दत्ता जाधव

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) आणि साखर संघाच्या संयुक्त अभ्यासाने राज्यातील साखर उत्पादनात १० ते १२ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे..

विस्मा, साखर संघाचा अंदाज काय?

ऑक्टोबरअखेर, नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या सुरुवातीस राज्यात मोठय़ा प्रमाणावर सर्वदूर बिगरमोसमी पाऊस झाला होता. सर्वदूर मोठय़ा प्रमाणावर झालेल्या पावसामुळे उसाची उत्पादकता व साखर उताऱ्यामध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे. हंगामाच्या पूर्वी ८८ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज होता. त्यात १० ते १२ टक्के वाढ होण्याचा नवा अंदाज आहे. इथेनॉलसह अन्य उपपदार्थाची निर्मिती वगळून एकूण साखर उत्पादनात ७.५ टक्के वाढ होऊन राज्यात चालू हंगामातील साखर उत्पादन ९५ लाख टन होईल, असा अंदाज विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी व्यक्त केला आहे.

अभ्यास काय सांगतो?

विस्माच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील खासगी व सहकारी साखर कारखान्यांच्या ३१ डिसेंबर २०२३ अखेर झालेले प्रत्यक्ष व अपेक्षित गाळप, साखर उत्पादन व साखर उताऱ्याचा कारखानानिहाय आढावा घेण्यात आला. त्यानुसार राज्यात सध्या ९६ सहकारी व ९९ खासगी असे एकूण १९५ साखर कारखाने गाळप करीत आहेत. त्यांची गाळपक्षमता नऊ लाख टन प्रतिदिन आहे. सुरुवातीस राज्याचा गळीत हंगाम अंदाजे ९० ते १०० दिवसांचा अपेक्षित होता. मात्र प्रत्यक्षात डिसेंबरअखेर एकूण ९४६ लाख टन ऊस उपलब्धतेचा अंदाज होता. या अंदाजात पाच टक्के वाढ होऊन ९९३ लाख टन ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हंगाम सुरू झाल्यापासून ६० दिवसांत डिसेंबरअखेर ४२८ लाख टन उसाचे गाळप झाले असून, ३८.२० लाख टन साखरनिर्मिती झाली आहे. अद्याप ५६५ लाख टन गाळप बाकी आहे. बिगरमोसमी पावसामुळे प्रतिहेक्टरी उसाच्या उत्पादनात ८ ते १० टक्के वाढ झाल्याने एकूण उपलब्ध उसामध्ये पाच टक्के वाढ झाल्याने एकूण गाळपाचे दिवस १०० ऐवजी आता १२५ ते १३० अपेक्षित आहेत. डिसेंबरअखेर फक्त ४० टक्के ऊस गाळपातून ३८ लाख टन साखर उत्पादन झाले असल्याने उर्वरित ६० टक्के ऊस गाळपातून एकूण ९५ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज असून, तो खरा ठरण्याचा विश्वास विस्माला आहे.

हेही वाचा >>>विश्लेषणः विमान अपघात, नरभक्षकता अन् १० दिवसांचा जीवघेणा प्रवास; वाचा नेटफ्लिक्सच्या ‘सोसायटी ऑफ द स्नो’मागची खरी कहाणी

इथेनॉल-बंदीमुळे साखर जास्त?

साखर उत्पादनात वाढ होण्याची दोन प्रमुख कारणे सांगण्यात येत आहेत. त्यामध्ये अवकाळी पावसामुळे प्रतिहेक्टर ऊस उत्पादनात झालेली वाढ हे प्रमुख कारण आहे. त्यासह केंद्र सरकारने ७ डिसेंबर २०२३ च्या आदेशान्वये उसाचा रस आणि पाकापासून इथेनॉल उत्पादनास घातलेली बंदी व त्यामुळे इथेनॉलकडे वळवण्यात आलेल्या साखरेच्या वापरात मोठी घट हे आहे. हंगामाच्या सुरुवातीस महाराष्ट्रात ८८ लाख टन निव्वळ साखरेच्या उत्पादनाचा अंदाज विस्मा, साखर आयुक्तालय व साखर संघाने व्यक्त केलेला होता. अंदाजे ८ ते १० लाख टन साखर इथेनॉलकडे वळविण्याचा अंदाज होता. 

अन्य राज्यांतही वाढ होणार?

मागील वर्षीच्या साखर उत्पादनामध्ये प्रामुख्याने दुष्काळसदृश परिस्थितीमुळे महाराष्ट्र व कर्नाटक या मुख्य साखरउत्पादक राज्यांमध्ये साखरेच्या कमी उत्पादनाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटक व गुजरात राज्यामध्येही प्रचंड मोठय़ा प्रमाणात ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस झाल्याने त्याही राज्यांमध्ये उसाच्या प्रतिहेक्टरी उत्पादनात ८ ते १० टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाचे साखर उत्पादन असणाऱ्या उत्तर प्रदेशामध्ये पुरेसा पाऊस व अनुकूल वातावरणामुळे मागील वर्षांच्या साखर उत्पादनामध्ये सुरुवातीसच दहा टक्के वाढ अपेक्षित होती. प्रत्यक्षात डिसेंबर २०२३अखेर उत्तर प्रदेशात ३५ लाख टन साखर उत्पादन झालेले असून, हंगामअखेर १२० ते १२५ लाख टन साखर उत्पादन अपेक्षित असल्याचे तेथील साखर कारखाना संघटनांनी म्हटले आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक व गुजरात या राज्यांत देशातील एकूण साखर उत्पादनापैकी ८० टक्के उत्पादन होते.

हेही वाचा >>>विश्लेषण: २०२४ मधील बाजाराची स्थिती; गुंतवणूकदारांसाठी आणखी एक चांगले वर्ष?

साखर उद्योगाची मागणी काय?

केंद्र सरकारने ७ डिसेंबर रोजी हंगामपूर्व एकूण साखर उत्पादन २९० लाख टन गृहीत धरून इथेनॉल मिश्रणाच्या कार्यक्रमाला बगल देऊन इथेनॉल निर्मितीस घातलेल्या बंदीचा पुनर्विचार करण्याची विनंती विस्मा केंद्र सरकारला करणार आहे. देशांतर्गत वापरासाठी  २७५ ते २८० लाख टन साखर लागते. प्रत्यक्षात या वर्षीचे अपेक्षित साखर उत्पादन ३२० लाख टन होणार असल्याने देशांतर्गत वापरासाठी मुबलक साखर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे साखरेचा तुटवडा निर्माण होऊन भाववाढ होण्याची भीती निराधार आहे. तसेच वाढीव २० ते २५ लाख टन साखर जादा उपलब्ध झाल्याने सदर साखरेपासून केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी आत्मनिर्भरतेच्या इथेनॉल मिश्रण धोरणाला पुन्हा मान्यता देऊन साखर उद्योग व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची विनंती विस्मा केंद्र सरकारला करणार आहे, असेही विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे म्हणाले.

dattatray.jadhav@expressindia.Com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta explained will the state sugar production increase print exp 0124 amy