अनेक वर्षे काँग्रेसमध्ये असलेले व अलीकडेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले राज्यमंत्री झियाउद्दीन ऊर्फ बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागील नेमके कारण कळू शकलेले नाही. अभिनेता सलमान खान याच्यासोबतची मैत्री त्यांना भारी पडली का, सलमानला दहशत निर्माण करण्यासाठी सिद्दीकी यांची लॅारेन्स बिश्नोई टोळीने हत्या केली की आणखी काय कारण आहे, हे उघड होईल की नाही याचीही कल्पना नाही. कारण आतापर्यंत झालेल्या बहुतांश राजकीय हत्यांमागे राजकारण वगळता अन्य कारणे होती, हे स्पष्ट झाले आहे. आरोपींना अटक झाली. परंतु हेतू कधीच समोर आला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कृष्णा देसाई यांची हत्या राजकीयच…

१९६६ मध्ये स्थापन झालेल्या शिवसेनेचा मुंबईत प्रभाव वाढला होता. दाक्षिणात्यांविरुद्धच्या चळवळीला मराठी माणसांचा जोरदार पाठिंबा मिळत होता. अशा वेळी मुंबईत बऱ्यापैकी पकड असलेल्या कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आणि शिवसैनिकांमध्ये दररोज राडा पडत होता. या टोकाच्या वैमनस्यातून कम्युनिस्ट पक्षाचे लालबाग-परळ परिसरातील आमदार कॉम्रेड कृष्णा देसाई यांची तावरीपाडा (लालबाग) येथे चाकू-तलवार, गुप्तीचा वापर करून निर्घृण हत्या करण्यात आली. देसाई हे प्रकृतीने बलदंड होते तसेच संरक्षणासाठी त्यांच्याभोवती सतत कराटेपटूंचा राबता असायचा. परंतु शिवसैनिकांनी हे संरक्षण कवच भेदून देसाई यांची हत्या केली. त्यावेळी प्रकाश पाटकर हा त्यांचा सहकारीही गंभीर जखमी झाला. या प्रकरणी चंदू वाईरकर ऊर्फ चंदू मास्टर, अशोक कुलकर्णी, दिलीप हाटे, नारायण शेडगे, विट्या खटाटे यांना काळाचौकी पोलिसांनी अटक केली. परंतु त्यानंतर कम्युनिस्ट पक्षाची मुंबईत जी पडझड सुरू झाली ती थांबली नाही. शिवसेना मात्र फोफावली. ही राजकीय हत्या म्हणता येईल. 

हेही वाचा >>>विश्लेषण: ‘डिजिटल पेमेंट’चा वापर भारतात किती, कसा वाढतो आहे?

गुंड टोळीकडून पहिली हत्या…

शिवसेनेचे आमदार विठ्ठल चव्हाण यांची २२ मार्च १९९२ रोजी रात्री दहाच्या सुमारास झालेली हत्या ही गुंड टोळीकडून झालेली एका आमदाराची पहिली हत्या म्हणता येईल. लालबाग-परळ भागात दहशत असणाऱ्या दुबईस्थित गुरु साटमच्या इशाऱ्यावरून चव्हाण यांची हत्या करण्यात आली. संतोष ठाकूर ऊर्फ पोत्या, बच्चा रावळ, प्रल्हाद पेडणेकर, अनिल देसाई ऊर्फ आरके, नितीन आंगणे हे चव्हाण यांच्या परळ येथील घरात गेले होते. अर्धा तास चर्चा केल्यानंतर बोलणी फिस्कटल्याने त्यांनी चव्हाण यांना गोळ्या घातल्या. कारदार गॅरेजच्या वादातून ही हत्या झाल्याचे बोलले जात होते. परंतु खरे कारण कळू शकले नाही. चव्हाण यांच्या या हत्येमुळे राज्यकर्ते मात्र हादरून गेले. त्यानंतर लोकप्रतिनिधीही गुंड टोळ्यांचे लक्ष्य ठरल्याच्या अनेक घटना घडल्या. राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या हत्या झाल्या. परंतु राजकीयपेक्षा अन्य कारणेच त्यामागे होती.

त्याधी नगरसेवकही लक्ष्य…

१२ जून १९८७ मध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक रुसी मेहता यांची हत्या करण्यात आली होती. स्कूटरवरून घरी परतत असताना पंजाबमधील मोटरसायकलस्वारांनी त्यांना गोळ्या घातल्या. बेकायदा बांधकामात रस घेतल्यामुळे त्यांच्या हत्येची सुपारी देण्यात आली होती. त्यांचे मारेकरी सापडले नाहीत. शिवसेनेचे नगरसेवक विनायक वाबळे यांची कुख्यात गुंड सुरेश मंचेकरने साथीदारांसह दिवसाढवळ्या हत्या केली. बेकायदा झोपड्या तोडल्याचे निमित्त झाले. शिवसेनेचे बहुचर्चित नगरसेवक के. टी. थापा यांची २३ एप्रिल १९९२ या दिवशी छोटा राजन टोळीने हत्या केली ते दाऊद टोळीतील त्यांचे वाढते वर्चस्व खुपत होते म्हणून. काँग्रेसचे नगरसेवक अशोक पिसाळ यांना १० सप्टेंबर १९९२ या दिवशी आमदार चव्हाण यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या पोत्या ठाकूरने ठार केले. ही हत्या मालमत्तेच्या वादातून झाल्याचा दावा करण्यात आला होता. शिवसेनेचे नगरसेवक केदारी रेडेकर यांची चिंचपोकळी येथे जागेच्या वादातून हत्या झाली. कांदिवली पूर्वेतील शिवसेनेचे नगरसेवक माजी नगरसेवक अशोक सावंत, साकीनाका येथील नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्यांमागेही अशीच कारणे होती.  

हेही वाचा >>>मुनव्वर फारुकी लॉरेन्स बिष्णोईच्या हिटलिस्टवर का आहे?

गुंड टोळ्यांनाच सुपारी…

मुस्लिम लीगचे माजी आमदार झियाउद्दीन बुखारी यांची अरुण गवळी टोळीतील गुंडांनी हत्या केली. बुखारी यांनी दगडी चाळ बॅाम्बस्फोटाने उडविण्याचा कट रचला होता म्हणून बुखारी यांना ठार मारले असे त्यावेळी पोलिसांना सांगितले गेले. परंतु जाणकार वेगळेच कारण सांगतात. शिवसेनेचे विधान परिषदेतील आमदार व कामगार नेते रमेश मोरे यांची हत्या हा शिवसेनेला मोठा हादरा होता. जातीय दंगलीत सक्रिय असल्यामुळे दाऊद टोळीने त्यांचा काटा काढला असा कयास सुरुवातीला बांधण्यात आला. परंतु मोरे यांची हत्या गवळी टोळीने केल्याचे स्पष्ट झाले. खंबाटा एअरलाईन्समध्ये भारतीय कामगार सेनेची युनियन होती व त्याचे मोरे प्रमुख होते. लोडर म्हणून घुसवलेल्या दगडी चाळीतील तरुणांना मोरे यांनी कामावरून काढून टाकल्याचा राग वा अमर नाईकाशी असलेली जवळीक मोरे यांना भोवली, असा पोलिसांच्या तपासाचा सूर होता. खरे कारण कधीच बाहेर आले नाही. मोरे यांची हत्या २९ मे १९९३ रोजी झाली. त्यानंतर दोनच दिवसांनी भाजपचे आमदार प्रेमकुमार शर्मा यांना दक्षिण मुंबईतील बेकायदा बांधकामाविरुद्ध आवाज उठविल्याची ‘शिक्षा’ भोगावी लागली. दाऊदचा मुर्गी मोहल्लातील हस्तक अंदाज पठाण याने ही हत्या घडवून आणली. त्यानंतर आमदारांना कमांडोंचे संरक्षण देण्यात आले. तरीही २५ सप्टेंबर १९९४ या दिवशी कार्बाइनधारी कमांडोच्या संरक्षणात फिरणारे भाजपचे नेते रामदास नायक यांची हत्या छोटा शकीलने फिरोज कोकणी या गुंडामार्फत एक-५६ रायफलबरोबर वापर करून घडवून आणली. कमांडोच्या शरीराचीही चाळण झाली. जातीय विद्वेष पसरविण्याचे काम नायक करीत असल्याचामुळे त्यांचा काटा छोटा शकीलने काढला, अशी वदंता यामागे होती.

डॉ. दत्ता सामंतांची हत्या…

१६ जानेवारी १९९७ रोजी आक्रमक कामगार नेते व माजी खासदार डॉ. दत्ता सामंत यांची हत्या कामगार संघटनांतील अंतर्गत वैमनस्यातून करण्यात आली. डोंबिवली येथील प्रिमिअर कंपनीमध्ये डॉ. सामंत यांनी संप पुकारला होता. कंपनीतील अंतर्गत युनियनचे नेते रमेश पाटील याने संप फोडला. त्यामुळे डॉ. सामंत चिडले व त्यांनी रमेश पाटीलला मारण्याची सुपारी दिली, अशी अफवा पसरली होती. अशा वेळी रमेश पाटील यानेच छोटा राजनमार्फत गुरु साटमला डॉ. सामंत यांच्या हत्येची सुपारी दिली, असा पोलिसांचा कयास. खरे कारण गुलदस्त्यातच राहिले. पण या हत्येमुळे छोटा राजनची दहशत मात्र वाढली. त्यानंतरही अनेक शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांच्या हत्या झाल्या. कारणे प्रत्येक वेळी वेगवेगळी होती. राजकीय वैमनस्यापेक्षाही अंतर्गत दुश्मनीच कारणीभूत ठरली.

हत्या राजकीय पण कारणे वेगळीच…

आतापर्यंत आजी-माजी आमदार, नगरसेवक आदी हत्या या राजकारणातून नव्हे तर वैमनस्यातून वा मक्तेदारीच्या राजकारणातून झाल्याचे दिसून येते. लोकप्रतिनिधी कधी नव्हे इतके वेगवेगळ्या व्यवसायात शिरू लागले व तेथे खटके उडू लागले आहेत. त्यातून गुंड टोळ्यांना सुपाऱ्या देण्यात आल्या तर काही वेळा गुंड टोळ्यांनी आपली दहशत निर्माण करण्यासाठी हत्या घडवून आणल्या. मुंबई पोलिसांनी गुंड टोळ्या नेस्तनाबूत केल्यानंतर हे प्रकार थांबले होते. मात्र बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे त्याकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे. काही दिवसांपूर्वी अशाच राजकीय पदाधिकाऱ्यांच्या हत्या झाल्या होत्या. बाबा सिद्दीकी हत्येमुळे लॉरेन्स बिश्नोई टोळी सक्रिय झाल्याचे हे द्योतक आहे. हत्येमागील नेमके कारण काय आहे हे स्पष्ट झालेले नाही. हत्येमागील नेमका हेतू कधीच बाहेर येत नाही हेही तितकेच खरे आहे. आमदाराची हत्या करून दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे हे मात्र नक्की.

nishant.sarvankar@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta explained why are political leaders killed apart from politics there are other reasons behind the murder print exp amy
Show comments