चिन्मय पाटणकर
शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शिक्षकांनी शाळेत कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत, कोणत्या प्रकारचे कपडे घालू नयेत याबाबतच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. शिक्षण विभागाच्या या निर्णयाची राज्यात चर्चा होत आहे.
शिक्षकांसाठी पेहरावसंहिता कशासाठी?
राज्यातील काही संस्थांच्या शाळांतील शिक्षकांना पेहरावसंहिता बऱ्याच वर्षांपासून लागू आहे. मात्र आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, अनुदानित, अंशत: अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यित, अल्पसंख्याक शिक्षण संस्थांच्या सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व मंडळाच्या, सर्व माध्यमांच्या शाळांना पेहरावसंहिता लागू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. शिक्षक भावी पिढी घडवत असतात, जनमानसात त्यांच्याकडे गुरू, मार्गदर्शक म्हणून पाहिले जाते. शिक्षकांचा संबंध विद्यार्थी, पालक, प्रतिष्ठित व्यक्ती, लोकप्रतिनिधी यांच्याशी येत असतो. त्यामुळे अध्यापनाचे काम करताना आपला पेहराव शाळेला आणि पदाला अनुरूप ठरेल, याची सर्वतोपरी काळजी घेणे अभिप्रेत आहे. शिक्षकाचा पेहराव अशोभनीय, अव्यवस्थित आणि अस्वच्छ असल्यास त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर, तसेच विद्यार्थ्यांवर होतो असे नमूद करून शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांच्या पेहरावासंदर्भातील मार्गदर्शक सूचना नुकत्याच प्रसिद्ध केल्या आहेत. यापूर्वी शालेय शिक्षण विभागाकडून एक राज्य एक गणवेश या योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांसाठी गणवेश योजना लागू करण्यात आली आहे. त्यात पहिली ते चौथीच्या मुलींना पिनो फ्रॉक, पाचवी ते सातवीच्या मुलींना शर्ट आणि स्कर्ट, आठवीच्या मुलींसाठी सलवार कमीज ओढणी, तर पहिली ते सातवीच्या मुलांना हाफ शर्ट आणि हाफ पँट, तर आठवीच्या मुलांना हाफ शर्ट आणि फुल पँट असा गणवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा >>>लष्करात AI ते 5G अन् मशीन लर्निंगपर्यंत सर्व गोष्टींवर संशोधन केले जाणार, STEAG कसे काम करणार?
शिक्षकाच्या पेहरावासंबंधी सूचना काय?
महिला शिक्षकांनी साडी, चुडीदार-सलवार, कुर्ता, दुपट्टा, तर पुरुष शिक्षकांनी शर्ट, ट्राउझर पँट, शर्ट इन करून असा पेहराव करावा. पुरुष शिक्षकांच्या शर्टचा रंग फिकट आणि पँटचा रंग गडद असावा. शाळेने शिक्षकांसाठी एकच ड्रेसकोड निश्चित करावा. तसेच पुरुष आणि महिला शिक्षकांनी परिधान करायच्या पेहरावाचा रंग कोणता असावा, ते संबंधित शाळेने निश्चित करावे, तसेच पेहरावाला शोभतील अशी पादत्राणे असावीत, वैद्यकीय कारण असल्यास पुरुष, महिला शिक्षकांना बूट घालण्यातून सवलत द्यावी, स्काउट-गाइडच्या शिक्षकांना स्काउट-गाइडचाच पेहराव असेल, असे नमूद करण्यात आले आहे. शिक्षकांनी कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत हे सांगतानाच शिक्षकांनी कोणत्या प्रकारचे कपडे घालू नयेत हेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार शिक्षकांनी गडद रंगाचे, चित्रविचित्र नक्षीकाम आणि चित्रे असलेले कपडे परिधान करू नयेत. तसेच शिक्षकांनी शाळेत जीन्स, टीशर्ट परिधान करू नये, असे नमूद करण्यात आले आहे.
शिक्षकांच्या नावामागे संबोधन कशाला?
अभियंता, वास्तुरचनाकार, डॉक्टर, सनदी लेखापाल, वकील अशा विविध व्यावसायिकांच्या नावामागे त्यांचे संबोधन लावण्यात येते. त्याच धर्तीवर आता शिक्षकांच्या नावामागेही संबोधन लावण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या नावामागे इंग्रजीत ‘टीआर’ आणि मराठीत ‘टी’ संबोधन लावण्यात यावे, या संदर्भातील बोधचिन्ह शिक्षण आयुक्त यांनी निश्चित करावे, हे संबोधन आणि बोधचिन्ह शिक्षकांना त्यांच्या वाहनावर लावता येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
हेही वाचा >>>भाजपाचा फॉर्म्युला ठरला; केंद्रीय मंत्री पशुपती पारस NDAतून बाहेर, पक्षाच्या अडचणी वाढणार?
शिक्षक संघटनांचे म्हणणे काय?
शिक्षण विभागाच्या पेहरावासंबंधित मार्गदर्शक सूचनांबाबत शिक्षकांमध्ये नाराजी, तसेच विरोधाचे वातावरण आहे. शिक्षण विभाग शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याकडे लक्ष न देता शिक्षकांच्या पेहरावासारख्या अनावश्यक गोष्टींकडे का लक्ष देत आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. शिक्षकांच्या पेहरावाबाबतचा शासन आदेश अप्रासंगिक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये गोरगरीब, कष्टकरी, कामकऱ्यांची मुले येतात याची जाणीव शिक्षकांना असते. विद्यार्थी अनुकरणप्रिय असल्याने त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण होणार नाही आणि आपल्या व्यवसायाच्या बाबत नकारात्मक भूमिका निर्माण होणार नाही असाच पेहराव शिक्षक करतात. पावसाळय़ात बूट वगैरे दररोज वापरणे सयुक्तिक नाही. शाळेत कोणत्या प्रकारचा पोशाख करावा याची पूर्ण जाणीव शिक्षकांना असल्याने शिक्षण विभागाने पेहरावाबाबतचे आदेश देणे म्हणजे शिक्षकांबाबत समाजात गैरसमज पसरवणे आहे, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीचे राज्य अध्यक्ष विजय कोंबे यांनी मांडले. शिक्षण विभागाने शिक्षकांच्या पेहरावाबाबत मार्गदर्शक सूचना देणे इथेपर्यंत ठीक आहे. मात्र शिक्षकांचे कपडे असेच असावे, इन-शर्ट असावे, अशा रंगाचे कपडे घालू नये अशा बंधनात अडकवणे चुकीचे आहे, शैक्षणिक बाबींवर काम करण्यापेक्षा अशैक्षणिक गोष्टींवर शिक्षण विभाग अनावश्यक वेळ घालवत आहे, असे मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य प्रवक्ता महेंद्र गणपुले यांनी सांगितले.
chinmay. patankar@expressindia.com