निमा पाटील
इजिप्तने अलिकडेच इस्रायलबरोबर साडेचार दशकांपूर्वी करण्यात आलेल्या कॅम्प डेव्हिड करारातून बाहेर पडण्याचा इशारा दिला. हा करार काय आहे आणि चार दशकांच्या शांततेनंतर त्यातून बाहेर पडावेसे इजिप्तला का वाटले, याविषयी
इजिप्तने कॅम्प डेव्हिड करारातून बाहेर पडण्याचा इशारा का दिला?
हमास आणि इस्रायलदरम्यान सुरू असलेल्या युद्धाला चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे. युद्धामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात गाझा पट्टीतील गाझा आणि खान युनिस ही दोन्ही शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. या शहरांमधून हमासच्या कारवाया सुरू असल्याने त्यावर कारवाई केल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे. या दोन शहरांमधील जवळपास सर्व इमारती आणि आस्थापने नष्ट केल्यानंतर इस्रायलने गाझामधील इजिप्तच्या सीमेजवळ असलेल्या राफा या शहराकडे मोर्चा वळवला आहे. साधारण तीन लाख लोकसंख्येचे राफा शहर हमासचा शेवटचा बालेकिल्ला असल्याची इस्रायलची माहिती आहे. दुसरीकडे, गाझामधील २३ लाख लोकसंख्येपैकी तब्बल १४ लाख लोक वारंवार स्थलांतर करत एकट्या राफा शहरामध्ये एकवटले आहेत. राफा शहरही उद्ध्वस्त किंवा नष्ट झाले तर येथील स्थलांतरित पॅलेस्टिनी लाखोंच्या संख्येने आपल्या देशात प्रवेश करतील आणि परत जाणार नाहीत अशी भीती इजिप्तला भेडसावत आहे.
हेही वाचा… मुख्यमंत्र्यांचा ठाणे जिल्हा राज्यातील विकासाचा केंद्रबिंदू कसा ठरतोय?
कॅम्प डेव्हिड करार कधी करण्यात आला?
अमेरिकेचे अध्यक्ष जिमी कार्टर, इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादात आणि इस्रायलचे पंतप्रधान मनाहेम बिगिन यांनी सप्टेंबर १९७८ मध्ये एक महत्त्वाचा करार केला. अमेरिकेतील मेरीलँड राज्यातील कॅम्प डेव्हिड येथे या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्यामुळे त्याला कॅम्प डेव्हिड करार असे म्हणतात. त्याने मार्च १९७९ मध्ये इस्रायल आणि इजिप्त यांच्यातील ऐतिहासिक शांतता कराराची चौकट तयार झाली. या करारामुळे मुस्लीम अरब आणि ज्यू यांच्यामधील संघर्षामुळे सतत तणावात असलेल्या पश्चिम आशियाला अत्यावश्यक असलेली शांतता मिळाली. या शांतता कराराला पुढील महिन्यात तब्बल ४५ वर्षे पूर्ण होत आहेत.
कराराची पार्श्वभूमी काय होती?
इस्रायलमध्ये मे, १९७७मध्ये झालेल्या निवडणुकांचा निकाल विशेषतः धक्कादायक होता. तेथील तुलनेने मवाळ आणि उदारमतवादी इस्रायली लेबर पार्टीचा पराभव झाला आणि पुराणमतवादी लिकुड पक्षाचे मनाहेम बिगिन पंतप्रधान झाले. सत्ता हाती घेतल्यानंतर त्यांनी शांततेसाठी १९६७च्या युद्धात इजिप्तची बळकावलेली जमीन परत करण्यास नकार दिला. त्यामध्ये इजिप्तच्या सिनाई द्वीपकल्पाचाही समावेश होता.
हेही वाचा… ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहप्रकल्पात सुविधा? महारेराचा नवा मसुदा काय?
या कराराच्या तरतुदी काय आहेत?
कराराअंतर्गत इस्रायलने सिनाई द्वीपकल्पातून माघार घेण्याची तयारी दर्शवली. त्या बदल्यात इजिप्तनेही त्या भागातून आपले सैन्य माघारी घेण्याचे मान्य केले. दुसरीकडे जागतिक व्यापारासाठी महत्त्वाचा असलेल्या सुवेझ कालव्यातून इस्रायलच्या व्यापारी जहाजांना जाऊ देण्यास इजिप्तने परवानगी दिली. या करारानंतर इस्रायल आणि इजिप्तदरम्यान संपूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. हा करार करून कार्टर, हसन आणि बिगिन या तिघांनीही धाडसी पाऊल उचलले असे कार्टर सेंटरचे प्रमुख कार्यकारी पेज अलेक्झांडर यांचे म्हणणे आहे.
करार करण्यात जिमी कार्टर यांची काय भूमिका होती?
हा करार व्हावा यासाठी आणि त्यासाठी संधी तयार व्हावी अमेरिकेचे अध्यक्ष जिमी कार्टर यांनी प्रमुख भूमिका बजावली. कार्टर आणि अमेरिकेचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री सायरस व्हॅन्स यांनी सुरुवातीपासूनच पश्चिम आशियातील शांततेसाठी अरब आणि इस्रायली नेत्यांशी सविस्तर वाटाघाटी सुरू केल्या. तोपर्यंत अरबी देश आणि इस्रायलदरम्यान चार मोठी युद्धे झाली होती. १९७३च्या युद्धानंतर दोन्ही पक्षांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी संयुक्त राष्ट्रांनी सुरक्षा परिषदेच्या ठराव क्रमांक ३३८नुसार २१ ते २९ डिसेंबर १९७३ दरम्यान जिनिव्हा येथे परिषद आयोजित केली. त्या परिषदेची पुनरावृत्ती व्हावी यासाठी कार्टर आणि व्हॅन्स यांचे प्रयत्न होते.
हेही वाचा… चीनचे परराष्ट्र मंत्री आफ्रिकेत? चीनच्या मनात नक्की आहे तरी काय?
कॅम्प डेव्हिड करार महत्त्वाचा का ठरला?
कॅम्प डेव्हिड करार पश्चिम आशियातील सुरक्षा आणि अमेरिकेची त्या प्रदेशातील व्यूहरचना या दोन्हींचा आधारस्तंभ मानला जातो. या कराराच्या आधारे, काहीशा उशिरा का होईना, १९९३मध्ये ओस्लो कराराचा मार्ग मोकळा झाला. ओस्लो कराराने इस्रायल आणि पॅलेस्टाईनचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (पीएलओ) यांच्यादरम्यान करार झाला. त्याअंतर्गत पश्चिम किनारपट्टीच्या बहुतांश भागात पॅलेस्टाईनला स्वयंशासनाचा अधिकार मान्य करण्यात आला, तसेच इस्रायलला गाझा पट्टीतून माघार घेण्याची परवानगी देण्यात आली. त्यातूनच पुढे इस्रायल आणि जॉर्डन यांच्यादरम्यान १९९४मध्ये शांतता करारावर स्वाक्षरी झाली. प्रत्येक वेळी वाटाघाटींसाठी कॅम्प डेव्हिड कराराचा आधार घेण्यात आला.
कॅम्प डेव्हिड करार रद्द झाल्यास काय परिणाम होतील?
या करारामुळे इजिप्त आणि इस्रायल या दोन्ही देशांना सीमेवर एका मर्यादेपेक्षा जास्त सैन्य ठेवता येत नाही. करारामुळे इजिप्त सीमा सुरक्षित असल्याने इस्रायलचे सैन्य इतरत्र लक्ष केंद्रित करू शकते. करार रद्द झाला तर इस्रायली सैन्यावरील ताण वाढेल. दुसरीकडे, शांतता करारानंतर इजिप्तला अमेरिकेकडून अब्जावधी डॉलरची लष्करी मदत मिळाली आहे. करार रद्द केल्यास हा निधीपुरवठा बंद होऊ शकतो. इजिप्तने मोठ्या प्रमाणात लष्करी उभारणी केली आहे. अमेरिकेकडून मिळणारा निधी थांबला तर आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या इजिप्तच्या अर्थव्यवस्थेवर आणखी ताण येईल. त्यामुळेच तातडीने करार रद्द करणे दोन्ही देशांसाठी नुकसानकारकच ठरणार आहे.
nima.patil@expressindia.com