संदीप कदम
अफगाणिस्ताविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी अनुभवी विराट कोहली व रोहित शर्मा यांना भारतीय संघात स्थान देण्यात आले. त्यांच्या समावेशानंतर या दोघांबाबत चर्चा सुरू झाली. दोन्ही खेळाडूंकडे अनेक विश्वचषक स्पर्धांमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. तसेच दडपणाखाली या खेळाडूंची कामगिरी उंचावते. मात्र, गेल्या वर्षात त्यांनी ट्वेन्टी-२० सामने खेळलेले नाहीत. त्यामुळे निवड समितीचा त्यांना संघात स्थान देण्याचा निर्णय योग्य आहे का, या दोघांच्या समावेशामुळे भारताला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत फायदा होईल का, याचा घेतलेला आढावा.
रोहित, विराटला संधी देण्यामागचे कारण काय?
गेले १४ महिने एकही ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामना न खेळणाऱ्या रोहित व विराटला संघात स्थान दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन यावर्षी जून महिन्यात होणार असून त्याआधी अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघ तीन सामने खेळणार आहे. विश्वचषकापूर्वी भारताचे हे अखेरचे आंतरराष्ट्रीय सामने असतील. त्यामुळे या दोन्ही अनुभवी खेळाडूंना ट्वेन्टी-२० प्रारूपाचा चांगला सराव मिळावा या उद्देशाने निवड समितीने त्यांना संघात स्थान दिले असावे. यानंतर इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका होईल आणि मग इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) होणार आहे. यासोबतच अनेक ‘आयसीसी’ स्पर्धांचा अनुभव विराट व रोहित यांच्या गाठीशी आहे. त्याचा फायदा संघाला होऊ शकतो, असा एक विचार आहे. त्यातच एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आलेले अपयश आणि तोपर्यंत या दोन प्रमुख फलंदाजांनी दाखवलेला फॉर्म व दोघांचेही वय लक्षात घेता त्यांना ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी एक अखेरची संधी द्यावी अशा मागणीने जोर धरला होता. अशा वेळी निवड समितीने दक्षिण आफ्रिकेत जाऊन या दोन्ही खेळाडूंसोबत प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मन वळवल्याचे बोलले जात आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या गेल्या दोन सत्रांत भारताच्या हाती काहीच लागले नाही. अशा वेळी एक शेवटची संधी म्हणून या दोघांवर विश्वास टाकण्याचे निवड समितीने धाडस केले असावे, असे समजते.
हेही वाचा… विश्लेषण : शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू मुंबई आणि नवी मुंबईसाठी किती फायदेशीर? काय आहेत वैशिष्ट्ये?
विराट व रोहितकडून अपेक्षा का?
सलामीवीर रोहित आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतही रोहितने आक्रमक खेळ करताना संघाला चांगली सुरुवात दिली होती. त्यामुळे ट्वेन्टी-२० प्रारूपातही संघाला त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. रोहितने गेल्या वर्षी एकही आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामना खेळला नाही. २०२२मध्ये २९ सामन्यांत त्याचा स्ट्राइक रेट १३४ चा राहिला होता. यादरम्यान रोहितला केवळ तीन अर्धशतके झळकावता आली होती. रोहितने आजवर १४८ ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ३८५३ धावा केल्या आहेत. विराटचाही ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील गेल्या काही वर्षांतील स्ट्राइक रेट फारसा चांगला नाही. मात्र, हे दोघे कोणत्याही संघाविरुद्ध हे दोघेही चमकदार कामगिरी करण्यास सक्षम आहेत. विराटने आतापर्यंत खेळलेल्या ११५ ट्वेन्टी-२० सामन्यांत ४००८ धावा केल्या आहेत.
हार्दिक, सूर्यकुमारची दुखापत विराट, रोहितच्या पथ्यावर?
हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव यांना झालेली दुखापत विराट व रोहित यांच्या पथ्यावर पडल्याची चर्चाही सध्या सुरू आहे. रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिक भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळत होता. तसेच, निवड समितीचा मानस त्याच्या नेतृत्वाखाली २०२४चा ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळण्याचा होता. मात्र, भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे तो स्पर्धेबाहेर पडला. तो अजूनही यामधून सावरलेला नाही. तसेच तो विश्वचषक स्पर्धेतही सहभागी होईल का, याबाबतही अजून स्पष्टता नाही. हार्दिकला आपल्या कारकीर्दीत अनेकदा दुखापतींचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे संघाची धुरा सांभाळण्यासाठी अनुभवी खेळाडू संघात असावा याकरता रोहितचा संघात समावेश केला गेल्याची शक्यता आहे. हार्दिकच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवकडे ट्वेन्टी-२० संघाची धुरा सोपविण्यात आली होती. मात्र, सूर्यकुमार यादवलाही दुखापत झाल्याने निवड समितीसमोरही सध्या कुठलाच पर्याय दिसत नाही. विराटचा समावेश संघात केल्याने संघाचा मध्यक्रमाचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.
हेही वाचा… विश्लेषण : रशिया का वापरतोय उत्तर कोरियन क्षेपणास्त्रे? युक्रेन, ‘नाटो’ची डोकेदुखी वाढणार?
निवड समितीसमोर अन्य पर्याय आहेत का?
सूर्यकुमार व हार्दिकच्या अनुपस्थितीत युवा शुभमन गिलकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्याचा पर्याय निवड समितीकडे होता. नुकतेच हार्दिकला मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात घेतल्यानंतर युवा शुभमनकडे गुजरात संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. यासह सलामीला ऋतुराज गायकवाड व युवा यशस्वी जैस्वाल यांचाही विचार केला जाऊ शकतो. यशस्वी हा आपल्या आक्रमक खेळासाठी ओळखला जातो. तर, ऋतुराजकडे संयमाने खेळत चांगले फटके मारण्याची क्षमता आहे. मात्र, रोहित व विराटला विश्वचषक संघात स्थान मिळाल्यास या दोन्ही खेळाडूंना संघात स्थान मिळणे कठीण दिसते.
कोहली, विराट भारताला ट्वेन्टी-२० विश्वचषक मिळवून देतील?
ट्वेन्टी-२० विश्वचषकामुळे निवड समितीने विराट व रोहितचे संघात पुनरागमन केल्याची चर्चा केली. या दोन्ही खेळाडूंकडे बहुधा ट्वेन्टी-२० प्रकारात जेतेपद मिळवण्याची ही अखेरची संधी असेल. त्यामुळे विराट व रोहित निवड समितीने दाखवलेल्या विश्वास सार्थ करतात की नाही हे आगामी काळात सर्वांना कळेल. अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या मालिकेत हे दोन्ही खेळाडू कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. रोहित शर्मा २००७मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली ट्वेन्टी-२० विश्वचषक विजेत्या संघात सहभागी होता. यानंतर झालेल्या स्पर्धांमध्ये भारताला जेतेपद मिळवता आलेले नाही. २०१४मध्ये बांगलादेश येथे झालेल्या स्पर्धेत भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. तसेच, २०१६ व २०२२मध्ये झालेल्या स्पर्धेत भारताला उपांत्य फेरी गाठता आली. त्यामुळे भारतीय संघ जेतेपदाचा हा दुष्काळ संपविण्याचा प्रयत्न करेल.