दत्ता जाधव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदाच्या हिवाळय़ात हिमालयीन भागांत कमी बर्फ पडला आहे. हीच स्थिती जगभरात आहे. असे का झाले आणि त्याचा परिणाम काय होईल या विषयी..

हिमालयात यंदा बर्फवृष्टी कमी का झाली?

ऑक्टोबर ते जानेवारी हे चार महिने भारतात हिवाळा असतो. डिसेंबर, जानेवारीत हिमालयीन भागात काश्मीर खोऱ्यासह सर्वदूर बर्फ पडतो. दर हिवाळय़ात पाच ते सहा थंडीच्या लाटा येतात. पण, यंदा डिसेंबरमध्ये एक-दोन अपवाद वगळता थंडीच्या लाटा आल्या नाहीत. जानेवारीच्या अखेरच्या आठवडय़ात थंडीच्या दोन-तीन लाटा आल्या तेव्हा काश्मीरसह हिमालयीन भागात डिसेंबरची बर्फवृष्टी सुरू झाली. हिवाळा आता संपला असला, तरीही १५ फेब्रुवारीपर्यंत काही प्रमाणात बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे. यंदा गुलमर्ग, सोनमर्ग, काश्मीर आणि लेह-लडाख परिसरात कमी बर्फवृष्टी झाल्याचे स्थानिक सांगत आहेत. काही अभ्यासकांनीही बर्फवृष्टी कमी झाली या मुद्दय़ाला दुजोरा दिला आहे.

लाहौल-स्पिती खोऱ्यातील स्थिती काय?

हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पिती खोरे यंदा जानेवारीअखेपर्यंत जवळपास बर्फविरहित होते. जानेवारी अखेपर्यंत लाहौल-स्पिती खोऱ्यात किमान चार ते पाच फूट बर्फ पडायला हवा होता, पण तो पडला नाही, ही गंभीर आणि चिंतेची बाब आहे. कारण बर्फवृष्टीमुळे वर्षभराची पाण्याची तजवीज होते. स्थानिकांना सिंचन आणि शेतीसाठी पाणी मिळते, असे ‘सेव्ह लाहौल-स्पिती सोसायटी’चे उपाध्यक्ष विक्रम कटोच यांनी म्हटले आहे. सेव्ह लाहौल-स्पिती सोसायटी ही स्वयंसेवी संस्था खोऱ्याचा पर्यावरणीय ऱ्हास रोखण्याचा प्रयत्न करते.

हेही वाचा >>>चंदीगड महापौर निवडणुकीला सर्वोच्च न्यायालयाने ‘लोकशाहीची हत्या’ असे का म्हटले? नक्की काय घडले?

काश्मीर खोऱ्यातील स्थिती काय?

काश्मीरमधील गुलमर्ग, सोनमर्ग ही पर्यटन क्षेत्रे डिसेंबर अखेरीस पर्यटकांनी भरून जातात. यंदा बर्फवृष्टीच झाली नसल्यामुळे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. चिल्लई कलां (चिल्लई कलान) हा काश्मीरमधील सर्वाधिक थंडीचा काळ मानला जातो. तो २१ डिसेंबर ते २९ जानेवारी असा ४० दिवसांचा असतो. या काळातही खोऱ्यात अपेक्षित बर्फवृष्टी झाली नाही. ३० जानेवारी रोजी हलकी बर्फवृष्टी झाली, तोपर्यंत चिल्लई कलां हा काळ बर्फविरहित होता. श्रीनगर शहरात १४ जानेवारी रोजी हिवाळय़ातील विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे.  १४ जानेवारी रोजी पारा १५ अंश सेल्सिअसवर पोहचला होता. तो दिवस मागील १४ वर्षांच्या हिवाळय़ातील सर्वात उष्ण दिवस होता. ९ जानेवारी रोजी नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी एक्स या समाजमाध्यमावरील आपल्या संदेशात म्हटले होते, मी हिवाळय़ात गुलमर्ग इतके कोरडे कधीच पाहिले नाही. लवकर बर्फ नाही पडला, तर उन्हाळा अत्यंत गंभीर असेल. १० जानेवारी रोजी भारतीय हवामान विभागाचे हवामान शास्त्रज्ञ सोनम लोटस यांनी लडाख, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या उत्तरेकडील प्रदेशांमध्ये सरासरीच्या तुलनेत खूपच कमी बर्फ पडल्याचे म्हटले होते. जानेवारी अखेरीस काश्मीरसह हिमालयीन भागांत बर्फवृष्टी सुरू झाली असून, ती सरासरीइतकी होते का, याकडे लक्ष लागले आहे.

बर्फवृष्टी कमी का झाली?

उत्तर अटलांटिक निर्देशांक (नॉर्थ अटलांटिक इंडेक्स) डिसेंबपर्यंत सक्रिय नव्हता. जानेवारीपासून उत्तर अटलांटिक निर्देशांक सक्रिय होण्यास सुरुवात झाल्यामुळे जानेवारीच्या अखेरीस हिमालयात पश्चिम विक्षोपाचा जोर काहीसा वाढला आहे. हा जोर फेब्रुवारी महिन्यात कमी होतो. त्यामुळे बर्फवृष्टीसाठी अत्यंत कमी काळ राहिला आहे. उत्तरेकडून म्हणजे अगदी रशियापासून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे हिमालयीन पर्वतरांगांमध्ये बर्फवृष्टी होत असते. पण यंदा पश्चिम विक्षोप किंवा उत्तरेकडून थंड वारे उशिराने हिमालयीन रांगांत दाखल झाले आणि डिसेंबरमध्ये आलेल्या पश्चिमी विक्षोपात फारसा जोर नव्हता. त्यामुळेच डिसेंबपर्यंत ना फार बर्फ पडला ना उत्तर भारतात फार थंडी पडली. जानेवारीअखेरीस सलग तीन पश्चिमी विक्षोप हिमालयीन प्रदेशात सक्रिय झाले होते. त्याचा परिणाम म्हणून जानेवारीच्या अखेरीस म्हणजे २९ ते ३१ जानेवारी या काळात काश्मीरसह हिमालयीन भागांत बर्फवृष्टीला पोषक वातावरण निर्माण होऊन बर्फवृष्टी सुरू झाली होती.

हेही वाचा >>>किंग चार्ल्स यांना कर्करोग झाल्यानं आता ब्रिटनच्या राजगादीचे काय होणार? वाचा सविस्तर

कमी बर्फवृष्टी झाल्याचा परिणाम काय?

हिमालयाच्या रांगांमध्ये कमी बर्फवृष्टी झाल्याचा मोठा फटका भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, चीन या देशांना बसू शकतो. हिमालय हा जगातील जवळपास १५० कोटींहून जास्त लोकांसाठीचा पाण्याचा मुख्य स्रोत आहे. हिमालयात हजारो लहान-मोठय़ा हिमनद्या आहेत. वरच्या भागातील नद्यांना हिम वितळून पाणी मिळत असल्याने त्या बारमाही वाहतात. या नद्या वर्षभर शेतीला, पिण्याला, उद्योगांना पाणी देतात. नजीकच्या काळात या नद्यांना पाणी कमी पडणार नाही. पण असाच अपुरा बर्फ पडत राहिला, तर या नदी खोऱ्यातील संपूर्ण जीवसृष्टीच धोक्यात येऊ शकते.  यंदा बर्फवृष्टीशी संबंधित पर्यटन उद्योग अडचणीत आला आहे. ही धोक्याचा इशारा देणारी घटना आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta explained what are the reasons for less snow in the himalayas this year amy
Show comments