राहुल खळदकर
महाराष्ट्रातील गावरान लसणाच्या लागवडीत गेल्या काही वर्षांपासून घट झाल्यामुळे परराज्यातील लसूण उत्पादक शेतकऱ्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. आजमितीला राज्यातील सर्वच बाजार आवारात परराज्यातील लसूण उत्पादक शेतकऱ्यांची मक्तेदारी आहे. लसणाला सध्या उच्चांकी दर मिळत आहेत. लसूण महाग झाल्याने गृहिणींचे अंदाजपत्रक कोलमडले आहे. महाराष्ट्रातील लसूण लागवड गेल्या काही वर्षांपासून कमी झाल्याने लसणाचे दर तेजीत आहेत.
लसूण उत्पादनात मक्तेदारी कोणाची?
गेल्या काही वर्षांपासून मध्य प्रदेश आणि गुजरातमधील शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणावर लसूण लागवडीस प्राधान्य दिल्याने राज्यातील स्थानिक बाजारपेठेत परराज्यांतील लसूण उत्पादकांनी मक्तेदारी निर्माण केली आहे. गुजरात, मध्य प्रदेशातून संपूर्ण देशभरात लसूण विक्रीस पाठविला जातो. लसूण नगदी पीक असून, बारमाही मागणीमुळे मध्य प्रदेश, गुजरातमधील शेतकऱ्यांनी लसूण लागवडीस प्राधान्य दिले आहे.
हेही वाचा >>>‘माऊस फिव्हर’ म्हणजे काय? ज्याचा रशियन सैनिकांना करावा लागतोय सामना!
महाराष्ट्रात लागवड कमी का?
पुणे विभागात गेल्या २० ते २५ वर्षांत कांदा लागवडीच्या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली. त्या तुलनेत पुणे, नगर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर भागातील शेतकऱ्यांनी लसणाची लागवड वैयक्तिक वापर, तसेच स्थानिक बाजारपेठेतील मागणी विचारात घेऊन केली. काही वर्षांपूर्वी पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात गावरान लसणाची मोठय़ा प्रमाणावर आवक होत असे. कालांतराने गावरान लसणाची आवक कमी होत गेली. महाराष्ट्रात लसणाला मोठी मागणी आहे. मागणीच्या तुलनेत लसणाची आवक कमी प्रमाणावर होत गेल्याने गुजरात आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी लसूण विक्रीस पाठविण्यास सुरुवात केली.
शेतकऱ्यांचे चुकले काय?
पुणे जिल्ह्यातील राजगुरू नगर येथे भारतीय कृषी संशोधन संस्थेची राष्ट्रीय कांदा आणि लसूण संशोधन संस्था आहे. या संस्थेची स्थापना १९९७ मध्ये करण्यात आली. या संस्थेत कांदा आणि लसूण या पिकांवर संशोधन केले जाते. उत्पादन वाढीसाठी संशोधन केले जाते. २० ते २५ वर्षांपूर्वी गावरान लसणाची लागवड पुणे जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर केली जात होती. गेल्या काही वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, तसेच नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणावर कांदा लागवडीस प्राधान्य दिले. कांदा लागवडीतून चांगली रक्कम मिळत असल्याने शेतकऱ्यांनी लागवडीचे प्रमाण कमी केले. त्यामुळे महाराष्ट्रातील बाजारपेठेतून गावरान लसूण दिसेनासा झाला.
हेही वाचा >>>बिहार खरंच सीतेचे जन्मस्थान आहे का? काय सांगतात पौराणिक संदर्भ?
गावरान लसणाचे फायदे काय?
परराज्यातील लसणाच्या तुलनेत गावरान लसणाचे सेवन आरोग्याच्या दृष्टीने चांगले मानले जाते. आजमितीला महाराष्ट्रातील सर्व बाजार आवारात फक्त परराज्यातील लसणाची आवक होत असून, गावरान लसणाची आवक जवळपास होत नाही.
लसणाच्या तेजीमागची कारणे काय?
किरकोळ बाजारात एक किलो लसणाची विक्री १५० ते २०० रुपये किलो दराने केली जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून लसणाचे दर तेजीत आहेत. दर तीन ते चार वर्षांनी लसूण महाग होतो. गेल्या वर्षी लसणाला कमी दर मिळाला होता. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी लसणाची लागवड केली नाही. त्यामुळे यंदा लसणाचे दर तेजीत आहेत. लसणाचा हंगाम थंडी संपल्यानंतर होतो. सध्या गुजरातमधील लसणाची आवक होत नाही. मध्य प्रदेशातून लसूण विक्रीस पाठविला जात आहे. मागणीच्या तुलनेत लसणाची आवक अपुरी होत असल्याने लसणाच्या दरात गेल्या तीन ते चार महिन्यांपासून टप्प्याटप्प्याने वाढ होत चालली आहे.
दर तेजीत म्हणजे किती चढे?
सध्या किरकोळ बाजारात एक किलो लसणाची विक्री ४०० रुपये दराने केली जात आहे. गेल्या काही वर्षांत लसणाला मिळालेला हा उच्चांकी दर आहे. घाऊक बाजारात सध्या दहा किलो लसणाचे दर प्रतवारीनुसार १५०० ते २५०० रुपयांपर्यंत आहे.
तेजी किती दिवस राहणार?
पुणे, मुंबईत लसणाला सर्वाधिक मागणी आहे. नवी मुंबई आणि पुण्यातील घाऊक बाजारात दररोज होणारी आवक अपुरी आहे. बाजारात सध्या चार ते पाच टेम्पो एवढी लसणाची आवक होत आहे. जानेवारी महिन्यानंतर नवीन लसणाची आवक सुरू होईल. किमान एक ते दीड महिना लसणाचे दर तेजीत राहणार आहेत.