अनिकेत साठे aniket.sathe@expressindia.com
युक्रेनला बेचिराख करण्यासाठी तुटून पडलेल्या रशियन लष्कराच्या सामग्रीवरील ‘झेड’ या चिन्हांकनाविषयी वेगवेगळय़ा रहस्य कथांची पेरणी होत आहे. सर्वसाधारणपणे लष्करी कारवाईच्या आखणीतील सूत्रांच्या आधारे सामग्रीवर चिन्हांकन केले जाते. रशियाने ‘झेड म्हणजे विजयासाठी’ असा अर्थ ध्वनित करून राष्ट्रभावना चेतवण्याची संधी सोडलेली नाही. पण प्रश्न उरलेच..
‘गूढ’ म्हणावे असे काय त्यात?
युक्रेनमध्ये शिरलेले रशियन रणगाडे, तोफा, चिलखती वाहनांवर झेड चिन्हांकन ठळकपणे अधोरेखित आहेत. याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. सिरिलिक रशियन वर्णमालेत रोमनप्रमाणे ९ हे मुळाक्षर अस्तित्वातच नाही. युद्धक्षेत्रात आपले सैन्य, वाहने लक्षात येण्यासाठी असे चिन्हांकन केले जाते. रशियन तुकडय़ा ज्या भागात नियमितपणे तैनात असतात, त्याचा आधार चिन्हांकनात घेतला गेला. ते रंगविताना काही लष्करी वाहनांवर केवळ झेड, काहींवर चौकोनात वा त्रिकोणात झेड असेही बदल लक्षात येतात. काही वाहनांवर व्ही, ओ, एक्स अशी चिन्हे दिसतात. याचा संबंध युक्रेन सभोवतालच्या वेगवेगळय़ा रशियन प्रांतांतून युद्धात सहभागी झालेल्या तुकडय़ांशी आहे. आपल्याच वाहनांवर आपल्या अन्य तुकडीकडून हल्ला होऊ नये म्हणून ही खबरदारी घेतली गेल्याची अधिक शक्यता आहे. या विषयी रशियन संरक्षण मंत्रालयाने स्पष्टता केलेली नाही. मात्र, ‘झेड़ म्हणजे विजयासाठी’ असा अर्थ असल्याचा उल्लेख केला. झेड हे चिन्ह रशियाच्या युद्धाचे प्रतीक बनल्याचे चित्र आहे.
लष्करी चिन्हांकनाचे प्रयोजन काय?
लष्करी चिन्हे ही लष्कराच्या विविध विभागांत प्रभावीपणे काम करण्यात महत्त्वाचा घटक मानली जातात. त्यातून अंतर्गत संवाद साधण्याची क्षमता निर्माण झालेली आहे. लष्करी तुकडी, युद्धसामग्री, उपकरणे, स्थापना तसेच लष्करी कारवाईत वापरल्या जाणाऱ्या पद्धतीच्या नियोजनात ती महत्त्वाची ठरतात. युद्ध कार्यवाहीत वेगळी चिन्हे वापरली जातात. लष्करी सामग्री, त्यांचे ठिकाण, मित्र-शत्रूराष्ट्राची ओळख होण्यासाठी वेगवेगळी चिन्हे आणि रंगसंगतीचा वापर केला जातो.
झेडचा वेगाने प्रचार कशासाठी ?
युक्रेनवरील हल्ल्याचा जगभरातून तसेच खुद्द रशियातील काही घटकांकडून विरोध होत आहे. संबंधितांना पुतिन पाठीराख्यांनी रशियन लष्करी वाहनांवरील झेड चिन्हाचे आपल्या सोयीने अर्थ घेत प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. बाजारात तसे टी शर्टही आले. ते परिधान करून समर्थक देशभरात रस्त्यावर उतरत आहेत. सोव्हिएत काळातील इमारती या चिन्हाने रंगविल्या गेल्या. मॉस्को परिसरातील काही वाहनांवर ते झळकले. शाळांमध्ये विद्यार्थी मैदानात उभे राहून झेडच्या आकाराची रचना करतानाची छायाचित्रे समाजमाध्यमांवर झळकली. युद्धाच्या समर्थनार्थ जोरदार प्रचार सुरू आहे.
चिन्हांकनावरून दुफळी आहे काय ?
या युद्धास विरोध करणाऱ्यांना जरब बसवण्यासाठी या चिन्हाचा निर्गलपणे वापर करण्यात आला. देशातील युद्धविरोधी संस्था, गटाची कार्यालये आणि सदस्यांच्या घरांचे दरवाजे या चिन्हाने परस्पर रंगवले गेले. परंतु याही परिस्थितीत, काही रशियन झेडची खिल्ली उडवतात. युद्धाविरोधात झालेल्या आंदोलनांमध्ये हे चिन्हांकन कशासाठी, असे फलक झळकले. झेडशी संबंधित व्यंगचित्रे, मीम्सच्या माध्यमातून पुतिन आणि युद्धसमर्थकांना प्रत्युत्तर दिले जात आहे.
सामान्यजन युद्धप्रतीके का वापरतात?
चिन्हातून सैन्य तुकडीची चिकाटी, धैर्य, प्रतिष्ठा अधोरेखित होते. सैनिकांना भावनिक, मानसिक प्रेरणा देण्यासाठी विशिष्ट चिन्ह, प्रतीकांच्या वापराची सैन्यदलात परंपरा आहे. रशियाही त्यास अपवाद नाही. रशियात केशरी-काळय़ा रंगाच्या पट्टेदार फिती (सेंट जॉर्जस रिबन) शौर्याचे प्रतीक मानल्या जातात. झारच्या कालखंडापासून त्यांचा वापर होत आहे. दुसऱ्या महायुद्धात रशियासह दोस्त राष्ट्रांनी नाझीचा (जर्मनी) पराभव केला. त्या युद्धात नाझींनीही हिटलरचे आवडते ‘स्वस्तिक’ हे चिन्ह वापरले होते. हिटलरप्रेमी, जर्मन वंशश्रेष्ठत्ववादी नागरिकही स्वस्तिकाचे प्रतीक वापरत. वंशसंहार करू पाहणाऱ्या त्या नाझी प्रवृत्तीच्या पाडावानिमित्त आजही ९ मे हा विजय दिन म्हणून पाळला जातो. या दिवशी रशियन नागरिक या प्रतीकांद्वारेच लष्करी सामर्थ्यांचा गौरव करतात. युद्धकाळातील टोप्या परिधान केल्या जातात. विजय दिन ‘उत्साहात साजरा’ करण्याबाबत मात्र रशियात मतभेद आहे. दुसऱ्या महायुद्धात मोठय़ा प्रमाणात जीवितहानी झाली. कित्येक सैनिक शहीद झाले. हा दिवस अशा प्रकारे ‘साजरा’ करणे म्हणजे शहिदांचा अवमान करण्यासारखे असल्याचे काही मानतात. म्हणून, केवळ या विजयदिनी ‘सेंट जॉर्जस रिबन’ चा वापर रशियात सर्वसामान्यांकडून होई. युक्रेनमध्ये राजकीय सुधारणांसाठी नोव्हेंबर २००४ पासून आंदोलन सुरू झाले होते, तेव्हा आंदोलक केशरी फिती वापरू लागले. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी रशियात लष्करापुरत्याच मर्यादित राहिलेल्या केशरी-काळय़ा फितींचा सार्वजनिक वापर वाढला. पुढे २०१४ मध्ये, युक्रेनमधून क्रिमियाचा लचका तोडून क्रिमिया प्रांत रशियाला जोडणाऱ्या कारवाईचे समर्थनही पुतिनप्रेमी रशियनांनी याच केशरी-काळय़ा फिती वापरून केले होते. युद्ध केवळ दोन सैन्यांमध्ये लढले जात नाही. देशवासीयांचा त्याला पाठिंबा महत्त्वाचा ठरतो. राष्ट्रभावना चेतवण्यास प्रतीके कामी येतात. सध्या जागतिक पातळीवर रशियाविरोधात वातावरण आहे. या स्थितीत पुतिन यांचा रशिया, तेथील नागरिकांकडून होणारे युद्धाचे समर्थन ‘झेड’ या प्रतीकातून साध्य करू पाहात आहे.