ब्रिटनमध्ये निवडणूक पद्धत कशी आहे?
भारतीय राज्यघटनेतील अनेक गोष्टींवर ब्रिटनमधील नियमांचा प्रभाव आहे. आपली निवडणूक पद्धतीही बरीचशी ब्रिटनसारखीच आहे. आपल्याकडे लोकसभेप्रमाणे ब्रिटनमध्ये हाऊस ऑफ कॉमन्स असते. (राज्यसभेसारखे हाऊस ऑफ लॉर्डस् आहे.) हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त सदस्य (आपल्या लोकसभा खासदारांचे समकक्ष) असतील, त्या पक्षाच्या नेत्याला ब्रिटनच्या सिंहासनाकडून (सध्या राजे चार्ल्स) सरकार बनविण्याचे आमंत्रण दिले जाते. राजाला राज्य चालविण्यासाठी सल्ला देणे, मंत्रिमंडळ तयार करणे आदी जबाबदाऱ्या पंतप्रधानाला पार पाडाव्या लागतात. अर्थात, ब्रिटनची लिखित राज्यघटना नसल्याने या सर्व गोष्टी पारंपरिक पद्धतीने अमलात आणल्या जातात. लोकशाही अस्तित्वात आल्यानंतर ब्रिटिश सरकारने घेतलेले निर्णय राजाला (किंवा राणीला) मान्य करावेच लागतात. ४ तारखेला हाऊस ऑफ कॉमन्सच्या ६५० जागांसाठी संपूर्ण ब्रिटनमध्ये एकाच वेळी मतदान होईल. या वेळी विक्रमी ४ हजार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. स्थानिक वेळेनुसार रात्री १० नंतर मतदानोत्तर चाचणीचे निष्कर्ष समोर येतील. मतपत्रिकेवर मतदान होणार असल्याने प्रत्यक्ष निकालास मात्र विलंब लागेल.