भूकंपसदृश धक्क्यांची नोंद केली होती. हिंगणा येथील झिल्पी तलावाजवळ दुपारी २.५३ वाजता २.८ तीव्रतेचा पहिला धक्का बसला. त्यानंतर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कांदीजवळील परसोनी येथील खेडी गावातही सौम्य धक्क्यांची नोंद झाली होती. मे महिन्यात सलग तीन दिवस जिल्ह्यात सौम्य धक्के जाणवले. शुक्रवारी तीन मे रोजी दुपारी तीन वाजून ११ मिनिटांनी २.५ तीव्रतेचा पहिला धक्का बसला. त्या वेळी पारशिवनी तालुक्यातील सिंगोरी आणि हिंगणा येथील झिल्पी हे केंद्र होते. शनिवारी चार मे रोजी कुही परिसरात दुपारी दोन वाजून २४ मिनिटांनी २.४ तीव्रतेचा धक्का बसला. तर रविवारी पाच मे रोजी दुपारी दोन वाजून २८ मिनिटांनी बसलेल्या २.७ तीव्रतेच्या धक्क्याचे केंद्र उमरेड तालुक्यातील आमगाव, देवळी, भिवगड होते.
हेही वाचा >>>भाजपाला तीन अपक्षांनी दिला झटका, हरियाणात नक्की घडतंय तरी काय? सरकार कोसळणार का?
विदर्भ भूकंपप्रवण क्षेत्र का नाही?
मध्य भारतात नागपूर आणि विदर्भ हे ‘नो सेईस्मिक अॅक्टिव्हिटी झोन’मध्ये आहेत. नागपूरखाली भूगर्भात कोणतीही ‘फॉल्ट लाइन’ नाही. त्यामुळे सलग तीन दिवस सौम्य तीव्रतेचे धक्के अपेक्षित नाहीत. पृथ्वीची निर्मिती झाली त्या वेळी पहिल्यांदा ज्या ज्या ठिकाणी ‘लँडफार्म’ तयार झाले, त्यात विदर्भाचा समावेश आहे. हे ‘लँडफार्म’ अतिशय संतुलित असल्यामुळे येथे मोठ्या व नैसर्गिक भूकंपाची शक्यता नाही. भूगर्भातील ‘टेक्टोनिक प्लेट’च्या घर्षणाने भूकंपाचा धोका उद्भवतो. नागपूर आणि आजूबाजूचा परिसर ‘इंडियन प्लेट’ने तयार झाला असल्याने घर्षण होते. मात्र तीव्र स्वरूपाच्या भूकंपाचे संकेत यातून मिळत नाहीत.
वैदर्भीयांना घाबरण्याची गरज का नाही?
संपूर्ण विदर्भ, महाराष्ट्र आणि दक्षिणचा भाग ‘सेईस्मिक कॅटेगरी टू’ आणि ‘सेईस्मिक कॅटेगरी थ्री’ मध्ये मोडतो. उत्तरेकडील हिमालयाचा भाग सोडला तर, संपूर्ण दक्षिण भागात स्थिर झालेला आहे. त्यामुळे भूकंपाचे धोके नाहीत. मात्र, ‘सेईस्मिक कॅटेगिरी वन’ मध्ये जगातला कोणताही भूप्रदेश नाही, म्हणजे सर्वच ठिकाणी भूकंप येऊ शकतो. फक्त ‘सेईस्मिक कॅटेगिरी वन’ असलेल्या परिसरात भूकंप येणार नाही. महाराष्ट्राचा भाग ‘सेईस्मिक कॅटेगिरी टू’ मध्ये मोडतो. म्हणजेच दोन ते तीन रिस्टर स्केलचे भूकंप येऊ शकतात, असे अभ्यासक प्रा. योगेश दुधपचारे यांनी सांगितले. त्यामुळे किमान विदर्भातल्या लोकांनी तरी घाबरून जायची गरज नाही.
हेही वाचा >>>चीन अन् युरोपमधील व्यापार युद्धाच्या मागे नेमके कारण काय?
भूकंप वगळता विदर्भाला कोणते मोठे धोके आहेत?
तापमानात होणारी वाढ आणि वारंवार पडणारा दुष्काळ हे विदर्भासाठी मोठे धोके आहेत. गेल्या काही वर्षांत नागपूर आणि आसपासच्या प्रदेशात मे आणि जून महिन्यात तापमान ४७ ते ४८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. काही वर्षांपूर्वी पश्चिम विदर्भाने मोठे कृषीसंकट पाहिले. त्यामुळे तापमानात झालेली वाढ आणि दुष्काळ ही या प्रदेशासाठी मोठी चिंता आहे. गेल्या काही वर्षांत अवकाळीचे नवे संकटदेखील आहे. मागील दोन-तीन वर्षांत तर ते होतेच, पण या वर्षात ते अधिक दिसून आले.