२०२५च्या कारवाईत विशेष काय?

आतापर्यंत बहेलिया टोळीने केलेल्या वाघांच्या शिकारी आणि बावरिया टोळीने केलेला त्याचा व्यापार यात भारतातून फार मोठ्या व्यक्ती वा सरकारी खात्यांतील व्यक्ती गुंतल्याची माहिती नव्हती. मात्र, २०२५ मध्ये उघडकीस आलेल्या वाघांच्या शिकारीत थेट सैन्यदलातील जवान गुंतल्याचे दिसून आले. २०१५ मध्ये आसाम रेजिमेंटमधून निवृत्त झालेले लालनेईसुंग आणि आसाम रायफल्सचे जवान कप लियान मुंग यांना अटक करण्यात आली. ते कथितपणे म्यानमार वंशाच्या त्यांच्या पत्नी निंग सॅन लुनला मदत करत होते. निंगच्या भ्रमणध्वनीवरून वाघ व इतर प्राण्यांच्या अवयवांची ५०० हून अधिक छायाचित्रे आढळली. आता ही छायाचित्रे, वाघांच्या तपशिलांशी विशेष सॉफ्टवेअरने जुळवून पाहिली जात आहेत.

मारलेल्या वाघांच्या अवयवांची वाहतूक पकडली कशी जात नाही?

जुन्या पद्धतीत बरेचदा वाघांच्या अवयवांची वाहतूक करताना वास येत असे. त्यामुळे ही तस्करी पकडली जाण्याच्या शक्यता अधिक होत्या. आता मात्र, तस्करांनी वाघांच्या अवयवांची वाहतूक करताना वास येऊ नये म्हणून किंवा तो कमी असावा आणि वाहतूक करताना त्याची ओळख पटू नये म्हणून ताज्या हाडांवर तुरटीची पावडर लावण्यास सुरुवात केली आहे. ताज्या हाडांची मागणी चिनी ‘टायगर बोन वाईन’साठी बरीच असते. शिवाय व्हिएतनाममध्ये वाघांच्या हाडांचा गोंदासारखा चिकट पदार्थ लोकप्रिय आहे. हा गोंद तुलनेने जुन्या किंवा कोरड्या हाडांना इतर घटकांसह शिजवून बनवला जातो. संधिवात आणि संधिवातावर उपचार करण्यासाठी तो वाइनमध्ये मिसळला जातो.

तस्करीसाठी कोणत्या मार्गांचा वापर?

वाघ अवयवांच्या तस्करीसाठी तस्कर आता मध्यस्थांऐवजी वाहतूक सेवांचा आधार घेतात. यामुळे जोखीम कमी होऊन नफ्यात वाढ होते. ईशान्येकडे कातडी आणि हाडे वाहून नेण्याऐवजी ते अनेकदा साठवणुकीची सुविधा असलेल्या वाहतूकदारांकडून मालवाहतूक नोंदणी करून ठेवतात. नंतर ते गुवाहाटीला पोहोचण्यासाठी रेल्वे किंवा विमानाने प्रवास करतात. पोहोचल्यानंतर माल आपल्या ताब्यात घेऊन शिलाँगला गाडी चालवत जातात आणि वाघांच्या अवयवांचे वितरण करतात. उत्तरेकडील राज्यांमधून अजूनही पारंपरिक नेपाळ मार्गाने माल नेला जातो. प्रामुख्याने उत्तर प्रदेशच्या महाराजगंजमधील सुनौली-बेलाहिया सीमेवरून, किंवा उत्तराखंडच्या पिठोरागडमधील महाकाली-दारचुला सीमेवरून आणि पश्चिम बंगालमधील सिलिगुडीमधून देखील वाघांच्या अवयवांची वाहतूक केली जाते.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कितपत वापर?

मध्य प्रदेशातील बहेलिया ही शिकारी जमात पिढ्यानपिढ्या वाघांच्या शिकारीत आहे. महाराष्ट्रात नुकत्याच उघडकीस आलेल्या वाघांच्या शिकार प्रकरणात बहेलियांची चौथी पिढी गुंतली आहे. या टोळ्यांतील लोकांचे शिक्षण अक्षर आणि आकड्यांची ओळख इथपर्यंतच असते. त्यांच्या राहणीमानावरून त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान, समाजमाध्यम याचे ज्ञान असेल असे वाटत नाही. प्रत्यक्षात ते आंतरजालाचे (इंटरनेट) जाणकार आहेत. समाजमाध्यमावर सक्रिय आहेत. त्यांना बँकेचे व्यवहार लीलया हाताळता येतात. ऑनलाइन देयकांचा व्यवहार करता येतो. मालवाहतूक, विमानाच्या तिकिटाची नोंदणी त्यांना करता येते. बरेचदा ते ‘झीरो बँक बॅलन्स’ खात्यांचा वापर करतात. पैसे सहसा ‘आयएमपीएस’द्वारे टप्प्याटप्प्यांत हस्तांतरित करतात. या शिकाऱ्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य पैसे मिळवण्यासाठी स्वतंत्र खाती ठेवतात.

केंद्रीय पातळीवरील यंत्रणा का हादरल्या?

गेल्या दीड महिन्यापासून वाघांच्या शिकारीचे हे प्रकरण सुरूच आहे. शेकडो वाघांची शिकार बहेलियांनी केल्याचा संशय आहे. आतापर्यंत दोनदा उघडकीस आलेल्या वाघांच्या शिकार प्रकरणांपेक्षाही हे प्रकरण मोठे असल्याची कुणकुण सुरुवातीलाच लागली. शेकडो वाघांच्या शिकारीसोबतच कोट्यवधीचा व्यवहार हवालाच्या माध्यमातून झालेला आहे. त्यामुळेच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील वनाधिकाऱ्यांनी आणि केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग (वाइल्डलाइफ क्राइम कंट्रोल ब्युरो) यांनी हे अटकसत्र राबवले. यात प्रामुख्याने म्यानमार सीमेवरून काम करणाऱ्या एकाची ओळख पटली आहे. हवालाचा उल्लेख आल्यामुळे एकूणच प्रकरणाच्या तपासप्रक्रियेत केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय), तसेच सक्तवसुली संचालनालय (ईडी) या यंत्रणादेखील सहभागी झाल्या आहेत.