हिवाळ्यामध्ये इन्फ्लूएन्झाचा वेगाने प्रसार होतो आणि त्यामुळे रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होते. भारतात इन्फ्लूएन्झाच्या रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना ‘सदर्न हेमीस्फिअर क्वॉड्रीवॅलेंट २०२४’ (एसएच२४) ही लस देण्याचे निर्देश दिले आहेत. ही लस उपलब्ध नसल्यास सध्या उपलब्ध असलेली उत्तम लस नागरिकांना देण्यात यावी, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने असे निर्देश का दिले आहेत, भारतात इन्फ्लूएन्झाचे किती रुग्ण आहेत, हा आजार जीवघेणा आहे का, याविषयी…
इन्फ्लूएन्झा लशीविषयी काय निर्देश?
हिवाळ्यात संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते. इन्फ्लूएन्झा विषाणूचा या काळात वेगाने प्रसार होतो. गेल्या काही दिवसांत देशात या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य विभागाने क्वॉड्रीवॅलेंट फ्लू जॅब्सची शिफारस केली आहे. ‘सदर्न हेमीस्फिअर क्वॉड्रीवॅलेंट २०२४’ (एसएच२४) नावाने ओळखली जाणारी ही लस देण्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. ही लस चार प्रकारच्या इन्फ्लूएन्झा प्रकारांपासून संरक्षण करते. जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशीच्या आधारे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हे निर्देश जारी केले आहेत. ही लस उपलब्ध नसल्यास इन्फ्लूएन्झाची उत्तम लस देण्यास यावी, असेही आरोग्य मंत्रालयाने निर्देश दिले आहेत.
हेही वाचा >>>कॅनडात शिक्षणासाठी जाणे कठीण, फास्ट ट्रॅक व्हिसावर घातली बंदी; याचा भारतीय विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार?
इन्फ्लूएन्झा म्हणजे काय?
इन्फ्लूएन्झा किंवा फ्लू हा विशिष्ट हंगामात बळावणारा संसर्गजन्य आजार असून पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये जास्त दिसून येतो. हा विषाणूमुळे होणार आजार असून विषाणूचे विविध प्रकार (स्ट्रेन) दरवर्षी आजारांना कारणीभूत ठरतात. संसर्गजन्य असणारे हे विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज पसरतात. इन्फ्लूएन्झा विषाणूचे ए, बी, सी असे तीन प्रकार आहेत. इन्फ्लूएन्झाच्या ‘ए’ प्रकारामध्ये स्वाइन फ्लूचा समावेश आहे. फ्लू आणि सामान्य सर्दीची लक्षणे सारखीच दिसतात. मात्र फ्लूची लक्षणे वेगाने दिसून येतात. ताप, डोकेदुखी, उलट्या होणे, घसा खवखवणे, खोकला, थंडी वाजणे, पोटदुखी, अतिसार, अशक्तपणा, अंगदुखी यांपैकी काही लक्षणे इन्फ्लूएन्झा आजारात दिसतात. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यास या आजाराशी लढणे कठीण होते. इन्फ्लूएन्झापासून बचाव करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यासंबंधी लस दरवर्षी घेणे हाच आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा काय?
इन्फ्लूएन्झा हा आजार चिंताजनक होऊ शकतो. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केली आहे की दरवर्षी एकदा तरी इन्फ्लूएन्झाची लस घ्यावी. उत्तर गोलार्धातील नागरिकांनी फेब्रुवारीमध्ये आणि दक्षिण गोलार्धातील नागरिकांनी सप्टेंबरमध्ये लस घ्यावी, असे डब्ल्यूएचओ सुचवते. डब्ल्यूएचओच्या मते, फेब्रुवारीपासून भारत, युरोप, पश्चिम आशिया, दक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि मादागास्करमध्ये ‘एच१एन१’ इन्फ्लूएन्झा विषाणूंचे प्राबल्य आहे.
हेही वाचा >>>डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
क्वॉड्रीवॅलेंट लशीची शिफारस का?
हिवाळ्यामध्ये इन्फ्लूएन्झासाठी पोषक वातावरण असल्याने त्याचा प्रसार अधिक होतो. त्यामुळे त्याला आळा घालण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने ही लस घेण्याची शिफारस केली आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राच्या मते भारतातील फ्लू विषाणूंच्या अलीकडील चाचणीत ते जगभरात पसरणाऱ्या प्रकारांशी जुळतात. हे फ्लू स्ट्रेन डब्ल्यूएचओने शिफारस केलेल्या दक्षिण गोलार्ध २०२४ फ्लू लशीमध्ये समाविष्ट असलेल्या नागरिकांशी संरेखित करतात. यातून असे दिसते की, या हंगामात अपेक्षित असलेल्या सर्वात सामान्य फ्लू स्ट्रेनपासून ही लस प्रभावीपणे लोकांचे संरक्षण करेल. याव्यतिरिक्त, चाचणीने असे दर्शवले आहे की, हे फ्लूचे विषाणू न्यूरामिनिडेस इनहिबिटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अँटीव्हायरल औषधांना पूर्णपणे प्रतिसाद देतात, म्हणजे या श्रेणीतील सध्याची औषधे फ्लूच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी प्रभावी आहेत.
इन्फ्लूएन्झाविषयी आकडेवारी काय?
इन्फ्लूएन्झासारख्या हंगामी फ्लूमुळे जगभरात दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. काही गंभीर प्रकरणांमध्ये, फ्लूमुळे न्युमोनिया, पक्षाघात आणि हृदयविकाराचा झटका यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागू शकते, जे प्राणघातक असतात. फ्लूमुळे दरवर्षी चार लाख जणांचे श्वसन आजारामुळे आणि तीन लाख जणांचे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांमुळे मृत्यू होतात. भारतात या वर्षी ऑगस्टपर्यंत १५ हजार इन्फ्लूएन्झा प्रकरणे आणि २३९ मृत्यूंची नोंद झाली आहे. राष्ट्रीय रोगनियंत्रण केंद्राच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात या वर्षी मे महिन्यापर्यंत ३७९ जणांना लागण झाली, तर १५ मृत्यूंची नोंद आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये हीच संख्या १५४३ आहे. महाराष्ट्रात २०२२ मध्ये ३७१४ जणांना लागण झाली, तर २१५ जणांचा मृत्यू झाला, तर गेल्या वर्षी १२३१ रुग्णसंख्या होती, तर मृत्यूसंख्या ३२ होती.
sandeep.nalawade@expressindia.com