‘नीट’मध्ये विद्यार्थ्यांना वाढीव गुण का देण्यात आले?
पंजाब, हरियाणा, दिल्ली, छत्तीसगडमधील काही विद्यार्थ्यांनी ‘नीट’ परीक्षेत त्यांना पुरेसा वेळ देण्यात आला नसल्याबाबत उच्च न्यायालयांत याचिका दाखल केल्या. संबंधित राज्यांतील काही केंद्रांवर परीक्षा उशिरा सुरू झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. या आरोपांची तपासणी करण्यासाठी राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने (एनटीए) तक्रार निवारण समिती (जीआरसी) स्थापन करून तक्रारींची पडताळणी केली असता, विद्यार्थ्यांच्या म्हणण्यात तथ्य असल्याचे आढळले. त्यामुळे फटका बसलेल्या विद्यार्थ्यांना भरपाई देण्याची शिफारस समितीने केली. त्यानुसार ‘एनटीए’ने काही निकष निश्चित करून एक हजार ५६३ उमेदवारांना वाढीव (ग्रेस) गुण दिले. त्यामुळे काही विद्यार्थ्यांचे गुण वाढून त्यांना थेट ७१८, ७१९ असे गुण मिळाले, तर सहा जणांना ७२० पैकी ७२० गुण मिळाले.
वाढीव गुणांवर आक्षेप का घेण्यात आला?
‘एनटीए’ने जाहीर केलेल्या निकालात एकूण ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले. गेल्या वर्षीच्या निकालाच्या तुलनेत पैकीच्या पैकी गुण मिळविणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. तसेच परीक्षेच्या काळात पेपरफुटीची चर्चा होती. वाढलेल्या गुणांमुळे विशेषत: शासकीय वैद्याकीय महाविद्यालयांत प्रवेश मिळणे आव्हानात्मक होणार असल्याचे स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थ्यांनी एनटीए आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन निकालावर आक्षेप घेतला. ‘एनटीए’च्या नियमावलीनुसार वाढीव (ग्रेस) गुण देण्याची तरतूद नाही, गुणवत्ता यादीतील काही विद्यार्थी एकाच केंद्रावरचे आहेत, तसेच परीक्षेत पेपरफुटी झाली असे काही आक्षेप नोंदवण्यात आले.
हेही वाचा >>>पुरुषांच्या अंडकोषानंतर आता लिंगातही आढळले प्लास्टिक; इरेक्टाईल डिसफंक्शनचा धोका वाढला का?
फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय का?
शिक्षण मंत्रालय आणि ‘एनटीए’ने एक हजार ५६३ उमेदवारांच्या निकालाची फेरपडताळणी करण्यासाठी ८ जूनला उच्चाधिकार समिती नियुक्त केली. ‘एनटीए’ने परीक्षा निरीक्षक, कर्मचारी यांच्या अहवालांवर आणि सीसीटीव्ही चित्रीकरण तपासणीच्या आधारे उमेदवारांनी गमावलेला वेळ निर्धारित केला होता. मात्र सहा केंद्रांमध्ये गमावलेल्या वेळेचे निर्धारण समान रीतीने केले गेले नाही. त्यामुळे गोंधळ निर्माण होऊन अनेक विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळाल्याचे समितीच्या निदर्शनास आले. त्यानंतर एक हजार ५६३ उमेदवारांचे वाढीव गुण रद्द करावेत, संबंधित विद्यार्थ्यांना त्यांचे ग्रेस गुणांशिवाय असलेले मूळ गुण कळवावेत, त्या विद्यार्थ्यांनी त्यांचे मूळ गुण स्वीकारावेत किंवा त्यांची फेरपरीक्षा घ्यावी, फेरपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे पूर्वीचे गुण रद्द करावेत, अशा शिफारशी समितीने केल्या. त्यानुसार ‘एनटीए’ने संबंधित विद्यार्थ्यांसाठी त्याच शहरात, पण वेगळ्या परीक्षा केंद्रांवर २३ जूनला फेरपरीक्षा घेऊन ३० जूनला निकाल जाहीर करण्याची घोषणा केली.
नीट परीक्षेतील गोंधळावर शिक्षणमंत्र्यांचे म्हणणे काय?
‘नीट’ परीक्षेच्या निकालानंतर सुरू झालेल्या गोंधळाने राजकीय वळण घेतले. काँग्रेसने परीक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून अनियमितता झाल्याचा आरोप केला. या आरोपानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी परीक्षेदरम्यान कोणताही गोंधळ झालेला नाही, पेपरफुटीचे कोणतेही पुरावे नाहीत, अशी स्पष्ट भूमिका घेतली होती. ‘एनसीईआरटी’ने अभ्यासक्रमाचे केलेले ‘रॅशनलायझेशन’ आणि परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम कमी झाल्यामुळे गुणवंत वाढल्याचेे व पुनर्परीक्षा घेतली जाणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, दोनच दिवसांत त्यांनी भूमिका बदलली. ‘दोन ठिकाणी गैरप्रकार झाल्याची माहिती मिळाली आहे, हे प्रकरण सरकारने गांभीर्याने घेतले असून, त्यातील दोषींवर, मग तो कितीही मोठा अधिकारी असला, तरी कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच ‘एनटीए’मध्ये सुधारणांची आवश्यकता आहे. त्याबाबतही सरकार काम करत आहे,’ असे प्रधान यांनी सांगितले. दरम्यान, बिहार आणि गुजरातमध्ये पेपरफुटीच्या आरोपांबाबत पोलीस तपास सुरू आहे.
हेही वाचा >>>संसदेची सुरक्षा कशी असते? संसदेच्या सुरक्षेत बदल का करण्यात आले?
वाढीव गुण रद्द झाल्याचा परिणाम काय?
‘वाढीव गुण रद्द केल्यानंतर तांत्रिकदृष्ट्या अखिल भारतीय स्तरावर गुणवत्ता यादी नव्यानेच तयार केली पाहिजे. मात्र आतापर्यंत ‘एनटीए’ने त्याबाबत निश्चित असा काही निर्णय घेतल्याचे दिसून येत नाही. वाढीव गुण रद्द केल्यामुळे काही प्रमाणात गुणानुक्रमांमध्ये बदल होऊ शकतो, असे वाटते. त्यात काही विद्यार्थ्यांना समान गुणानुक्रम मिळू शकतो. आता वाढीव गुणांचा प्रश्न सुटला असला, तरी पेपरफुटीचे आरोप जास्त गंभीर आहेत,’ असे तज्ज्ञ मार्गदर्शक दुर्गेश मंगेशकर यांनी सांगितले. दरम्यान, निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेशासाठीची समुपदेशन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.