दत्ता जाधव
राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाने (एनडीडीबीने) ब्राझीलमधून गीर जातीच्या उच्च वंशावळीच्या वळूंपासून तयार केलेल्या वीर्यकांडय़ांची आयात केली आहे. ही आयात का करावी लागली, त्याचे काय परिणाम होतील, या विषयी..
वीर्यकांडय़ांची आयात का केली गेली?
गीर हा गोवंश मुळात भारतीय आहे. प्रामुख्याने गुजरात आणि गुजरातला जोडून असलेल्या महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्येही तो आढळतो. महाराष्ट्रात धुळे, नंदूरबार जिल्ह्यांत गीर गोवंश आढळून येतो. साधारणपणे १९३३ मध्ये पोर्तुगीजांनी गुजरातमधील भावनगर आणि सुरत भागामधून गीर गाई पहिल्यांदा ब्राझीलमध्ये नेल्याचा उल्लेख सापडतो. आजघडीला ब्राझीलमधील एकूण गाईंपैकी ८० टक्के गाई गीर जातीच्या असल्याचे सांगितले जाते. ब्राझीलमध्ये झालेली दुधाची क्रांती ही गीर गोवंशामुळेच झाली असे मानले जाते. त्यामुळे जागतिक दुग्ध उत्पादनात ब्राझील आज पाचव्या क्रमांकावर आहे. भारतीय गाईंच्या दुग्धोत्पादनात वाढ होण्यासाठी ही आयात उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे.
गीर गोवंशाचा विकास ब्राझीलमध्ये का?
सध्या ब्राझीलमध्ये सुमारे ४० लाख गीर गाई आहेत. येथील गीर गाईचे प्रति दिन दूध उत्पादन ३० ते ४० लिटर आहे. काही उच्च वंशावळीच्या गाई प्रतिदिन ६० लिटपर्यंत दूध देतात. चांगल्या दूध देणाऱ्या गाईंच्या पैदाशीसाठी शिस्तबद्ध, नियोजनबद्ध काम ब्राझीलमधील शेतकरी, पशुतज्ज्ञ आणि ब्राझील सरकारने केले आहे. अगदी सुरुवातीपासून भारतातून आणलेल्या गाई आणि वळूंची नोंद, त्यांच्या उत्पादनाच्या शास्त्रीय नोंदी करून ठेवलेल्या आहेत. ब्राझीलमध्ये फाझू हे सरकारी पशुवैद्यकीय महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात प्रामुख्याने भारतीय गोवंशाबाबत संशोधन होते.
हेही वाचा >>>भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात नेताजींच्या आझाद हिंद फौजचे होते महत्त्वपूर्ण योगदान, वाचा सविस्तर..
गीर गाईच्या दूध उत्पादनात किती फरक?
भारतातील गीर गाईचे एक वेतातील (सुमारे २६० दिवस) सर्वसाधारण दूध उत्पादन १,५९० लिटर (दैनंदिन सहा लिटर) आहे. जास्तीत जास्त दूध उत्पादन ३,१८२ लिटर (दैनंदिन बारा लिटर, ४.५ टक्के फॅटसह) मिळाले आहे. गुजरातमध्ये ४,२०० लिटपर्यंत (दैनंदिन १६ लिटर) दूध देणाऱ्या गीर गाई पाहायला मिळतात. राज्यातील विविध सरकारी आणि खासगी संशोधन केंद्रांत सरासरी दैनंदिन २० लिटर दूध देणाऱ्या गाईंच्या पोटी जन्मलेल्या गीर वळूंची पैदास केली जाते. ब्राझीलमध्ये गीर गाईचे एक वेतातील सर्वसाधारण दूध उत्पादन ३,५०० लिटर (दैनंदिन १३ लिटर) आहे. जास्तीत जास्त दूध उत्पादन १७,१२० लिटर (दैनंदिन ६५ लिटर) मिळाले आहे. गीर हा मूळचा भारतीय गोवंश असूनही देशात कमी उत्पादन आणि ब्राझीलमधील गाईंचे सर्वोच्च ६५ लिटपर्यंत दैनंदिन उत्पादन हा विरोधाभास डोळय़ांत अंजन घालणारा आहे.
देशी गोवंश दुग्ध उत्पादनात मागे का?
भारतीय गाई बॉस इंडिकस या वंशाच्या आहेत. त्यात हरियाणा, साहिवाल, गीर, अमृतमहाल, गवळाऊ, देवणी, खिल्लारी, डांगी, कांकरेज, लाल कंधारी, थारपारकर, गुंतुर, ओंगल, गावठी, निमारी, राठी, मालवी, हल्लीकर, वेच्चूर, कंगायम, उंबलाचेरी, बरगूर, केनकाथा, कासारगोड, गंगातीरी, खेरीगढ, नागोरी, मेवाती, सिरी, पंगनुर आदी ४८ प्रकारच्या गाईंचा समावेश होतो. त्यांपैकी सहिवाल, लालसिंधी, गीर या गाईंची प्रामुख्याने दूध उत्पादनासाठी पैदास होते. तर खिल्लार, डांगीसारख्या जातींची पैदास शेतीची कामे, ओढकामांसाठी बैल मिळावेत म्हणून केली जाते.
हेही वाचा >>>विश्लेषण : कॅनडाकडून दोन वर्षांसाठी विद्यार्थी व्हिसात कपात करण्याचा निर्णय; भारतीय विद्यार्थ्यांवर परिणाम होणार?
कृत्रिम रेतनाची गरज का?
कृत्रिम रेतन म्हणजे माजावर आलेल्या मादी जनावराच्या गर्भाशयात सिद्ध वळूचे वीर्य कृत्रिम पद्धतीने योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य साधनाद्वारे सोडणे. कृत्रिम रेतनाचा प्रथम प्रयोग जगामध्ये सन १७८० मध्ये इटलीमध्ये कुत्र्यांमध्ये करण्यात आला. भारतामध्ये पहिला प्रयोग सन १९३९ मध्ये डॉ. संपत कुमार यांनी म्हैसूर येथील पॅलेस डेअरीमध्ये गाईवर केला. त्यानंतर १९४५ मध्ये भारत सरकारने मद्रास, बेंगलोर, कलकत्ता, करनाल व नागपूर येथे कृत्रिम रेतन केंद्रांची सुरुवात केली. महाराष्ट्रात प्रथम कृत्रिम रेतन केंद्र १९४७ मध्ये डॉ. सी. आर. साने यांनी पुणे येथे सुरू केले. कृत्रिम रेतनासाठी सिद्ध वळूचे वीर्य वापरले जाते. सिद्ध वळू म्हणजे आनुवंशिकदृष्टय़ा निरोगी, उच्च उत्पादनक्षमता असणारा वळू. या वळूचे वीर्य कृत्रिम योनीत संकलित केले जाते. अत्यंत सुसज्ज अशा प्रयोगशाळेत त्यापासून वीर्यकांडय़ा तयार केल्या जातात. कृत्रिम रेतनामुळे उच्च वंशावळीच्या, उच्च दुग्ध उत्पादन देणाऱ्या आणि निरोगी पशूंची पैदास वाढते. दुग्ध उत्पादनात कमी काळात मोठी वाढ होते. पण, याचे काही दुष्परिणामही आहेत. सरसकट कृत्रिम रेतनाचा वापर केल्यामुळे देशी गोवंशात भेसळ झाली आहे. मध्येच कृत्रिम रेतन थांबविल्यामुळे पैदाशीत खंड पडतो. पशुधन ना देशी राहते ना पूर्णपणे संकरित होते. अशा नियोजनशून्य रेतन कार्यक्रमाचा फटका देशी गोवंशांना बसला आहे. त्यामुळे शुद्ध देशी गोवंशाची संख्या अत्यंत कमी झाली आहे. त्यामुळे गाईंचे संकरीकरण शास्त्रशुद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्याची गरज आहे.
संदर्भ : डॉ. धनंजय भोईटे, डॉ. व्यंकटराव घोरपडे, डॉ. नितीन मरकडेय यांचे लेख
Dattatray.Jadhav@expressindia.com