निर्वासितांचा संघ तयार करण्याचा निर्णय कधी घेतला?

जागतिक निर्वासितांवरील संकटाचा प्रश्न २०१५ मध्ये उपस्थित झाला, तेव्हा आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सभेत निर्वासित ऑलिम्पिक संघाची निर्मिती करण्याची घोषणा केली. सर्वांत प्रथम २०१६ मध्ये रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत असा निर्वासितांचा संघ तयार करण्यात आला. तेव्हा सीरिया, दक्षिण सुदान, इथिओपिया, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो देशातील १० खेळाडू ऑलिम्पिक ध्वजाखाली सहभागी झाले होते. यंदा पॅरिसमध्ये प्रथमच विविध रंगीत बाणांनी वेढलेल्या हृदयाचे चित्र असे चिन्ह या संघाला देण्यात आले आहे. जगभरातील कोट्यवधी निर्वासितांसाठी आपुलकीची भावना हे चिन्ह दर्शवते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या खेळाडूंना कसा पाठिंबा मिळतो?

निर्वासितांच्या ऑलिम्पिक संघासाठी आयओसी ना-नफा या तत्त्वावर काम करते. जे जगभरातील राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्यांना आर्थिक साहाय्य करतात त्यांच्याकडूनच एक भाग या संघासाठी देण्यात येतो. राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्या त्यांच्या देशात राहणाऱ्या निर्वासितांची माहिती घेतात आणि त्यांच्या प्रशिक्षण, सराव आणि स्पर्धा सहभागासाठी निधी उपलब्ध करतात. यातील प्रत्येक कार्यक्रम हा ऑलिम्पिक निर्वासितांसाठी तयार करण्यात आलेल्या फाऊंडेशनच्या वतीने घेतला जातो.

हेही वाचा >>>पँगॉन्ग लेकवरील चीनचा पूल तयार; भारतासाठी हा किती मोठा धोका?

निर्वासितांमधील खेळाडू शोधण्याचे काम कसे चालते?

ऑलिम्पिक खेळाच्या प्रवासात अव्वल खेळाडूंना पाठिंबा देत असतानाच आयओसी निर्वासितांमधील गुणवत्तेलाही न्याय देण्याचा प्रयत्न करत असते. ऑलिम्पिक निर्वासित फाऊंडेशन अशा निर्वासितांच्या समुदयातील खेळाडूंना खेळात प्रवेश देण्यासाठी जगभरात कार्यक्रम आयोजित करते. २०१७ मध्ये अशा कार्यक्रमाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत जवळपास ४ लाख लोकांना खेळांमध्ये प्रवेश देण्यात आला असून, १६०० प्रशिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले आहे.

आयओसीचा निर्वासित ऑलिम्पिक संघ काय आहे?

पॅरिससाठी तयार करण्यात आलेल्या ऑलिम्पिक संघातील ३७ खेळाडू ११ विविध देशांतील असून, ते १२ खेळांमध्ये सहभागी होतील. आपल्या देशातून विस्थापित झालेल्या खेळाडूंना सर्वोच्च स्तरावर खेळात सहभागी होता यावे यासाठी इक्विप ऑलिम्पिक डेस रेफ्युजी या फ्रेंच नावाने या स्पर्धेसाठी संघ तयार केला आहे. हा संघ ईओआर या संक्षिप्त नावाखाली स्पर्धा खेळेल. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत २९ खेळाडूंचा सहभाग होता.

हेही वाचा >>>प्रिन्सेस डायना-परिकथेतील राजकुमारीचा अपघाती मृत्यू की हत्या; ३१ ऑगस्ट १९९७ रोजी पहाटे काय घडले होते?

पॅरिस ऑलिम्पिकसाठी निर्वासितांच्या संघात कोण आहे?

पॅरिससाठी आखण्यात आलेल्या शिष्यवृत्ती कार्यक्रमातून खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यामध्ये ऑस्ट्रिया, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, ग्रेट ब्रिटन, इस्राएल, इटली, जॉर्डन, केनिया, मेक्सिको, नेदरलँड्स, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड आणि अमेरिका या राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्यांनी एकत्र येऊन या ३७ खेळाडूंची निवड केली आहे. हे खेळाडू अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, ब्रेकिंग, कॅनोइंग, सायकलिंग, ज्युडो, स्पोर्ट शूटिंग, पोहणे, तायक्वांदो, वेटलिफ्टिंग, कुस्ती या खेळात सहभागी होतील.

निर्वासितांची संख्या वाढवण्याची मागणी का?

जगात काय घडत आहे यावर कोणाचे नियंत्रण असू शकत नाही. पण अशा पद्धतीने देश सोडून गेलेल्या लोकांना जगण्याचा अधिकार आहे. आयओसीने अशा लोकांमधून खेळाडू शोधले आणि त्यांना ऑलिम्पिकचे व्यासपीठ खुले करून दिले. त्यामुळे जुने आयुष्य मागे टाकून गमावलेली स्वप्ने परत मिळविण्याची आशा निर्माण होत आहे. लपतछपत फिरत उपेक्षितांचे जीवन जगण्यापेक्षा हे जगणे केव्हाही चांगले अशी भावना या संघाच्या निर्मितीमुळे खेळाडूंमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे अधिकाधिक निर्वासित खेळाडूंना ऑलिम्पिक खेळण्याची संधी मिळाली पाहिजे, अशी मागणी निर्वासित खेळाडूंकडूनच केली जात आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta explained what is the concept of an olympic team of refugees print exp 0724 amy
Show comments