‘भविष्यातील युद्धतंत्र’ अभ्यासक्रमाची मुहूर्तमेढ रोवून भारतीय सैन्य अभिनव प्रशिक्षणाच्या व लवकरच आकारास येणाऱ्या एकात्मिक युद्ध विभागाच्या माध्यमातून आपली रणनीती बदलत आहे. आधुनिक संघर्षात विविध लष्करी शाखांच्या सामर्थ्याचा फायदा घेण्यात एकात्मिक दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो. सामूहिक शक्तीतून परिणामकारकता साधली जाते. आधुनिक युद्धपद्धती, युद्धतंत्राशी जुळवून घेण्यासाठी भारतीय सैन्याच्या परिवर्तनात्मक प्रवासाला सुरुवात झाल्याचे मानले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवा अभ्यासक्रम काय आहे ?

नवी दिल्ली येथे आयोजित भारत शक्ती संरक्षण परिषदेत भारतीय सैन्य दलांचे संरक्षणप्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी भविष्यातील युद्धतंत्र या तिन्ही दलांसाठी विकसित केलेल्या पहिल्या अभ्यासक्रमाची घोषणा केली. त्याची नुकतीच सुरुवात झाली. या अभ्यासक्रमाची रचना केवळ प्रगत लष्करी पद्धतींच्या अनुकरणावर आधारित नाही, तर त्यामध्ये भारताच्या विशिष्ट दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित केलेले आहे. आधुनिक युद्धाचे संचालन आणि तांत्रिक पैलूंची तो ओळख करून देईल. या संघर्षांचे दिशादर्शन करण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये कौशल्ये विकसित करणे, हा त्याचा मुख्य उद्देश आहे.

अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये काय आहेत?

भारतीय सशस्त्र दल भविष्यातील युद्धतंत्राच्या दृष्टीने सज्ज ठेवण्यासाठी एकात्मिक संरक्षण दल मुख्यालयाच्या अनुभवी व विषयतज्ज्ञांनी या अभ्यासक्रमाची निर्मिती केली आहे. यानंतरचे अभ्यासक्रम विषय सूचीनुसार तयार होतील. ते दीर्घ कालावधीचे असतील. पहिल्या अभ्यासक्रमातून भविष्यातील युद्धे ही संपर्क, विनासंपर्क, गतिज, स्थितिज, मनोवैज्ञानिक अथवा माहितीच्या दृष्टीने कशा स्वरूपाची असतील आणि ती सायबर, अंतराळ किंवा विद्युत, चुंबकीय यापैकी कुठल्या क्षेत्राशी निगडित असतील, याबाबतची समज विकसित होईल. कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणकीय आज्ञावली, यंत्रमानव आणि ध्वनिहून पाचपट गतीने जाणाऱ्या ‘हायपरसोनिक’सारख्या तंत्राचा युद्धतंत्रांवर कसा प्रभाव पडेल, हेदेखील अभ्यासक्रम केल्यास ज्ञात होणार आहे.

हेही वाचा >>>विश्लेषण: उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द केल्याने शुल्क प्रतिपूर्तीचा फायदा कोणाला?

हा अभ्यासक्रम नावीन्यपूर्ण का आहे?

लष्करातील मेजर ते मेजर जनरल आणि इतर सेवांमधील त्यांच्या समकक्ष स्तरावरील अधिकाऱ्यांसाठी हा बहुपयोगी अभ्यासक्रम आहे. तंत्रज्ञानात होणारे बदल, जागतिक पटलावरील घडामोडी, नव्याने उद्भवणारे धोके लक्षात घेता तिन्ही सैन्य दलांसाठी अशा स्वरूपाच्या अभ्यासक्रमाची आवश्यकता होती. यातून जटील परिस्थितीचा सामना, नवतंत्रज्ञानाचा लाभ आणि नावीन्यपूर्ण डावपेचांशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने अधिकारी सुसज्ज होतील. यात मेजर जनरललाही कदाचित मेजरकडून काही तरी शिकता येईल आणि मेजरही मेजर जनरलकडून रणनीती व मोहीम शिकू शकतो. अनिश्चित व स्पर्धात्मक वातावरणात राष्ट्रीय हितसंबंध राखण्यात, भविष्यवादी व तंत्रस्नेही शक्तीच्या विकासात त्याचा उपयोग होईल.

एकात्मीकरणास प्रोत्साहन कसे मिळेल?

तिन्ही सैन्य दलांत उत्तम समन्वय राखण्यासाठी लष्कर, हवाई दल आणि नौदल यांचा एकात्मिक युद्ध विभाग अर्थात जॉइन्ट थिएटर कमांड स्थापण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यामुळे वेगवेगळ्या दलांतील अधिकाऱ्यांनी एकत्रित काम करणे ही या गटाची प्राथमिक निकड आहे. सामाईक कार्यवाहीच्या दृष्टीने तिन्ही सैन्य दलांत समन्वय वाढविण्यासाठी एका दलातील अधिकाऱ्यांना दुसऱ्या दलात नियुक्त करण्याच्या (क्रॉस पोस्टिंग) प्रक्रियेला गतवर्षी सुरुवात झाली होती. तिन्ही दलांतील अधिकाऱ्यांसाठी विकसित होणाऱ्या अभ्यासक्रमातून एकात्मीकरणास प्रोत्साहन मिळेल. सामाईक शिक्षण, कार्यातून समन्वय साधून सर्वोत्कृष्ट कार्यपद्धती विकसित करता येईल.

हेही वाचा >>>‘त्या’ ४३ विद्यार्थ्यांसाठी मेक्सिको का पेटलंय? २०१४ मध्ये बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्यांबरोबर नक्की काय घडलं?

संघर्षानंतर धोरणात्मक बदल कसे घडताहेत ?

दिल्लीतील परिषदेत चीन सीमेवरील परिस्थिती, लष्करी तयारी यांसह इतर विषयांवर चर्चा झाली. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर रणनीतीच्या पुनर्मूल्यांकनाची आवश्यकता मान्य करण्यात आली. सीमेवर शक्तीचे संतुलन साधण्यासाठी महत्त्वाचे धोरणात्मक बदल केले जात आहेत. सैन्यशक्ती, पुरवठा व्यवस्थेबरोबर सैन्याची उपकरणे व प्रशिक्षण लष्करी कार्यवाहीच्या गरजांची जुळवण्याची खात्री होत आहे. उत्तर सीमेवर पायाभूत सुविधांच्या विकासातून आव्हानात्मक भूप्रदेशात गतिशीलतेने कारवाई, रसद पुरवठा यावर लक्ष देण्यात आले आहे. भारतीय सशस्त्र दलांत अधिक एकात्मता आणि संयुक्तपणा साधण्याचे नियोजन केले जात आहे. या माध्यमातून केवळ सामाईक लष्करी कारवाईच नव्हे, तर पुरवठा व्यवस्था, वाहतूक, दळणवळण, देखभाल-दुरुस्तीत संयुक्त व्यवस्था आणि एकत्रित प्रशिक्षणाचाही अंतर्भाव आहे.

aniket.sathe@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta explained will the study of future warfare change the strategy of the indian army print exp amy