संत्री उत्पादकांसमोरील प्रश्न कोणते?
गेल्या वीस वर्षांत विदर्भातील संत्री बागांमध्ये कोळशी या रोगामुळे संत्र्याची लाखो झाडे नष्ट करावी लागली. संत्री उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. अलीकडे संत्र्याच्या बागांवर डिंक्या आणि शेंडेमर या रोगांचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात जाणवू लागला आहे. डिंक्या हा रोग बुरशीजन्य असून नवीन बागांमध्ये त्याचा फैलाव अधिक हानीकारक ठरत आहे. याशिवाय काही भागात संत्री बागांवर काळ्या आणि पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. वेळीच व्यवस्थापन न केल्यास नुकसानीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. खते, कीटकनाशके, शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या खर्चात वाढ झाली आहे. वाहतूक खर्चही वाढला आहे. त्यामुळे संत्री उत्पादनाचा खर्च वाढला असला, तरी त्या तुलनेत दर मात्र कमी आहेत.
विदर्भातील संत्री बागांची स्थिती काय?
राज्यात सुमारे २ लाख हेक्टर क्षेत्रात संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. त्यापैकी १ लाख ८० हजार हेक्टरवरील बागा एकट्या विदर्भात आहेत. अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांत संत्री बागांचे क्षेत्र सर्वाधिक असले तरी संत्र्याचे हेक्टरी उत्पादन विदर्भात सरासरी ७ टन- म्हणजे इतर राज्यांतील संत्री उत्पादनापेक्षा फार कमी आहे. संत्र्याची उत्पादकता, प्रक्रिया उद्याोग आणि निर्यातवाढीसाठी परिणामकारक उपाययोजना करण्यात न आल्याने संत्री उत्पादकांसमोरील प्रश्न कायम आहेत. आता संत्र्याच्या बागांवर रोग, किडींचे संकट निर्माण झाले आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी संत्री उत्पादकांना शास्त्रीय मार्गदर्शन अपेक्षित आहे.
हेही वाचा >>>वेळेआधी दाखल होऊनही महाराष्ट्रात मोसमी पावसाची वाटचाल का मंदावली? बरसणार केव्हा?
कीड नियंत्रणासाठी उपाय कोणते?
विदर्भात संत्र्याच्या लागवडीचे क्षेत्र वाढत असताना अलीकडे प्रतिकूल हवामानामुळे शेंडेमर, डिंक्या तसेच काळ्या आणि पांढऱ्या माशीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संत्र्याच्या बागांना धोका निर्माण झाला आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी फवारणी आणि कीड व्यवस्थापनाचा सल्ला कीटकशास्त्रज्ञांनी दिला असला, तरी अजूनही शेतकऱ्यांपर्यंत शास्त्रीय माहिती पोहोचलेली नाही. डिंक्या रोगातील बुरशीमुळे साल आणि खोडांमध्ये डिंक साठतो. झाडाची साल उभी फाटून डिंक ओघळू लागतो. रोगाची लागण फळांनाही होते. फळावर तेलकट नारंगी डाग दिसून येतात. संत्री उत्पादकांना यावर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक असते.
हेही वाचा >>>माउथवॉश वापरल्यामुळे होतोय कॅन्सर? अहवालात समोर आली धक्कादायक माहिती
पीक बरे आले, तरीही चिंता?
गेल्या काही वर्षांत देशातील बाजारात विदर्भातील संत्र्याची मागणी स्थिर असली, तरी निर्यात मंदावल्याने त्याचा परिणाम संत्र्याचे दर घसरण्यावर झाला आहे. बांगलादेश हा संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. भारत सरकारच्या आयात-निर्यातविषयक धोरणाला कंटाळून बांगलादेशने २०१९ मध्ये संत्र्यावर प्रति किलो २० रुपये आयात शुल्क लावले. हे आयात शुल्क २०२३ मध्ये ८८ रुपये एवढे करण्यात आले. त्यामुळे संत्र्याच्या निर्यातीत जवळपास ६५ ते ७० टक्क्यांनी घट झाली. शेतकऱ्यांना संत्री देशांतर्गत बाजारपेठेत विकावी लागली. पुरवठा वाढल्यामुळे संत्र्याचे दर कोसळले. राज्य सरकारने संत्र्यासाठी ४४ रुपयांचे निर्यात अनुदान जाहीर केले, पण त्याची नियोजनाअभावी योग्य अंमलबजावणी होऊ शकली नाही.
उत्पादन खर्च किती व कसा वाढला?
रासायनिक खते, कीटकनाशके आणि शेतीसाठी लागणाऱ्या साहित्यावर जीएसटी आकारला जातो. सर्व कृषी निविष्ठांवर १२ ते १८ टक्के जीएसटी भरावा लागतो. इंधन दरवाढीमुळे वाहतुकीच्या खर्चातही वाढ झाली आहे. पाच वर्षांपूर्वी संत्र्याचा एकरी उत्पादन खर्च हा ३० हजार रुपये होता. तो आता ५५ हजार रुपयांवर गेला आहे. त्या तुलनेत संत्र्याला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे संत्री उत्पादकांचे उत्पन्न घटले आहे. पाच वर्षांपुर्वी निर्यात सुरळीत सुरू होती, तेव्हा संत्र्याला सरासरी प्रति टन ३५ हजार रुपये दर मिळाला होता, पण २०२३-२४ च्या हंगामात केवळ १४ हजार प्रति टन भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागला. मंदावलेली निर्यात आणि प्रक्रिया प्रकल्पांचा अभाव यामुळे संत्री उत्पादकांचे आर्थिक नुकसान होत आहे. याशिवाय अवकाळी पाऊस, पावसाची अनियमितता यामुळेदेखील संत्र्याच्या उत्पादनावर परिणाम होतो. संत्री उत्पादकांसाठी पीक विमा योजना लागू असली, तरी त्याचा परतावा योग्यरीत्या मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा आहे. इतर पिकांच्या तुलनेत संत्र्यासाठी विम्याचा हप्ता जास्त आहे. विम्याचे संरक्षण अल्पदरात मिळावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.