भारताने दुसऱ्या उपांत्य सामन्यात गतविजेत्या इंग्लंड संघाला पराभूत करत ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेटची अंतिम फेरी गाठली. तर, दक्षिण आफ्रिकेने पहिल्या उपांत्य लढतीत अफगाणिस्तानवर एकतर्फी विजय नोंदवला. उभय संघांतील अंतिम सामना शनिवारी बार्बाडोस येथील ब्रिजटाऊन येथे पार पडेल. दोन्ही संघ विश्वचषक स्पर्धेत अजूनपर्यंत अपराजित राहिले आहे. पण काही वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिका आणि आता भारत या दोन्ही संघांवर ‘चोकर्स’ अशा शिक्का बसला आहे. दोन्ही संघांच्या जमेच्या बाजू व कच्चे दुवे याचा आढावा…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास…

भारताने स्पर्धेच्या साखळी फेरीत आयर्लंड, पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान व अमेरिका यांना पराभूत करत गटात अव्वल स्थान मिळवले.  ‘अव्वल आठ’ फेरीतील सामन्यातही भारताने आपली लय कायम राखताना अफगाणिस्तान, बांगलादेश व ऑस्ट्रेलिया संघांना नमवत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. उपांत्य लढतीतही भारताने चमकदार कामगिरी करताना इंग्लंडवर विजय नोंदवला. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेने साखळी फेरीत श्रीलंका, नेदरलँड्स, बांगलादेश, नेपाळ संघांवर विजय मिळवला. ‘अव्वल आठ’ फेरीत त्यांनी अमेरिका, इंग्लंड व वेस्ट इंडिज संघांना नमवत उपांत्य फेरीत स्थान मिळवले. तर, उपांत्य फेरीच्या एकतर्फी लढतीत आफ्रिकेने अफगाणिस्तानला नमवत प्रथमच अंतिम फेरी गाठली.

हेही वाचा >>>कॉलेजमधील हिजाबबंदीचं मुंबई उच्च न्यायालयाने का केलं समर्थन?

भारताची गोलंदाजांवर मदार

भारतीय गोलंदाजांनी खऱ्या अर्थाने या विश्वचषक स्पर्धेत आपली छाप पाडली आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग १५ बळींसह विश्वचषक स्पर्धेतील दुसरा यशस्वी गोलंदाज आहे. तसेच, जसप्रीत बुमरानेही प्रतिस्पर्धी संघांच्या फलंदाजांना चांगलेच अडचणीत आणले आहे. त्यानेही १३ बळी मिळवत संघासाठी निर्णायक कामगिरी बजावली आहे. न्यूयॉर्क येथील साखळी फेरीत संघात स्थान न मिळालेल्या  चायनामन कुलदीप यादवने विंडीज येथे ‘अव्वल आठ’ फेरी व उपांत्य सामन्यात चमकदार कामगिरी करत अवघ्या ४ सामन्यांत १० गडी बाद केले. यासह अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्या यांनी निर्णायक क्षणी संघासाठी योगदान दिले आहे.

रोहित, विराट, सूर्यकुमारकडून अपेक्षा

भारताकडून आतापर्यंत कर्णधार रोहित शर्माने सात सामन्यांत २४८ धावा करत आपले योगदान दिले. यामध्ये ऑस्ट्रेलिया व इंग्लंडविरुद्धची अर्धशतकी खेळी ही संघासाठी निर्णायक ठरली. अंतिम सामन्यातही त्याच्यावर संघाच्या फलंदाजीची जबाबदारी असेल. संघ चांगली कामगिरी करता असला, तरीही प्रमुख फलंदाज विराट कोहलीची बिघडलेली लय संघासाठी चिंतेचा विषय ठरताना दिसत आहे. इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीतीही त्याला चमक दाखवता आली नाही. अंतिम सामन्यात संघाला त्याच्याकडून अपेक्षा असतील. दुखापतीनंतर पुनरागमन केल्यानंतर ऋषभ पंतने (७ सामन्यांत १७१ धावा) फलंदाजी व यष्टिरक्षणातही आपले योगदान दिले आहे. सूर्यकुमार यादवनेही (७ सामन्यांत १९६ धावा) निर्णायक क्षणी संघासाठी योगदान दिले आहे. शिवम दुबेलाही आपला प्रभाव पाडता आलेला नाही. त्यामुळे संघ व्यवस्थापन त्याला अंतिम सामन्यात संधी देते की दुसरा पर्याय शोधते याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. भारताला गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. त्यातच भारताने अखेरची ‘आयसीसी’ स्पर्धा चॅम्पियन्स करंडकाच्या रुपाने २०१३ मध्ये जिंकली होती. त्यामुळे यावेळी भारतीय संघ हा जेतेपदाचा दुष्काळ संपविण्याचा प्रयत्न करेल.

हेही वाचा >>>ट्रम्प बोलले रेटून खोटे, बायडेन सत्यकथनातही अडखळले… पहिल्या निवडणूक ‘डिबेट’मध्ये कोणाची बाजी?

आफ्रिका ‘चोकर्स’चा शिक्का पुसणार का?

दक्षिण आफ्रिकेचा संघ जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम संघांपैकी एक समजला जातो. मात्र, त्यांना अजून एकदाही ‘आयसीसी’ स्पर्धांचे जेतेपद मिळवता आलेले नाही. नेहमीच उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला प्रथमच अंतिम फेरीत स्थान मिळाले. त्यामुळे आपला ‘चोकर्स’चा ठपका ते पुसतील का, याकडे सर्वांचे लक्ष राहील. त्यांच्या गोलंदाजांनी संघासाठी योगदान दिले आहे. वेगवान गोलंदाज आनरिख नॉर्किएने संघासाठी ८ सामन्यांत १३ बळी मिळवले होते. तर, कगिसो रबाडानेही १२ गडी बाद करत त्याला चांगले सहकार्य केले आहे. तबरेझ शम्सीने विंडीजच्या खेळपट्टीवर आपला प्रभाव पाडताना ४ सामन्यांत ११ बळी मिळवत चमक दाखवली. यासह डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराजने विंडीजच्या खेळपट्ट्यांवर आपला प्रभाव पाडला आहे. त्यामुळे भारतासमोर शम्सी, महाराज यांचे आव्हान असेल.

डिकॉक, क्लासन, मिलरवर भिस्त

दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनीही आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले. त्यामुळे भारताविरुद्ध खेळताना सलामीवीर क्विटंन डिकॉकवर (८ सामन्यांत २०४ धावा) संघाला चांगली सुरुवात देण्याची जबाबदारी असेल. यासह संघात हेन्रिक क्लासन, डेव्हिड मिलर व एडीन मार्करम सारखे खेळाडू आक्रमक खेळी करण्यास सक्षम आहेत. तसेच, संघात अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असल्याने फलंदाजीचे पर्याय उपलब्ध आहेत. युवा खेळाडू मार्को यान्सन व ट्रिस्टन स्टब्स यांनीही स्पर्धेत आपल्या कामगिरीने प्रभाव पाडला आहे. त्यामुळे संघाला पहिले ‘आयसीसी’ जेतेपद मिळवायचे झाल्यास सर्वांना एकत्रितपणे चांगली कामगिरी करावी लागेल.

खेळपट्टी कशी असेल?

ब्रिजटाऊनच्या केनसिंग्टन ओव्हल येथील खेळपट्टीवर आतापर्यंत ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आठ सामने खेळले गेले आहेत. तसेच, ही खेळपट्टी गोलंदाजी व फलंदाजी दोन्हींसाठी अनुकूल असेल. भारताने या मैदानात अफगाणिस्तानला पराभूत केले होते. विंडीजमधील अन्य खेळपट्ट्यांच्या तुलनेने येथे मोठी धावसंख्या पाहण्यास मिळते. त्यामुळे अंतिम सामन्यात १७० पेक्षा अधिक धावा केल्यास ती चांगली धावसंख्या असू शकेल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta explained who will win the india vs south africa final in twenty20 world cup cricket tournament print exp amy
First published on: 28-06-2024 at 14:49 IST