‘आयसीसी’ जेतेपदाची प्रतीक्षा संपविण्याचे ध्येय बाळगलेल्या भारतीय महिला संघाचे ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. विश्वचषकासाठी संयुक्त अरब अमिरातीला रवाना होण्यापूर्वी भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने जेतेपदाचा निर्धार व्यक्त केला होता. तसेच बलाढ्य ऑस्ट्रेलियाला कोणी हरवू शकत असेल, तर तो भारतीय संघच, असे वक्तव्यही केले होते. मात्र, याच ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यामुळे भारतीय संघावर साखळीतच गारद होण्याची नामुष्की ओढवली. भारतीय संघाचे या स्पर्धेत नेमके कुठे चुकले आणि कोणत्या खेळाडूंच्या अपयशाचा सर्वाधिक फटका बसला, याचा आढावा.
जेतेपदाच्या आशा बाळगण्याचे कारण काय?
भारतीय महिला संघाने गेल्या दशकभरापासून वेगाने प्रगती केली आहे. भारतीय संघाने एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धांमध्ये सातत्याने बाद फेरीचा टप्पा गाठला आहे. गेल्या तीन महिला ट्वेन्टी-२० विश्वचषकांत भारताने अनुक्रमे उपांत्य (२०१८), अंतिम (२०२०) आणि उपांत्य (२०२३) फेरीपर्यंत मजल मारली. त्यातच द्विदेशीय मालिकांमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला नेहमी कडवी झुंज दिली. मुंबई रणजी संघाचे माजी कर्णधार अमोल मुझुमदार यांची प्रशिक्षकपदी निवड झाल्यापासून भारतीय महिला संघाच्या कामगिरीत अधिक सुधारणा झाली. कसोटी क्रिकेटमध्ये भारताने सलग तीन मालिकात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांवर मात केली. ट्वेन्टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने भारताला नमवले. मात्र, बहुतेक सामने चुरशीचे झाले. या सर्व पार्श्वभूमीवर, भारतीय संघाकडून यंदाच्या महिला ट्वेन्टी-२० विश्वचषकात जेतेपदाच्या आशा बाळगण्यात येत होत्या.
हेही वाचा >>>Tapeworm Pills : लठ्ठपणा कमी करण्यासाठी टेपवर्मचा वापर? त्याचा शरीरावर किती घातक परिणाम?
स्पर्धेतील कामगिरी कशी?
यंदाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताला अवघड अशा ‘अ’ गटात स्थान देण्यात आले होते. साखळी फेरीतच भारताला तुल्यबळ न्यूझीलंड, गतविजेते ऑस्ट्रेलिया, पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि काही महिन्यांपूर्वीच आशिया चषकाच्या अंतिम फेरीत पराभूत करणाऱ्या श्रीलंकेचा सामना करावा लागला. भारतासाठी या स्पर्धेची सुरुवातच निराशाजनक ठरली. सलामीच्या लढतीत भारताला न्यूझीलंडकडून ५८ धावांनी हार पत्करावी लागली. त्यानंतर स्पर्धेत पुनरागमन करणे आणि उपांत्य फेरी गाठणे अवघडच जाणार होते. भारतीय संघाने पाकिस्तान (सहा गडी राखून) आणि श्रीलंका (८२ धावांनी) यांच्यावर विजय मिळवून आव्हान शाबूत ठेवले. मात्र, निर्णायक लढतीत ऑस्ट्रेलियाचा अडथळा पार करण्यात भारतीय संघ अपयशी ठरला. कर्णधार एलिसा हिलीच्या अनुपस्थितीतही ऑस्ट्रेलियाने भारताला ९ धावांनी पराभूत केले. त्यानंतर भारताच्या आशा पाकिस्तानवर अवलंबून होत्या. मात्र, संपूर्ण स्पर्धेत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या पाकिस्तानला अखेरच्या साखळी लढतीत न्यूझीलंडने ५४ धावांनी धूळ चारली. त्यामुळे ‘अ’ गटातून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांनी उपांत्य फेरी गाठली, तर भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका हे संघ गारद झाले.
क्षेत्ररक्षणातील चुका महागात पडल्या?
भारताच्या गोलंदाजांची कामगिरी समाधानकारक ठरली, फलंदाजांनी मात्र निराशा केली. केवळ कर्णधार हरमनप्रीत (४ सामन्यांत १५० धावा) याला अपवाद ठरली. क्षेत्ररक्षणातील चुकांचाही भारताला पुन्हा मोठा फटका बसला. विश्वचषकापूर्वी भारतीय महिला संघाचे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) विशेष शिबीर आयोजित करण्यात आले होते. यात क्षेत्ररक्षण आणि तंदुरुस्तीतील सुधारणेवर भर देण्यात आला. मात्र, श्रीलंकेविरुद्ध राधा यादवचा उत्कृष्ट झेल वगळता भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण निराशाजनकच होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यानंतर प्रशिक्षक मुझुमदार यांनी ‘आम्ही काही झेल पकडले असते, तर ऑस्ट्रेलियाच्या १०-१५ धावा कमी झाल्या असत्या आणि आम्ही कदाचित जिंकलो असतो’ असे वक्तव्य केले.
तिसऱ्या क्रमांकाचा पेच सोडविण्यात अपयश…
गेल्या वर्षीच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकापासून भारतीय महिला संघाने पाच फलंदाजांना तिसऱ्या क्रमांकावर खेळवून पाहिले होते. यापैकी एकही सातत्यपूर्ण कामगिरी करू न शकल्याने यंदाच्या स्पर्धेत हरमनप्रीतला तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्याचा निर्णय झाला. मात्र, ती दोनच सामन्यांत तिसऱ्या क्रमांकावर खेळली, तर अन्य दोन सामन्यांत जेमिमा रॉड्रिग्जला या क्रमांकावर पाठविण्यात आले. हरमनप्रीतने तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर एकेक अर्धशतक साकारले, जेमिमा मात्र संधीचा फायदा करून घेण्यात अपयशी ठरली.
मनधानाच्या अपयशाचा कितपत फटका?
डावखुऱ्या स्मृती मनधानाला भारताची सर्वांत भरवशाची फलंदाज मानले जाते. मात्र, मोक्याच्या क्षणी खेळ उंचावण्यात ती वारंवार अपयशी ठरते. यंदाच्या स्पर्धेत तिने श्रीलंकेविरुद्ध अर्धशतक साकारले, पण अन्य तीन सामन्यांत निराशा केली. न्यूझीलंडविरुद्ध १२ धावा, पाकिस्तानविरुद्ध ७ धावा, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ६ धावाच तिला करता आल्या. चार सामन्यांत मिळून तिने केवळ १८.७५च्या सरासरीने आणि सर्वांत निराशाजनक म्हणजे ९४.९३च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. मनधानाच्या या अपयशाचा भारताला निश्चित फटका बसला. तिची सलामीची जोडीदार शफाली वर्माही चार सामन्यांत मिळून केवळ ९७ धावा करू शकली. शफालीने गेल्या १४ ट्वेन्टी-२० सामन्यांत केवळ एक अर्धशतक केले आहे. त्यामुळे तिच्या कामगिरीत मोठी सुधारणा आवश्यक आहे.
आगामी काळात काय बदल गरजेचे?
भारतीय महिला संघ प्रगतीपथावर असला, तरी अजूनही मोठ्या स्पर्धांमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध अडचणीत सापडताना दिसतो. गेल्या दोन ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धांत अनुक्रमे अंतिम आणि उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावे लागल्याने भारताचे जेतेपदाचे स्वप्न अधुरे राहिले. यंदा पुन्हा ऑस्ट्रेलियानेच भारताचा मार्ग रोखला. ऑस्ट्रेलियावर दडपण आणायचे झाल्यास अतिशय आक्रमकपणे आणि निडरपणे खेळ करणे गरजेचे असल्याचे भारतीय पुरुष संघाने यंदाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात दाखवून दिले होते. रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाच्या नामांकित गोलंदाजांवर अगदी पहिल्या षटकापासून हल्ला चढवला. आता असाच काहीसा खेळ करण्याबाबत भारतीय महिला संघाने विचार करणे गरजेचे आहे. तसेच भविष्याच्या दृष्टीने संघ तयार करण्यासाठी ३५ वर्षीय हरमनप्रीतच्या जागी आता मनधानाची कर्णधारपदी निवड करण्याबाबत विचार झाला पाहिजे. मनधानाच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळूूरुने महिला प्रीमियर लीगच्या (डब्ल्यूपीएल) गेल्या हंगामात जेतेपद पटकावले होते. त्यामुळे तिचे नेतृत्वगुण सिद्ध झाले आहेत. तसेच क्षेत्ररक्षणात सुधारणा होण्यासाठी आणखी काय करता येईल, याचाही विचार होणे निश्चितपणे गरजेचे आहे.