भक्ती बिसुरे bhakti.bisure@expressindia.com

संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उपाययोजना संघटनेकडून (‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्यूशन्स नेटवर्क’ हे त्या संघटनेचे नाव) मागील दहा वर्षांपासून प्रकाशित करण्यात येणारा जागतिक आनंद अहवाल (वल्र्ड हॅपीनेस रिपोर्ट) नुकताच प्रकाशित करण्यात आला असून फिनलंड या चिमुकल्या देशाने जगातील सर्वात आनंदी देश होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. फिनलंड या देशाने आतापर्यंत एकदा किंवा दोनदा नव्हे तर पाच वेळा हा बहुमान पटकावला आहे. २० मार्च हा दिवस जागतिक आनंद दिवस म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी त्याच दरम्यान संयुक्त राष्ट्र संघटना जागतिक आनंद अहवाल प्रसिद्ध करते.

जागतिक आनंद अहवाल म्हणजे काय?

कोणत्याही देशाच्या प्रगतीचा निकष ठरवण्यासाठी सकल राष्ट्रीय उत्पन्नाची (ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट – जीडीपी) मोजदाद केली जाते. मात्र, देशाची प्रगती केवळ सकल राष्ट्रीय उत्पन्नावर नव्हे तर त्या देशातील जनतेच्या आनंदाच्या निकषावरही मोजण्यात यावी याकडे आशिया खंडातल्या भूतान या चिमुकल्या देशाने जगाचे लक्ष वेधले. विकासाच्या मार्गावर नेण्याचा सर्वंकष पर्याय म्हणजे आनंद असे म्हणत भूतानने जगाला सकल राष्ट्रीय आनंद (ग्रॉस डोमेस्टिक हॅपीनेस  – जीडीएच) महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित करत नागरिकांच्या आनंदाचे मोजमाप करण्याचे आवाहन केले. त्यानंतर २० मार्च हा दिवस जागतिक आनंद दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. त्याच दरम्यान दरवर्षी संयुक्त राष्ट्र संघटनेकडून जगातील देशांच्या आनंदाचे मूल्यमापान करणारा जागतिक आनंद अहवाल प्रकाशित केला जातो. विशेष म्हणजे, मागील काही वर्षांपासून धोरणकर्त्यांकडून आपल्या धोरणांची दिशा ठरवताना या अहवालातील निष्कर्षांचा विचार आणि अभ्यास करण्यात येत आहे.

आनंद मोजण्याचे निकष कोणते?

जागतिक आनंद अहवाल तयार करताना त्यामध्ये विविध निकषांचा आंतर्भाव करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने देशाचे दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न, सामाजिक सलोखा, निरोगी आणि निकोप आयुष्याची शाश्वती, भ्रष्टाचाराचे कमीत कमी अस्तित्व, उदारपणा किंवा दातृत्व, स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याचे तसेच जगण्याचे स्वातंत्र्य अशा अनेक निकषांवर नागरिकांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. चिंता, राग आणि दु:ख या निकषांवर नागरिकांनी आपले असमाधान व्यक्त केले आहे. देणगी देणे किंवा गरजूंना मदत करणे, स्वयंसेवक म्हणून सामाजिक कामात सहभाग या बाबी नागरिकांच्या आनंद आणि समाधानाचा एक महत्त्वाचा स्रोत असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

सर्वात आनंदी देश कोणते आणि का?

जागतिक आनंद अहवालात यंदा सलग पाचव्या वर्षी फिनलंड या देशाने पहिल्या क्रमांकावर आपले अढळपद कायम ठेवले आहे. डेन्मार्कने दुसरे स्थान राखले आहे. मागील वर्षी चौथ्या क्रमांकावर असलेल्या आईसलँडने यंदा तिसरे स्थान मिळवले आहे. स्वित्र्झलड चौथ्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ नेदरलँड आणि लक्झेनबर्गने या यादीत स्थान मिळवले आहे. तर स्वीडन, नॉर्वे, इस्रायल, न्यूझीलंडने पहिल्या दहामध्ये स्थान पटकावले. मागील वर्षी १९ व्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेने १६ वे स्थान तर युनायटेड किंग्डमने १७ वे स्थान प्राप्त केले आहे. अत्यल्प प्रमाणातील गुन्हेगारी, अपरिमित निसर्गसौंदर्य आणि त्याचे संवर्धन, उत्कृष्ट आरोग्य सुविधा, सहकार्य आणि एकोप्याने जीवन जगण्यास प्राधान्य आणि गरिबीचे प्रमाण अत्यंत कमी या कारणांमुळे फिनलंड हा सलग पाचव्यांदा जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे.

महासाथीचा परिणाम किती?

महामारीच्या काळात जगातील नागरिकांच्या आनंदावर लक्षणीय परिणाम झाल्याचे या अहवालात नोंदवण्यात आले आहे. महामारीच्या दोन वर्षांत जगातील सर्वच कुटुंबाचे आर्थिक गणित विस्कळीत झाले. त्याचा थेट परिणाम आनंद आणि समाधान या बाबींवर झाला आहे. मोठय़ा संख्येने नागरिकांनी आपले रोजगार गमावले, तसेच प्रकृतिस्वास्थ्याच्या प्रश्नांना तोंड दिले. महामारीच्या काळात चिंता आणि दु:ख या दोन भावनांमध्ये जगभरातच मोठी वाढ नोंदवण्यात आली. याच काळात ताणतणाव आणि अस्थैर्य यांचाही मोठय़ा प्रमाणात फटका जागतिक आनंद निर्देशांकाला बसल्याचे या अहवालातील निरीक्षणे सांगतात. आनंद आणि समाधानासाठी भौतिक गोष्टींवर अवलंबून राहण्याच्या दृष्टिकोनात महामारीच्या काळात मोठा बदल झाल्याची महत्त्वाची बाब या अहवालाने अधोरेखित केली आहे.

भारत आणि शेजारी देशांची स्थिती काय?

जागतिक आनंद अहवालात भारताचे स्थान १३६ व्या क्रमांकावर आहे. तालिबानच्या अन्यायाच्या झळा सोसणारा अफगाणिस्तान १४६ व्या क्रमांकावर आहे. भारताचे इतर शेजारी देशही या अहवालात भारतापेक्षा वरचे स्थान राखून आहेत. नेपाळने ८४ वे स्थान, बांगलादेशने ९४ वे स्थान, पाकिस्तानने १२१ वे तर श्रीलंकेने १२७ वे स्थान प्राप्त केले आहे. भारतीय उपखंडातील भूतान या चिमुकल्या देशाने जागतिक आनंद अहवालात यंदा ९७ वे स्थान पटकावले आहे.

भारताची स्थिती अशी कशी?

भारत यंदा १३६ व्या क्रमांकावर असला, तरी गेल्या वर्षी आपला क्रमांक १३९ वा होता आणि त्याआधी तर १४० वा होता. मात्र २०१८ साली १३३, २०१७ मध्ये १२२, २०१६ साली ११८, त्याआधीच्या २०१५ या वर्षी ११७ तर २०१३ मध्ये १११ व्या क्रमांकावर भारत होता. (२०१४ सालचा अहवाल ,  https://worldhappiness.report/ या संस्थळावर उपलब्ध नाही). दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या रोजगार आणि उपजीविकेच्या संधी, भ्रष्टाचाराचा उद्रेक, प्राथमिक शिक्षणाच्या सुविधांमधील असमानता अशा कारणांमुळे भारतीय आनंदापासून दूर असल्याचे या अहवालातील निरीक्षणांवरून स्पष्ट होत आहे.

Story img Loader