वाघांच्या स्थलांतरामागील कारणे काय?
वाघांनी स्थलांतर करण्यामागे अनेक कारणे आहेत. वाघांच्या अधिकार क्षेत्रात किंवा त्याच्या मूळ अधिवासात दुसरा एखादा वाघ आल्यास त्यांच्यात झुंज होते. या झुंजीत पराभूत झालेला वाघ इतरत्र स्थलांतर करतो. वयाची दोन वर्षे पूर्ण केल्यानंतर वाघाचा बछडा त्याच्या आईपासून वेगळा होतो आणि स्वत:चे अधिकार क्षेत्र, स्वत:चा अधिवास निर्माण करण्यासाठी स्थलांतर करतो. प्रजननासाठी जोडीदाराच्या शोधातदेखील वाघ स्थलांतर करतात. बरेचदा वाघाला पुरेशी शिकार मिळाली नाही तर अन्नासाठी, पाण्यासाठीदेखील वाघ स्थलांतर करतो. एकाच क्षेत्रात वाघांची संख्या अधिक असेल तर नवीन अधिवासाच्या शोधातदेखील वाघ स्थलांतर करतात.
स्थलांतरादरम्यान वाघांना धोका असतो?
स्थलांतरणादरम्यान मानव-वन्यजीव संघर्ष, शिकार, अपघात या गोष्टीपासून वाघाला धोका असतो. आईपासून नुकतेच वेगळे झालेले बछडे नवीन अधिवासाच्या शोधात स्थलांतर करतात, तेव्हा मानव-वन्यजीव संघर्षाची शक्यता जास्त असते. जंगल आणि गावाच्या सीमेवर वाघ आला तर गावकऱ्यांमध्ये त्याला पाहण्याची आणि कॅमेऱ्यात कैद करण्याची स्पर्धा लागते. अशा वेळी बिथरलेल्या वाघाकडून हल्ला होण्याची शक्यता असते. याशिवाय स्थलांतर करताना बरेचदा वाघ राष्ट्रीय महामार्ग, नद्या, रेल्वे ओलांडतात. या वेळी त्यांच्या अपघाती मृत्यूची शक्यता असते. स्थलांतर करताना वाघांना शिकाऱ्यांचाही तेवढाच धोका असतो.
हेही वाचा >>>महाकुंभ मेळ्यामध्ये साध्वी होणार IAS अधिकारी व्हायचं स्वप्न पाहणारी मुलगी; चर्चेत असलेली राखी सिंह कोण आहे?
वाघांचे स्थलांतर किती प्रकारचे असते?
नैसर्गिकरीत्या होणारे वाघाचे स्थलांतर वेगळे आणि एखाद्या जंगलातून जेरबंद करून वाघाला स्थलांतरित करणे वेगळे. याला कृत्रिम स्थलांतर असेही म्हणतात. वाघाने नैसर्गिकरीत्या स्थलांतर करण्यामागे शिकार, अधिवास, जोडीदाराचा शोध अशी अनेक कारणे असतात. तर कृत्रिम स्थलांतर प्रक्रियेत एखाद्या वनक्षेत्रात वाघाची संख्या कमी असल्यास, अधिक वाघ असणाऱ्या क्षेत्रातून त्या ठिकाणी वाघ सोडले जातात. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात दोन वाघिणींचे कृत्रिम स्थलांतर करण्यात आले. तर ओदिशातही याच व्याघ्र प्रकल्पातून दोन वाघिणी स्थलांतरित करण्यात आल्या. मानव-वन्यजीव संघर्षादरम्यान जेरबंद केलेल्या वाघाला इतरत्र स्थलांतरित केले जाते.
कॉरिडॉरचा स्थलांतराशी संबंध काय?
वाघांच्या स्थलांतर प्रक्रियेमुळे अनेक नवे संचारमार्ग (कॉरिडॉर), जंगलांची संलग्नता यांची नोंद झाली आहे. त्यामुळे वाघांच्या सुरक्षिततेबरोबरच त्यांच्या संचारमार्गाची सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्रात अनेक वाघ स्थलांतर करून बाहेर गेले आहेत, पण अजूनही राज्यातील अंतर्गत व बाह्य कॉरिडॉरच्या संरक्षण व संवर्धनावर काम झालेले नाही. याउलट वाघांच्या संचारमार्गात अनेक प्रकल्प येऊ घातल्याने या संचारमार्गांना आणि पर्यायाने वाघांना धोका निर्माण झाला आहे. वाघांनी एका जंगलातून दुसऱ्या जंगलात स्थलांतर करणे हे जनुकीयदृष्ट्याही महत्त्वाचे मानले जाते. वाघांच्या दीर्घकालीन जगण्यासाठी ‘कॉरिडॉर’ का महत्त्वाचे आहेत, हेदेखील या स्थलांतर प्रक्रियेतून स्पष्ट होते.
हेही वाचा >>>१६ हजार एकरवर अग्नितांडव; कलाकारांसह अनेकांची घरे भस्मसात, अमेरिकेतल्या भीषण आगीचे कारण काय?
वाघांच्या स्थलांतराच्या घटना कोणत्या?
न्यू नागझिरा अभयारण्यातून २०१४ साली ‘कानी’ नावाच्या वाघिणीने ६९.२ किलोमीटरचे अंतर पार करत नवेगाव अभयारण्यात स्थलांतर केले. जुलै-ऑगस्ट २०१३ मध्ये नागझिरा अभयारण्यातून ‘जय’ नावाच्या वाघाने सुमारे ८० किलोमीटरचे अंतर पार करत उमरेड-करांडला अभयारण्यात स्थलांतर केले. त्यानंतर मे २०१७ मध्ये याच ‘जय’ या वाघाच्या ‘बली’ या बछड्याने सुमारे १५० किलोमीटरचे अंतर पार करत मानसिंगदेव अभयारण्य गाठले. जानेवारी २०१७ मध्ये कळमेश्वर कोंडाळीच्या राखीव जंगलातील ‘नवाब’ या वाघाने अमरावती जिल्ह्यातील पोहरा-मालखेडच्या राखीव जंगलात सुमारे १३५ किलोमीटरचे अंतर पार करून स्थलांतर केले. कळमेश्वरच्याच जंगलातून बोर अभयारण्यात एका वाघाने स्थलांतर केले. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यातील ‘वॉकर’ या वाघाने परराज्यातून स्थलांतर करत पुन्हा महाराष्ट्रातील बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्य गाठले. १४ महिन्यांच्या प्रवासात त्याने तब्बल तीन हजार २०० किलोमीटर अंतर कापले. नोव्हेंबर २०२३ मध्ये ब्रह्मपुरी वनक्षेत्रातील वाघाने दोन हजार किलोमीटरचा प्रवास करत, चार राज्यांतील जंगले ओलांडत ओदिशा गाठले. यापूर्वी फेब्रुवारी २०१३ मध्ये न्यू नागझिऱ्यातील ‘आयात’ या वाघाने मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील वारासिवनी जंगलापर्यंत ६० किलोमीटरचे अंतर पार केले होते. तर ‘प्रिन्स’ने २०१०-११ मध्ये १२० किलोमीटरचे अंतर पार करत मध्य प्रदेश पेंच व्याघ्र प्रकल्पात स्थलांतर केले होते. यवतमाळमधील एका वाघाने ५०० किलोमीटरचा प्रवास करत धाराशिव गाठले.