विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशामुळे उत्साह दुणावलेल्या भाजपने गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असलेल्या ठाणे जिल्ह्यातही आक्रमक राजकारण सुरू केले आहे. राज्य मंत्रिमंडळात भाजपने गणेश नाईक या ठाणे जिल्ह्यातील एकमेव चेहऱ्यास संधी दिली. नाईक यांच्याकडे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री पदही सोपविण्यात आले. नाईक यांच्या पाठोपाठ डोंबिवलीतील पक्षाचे माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे प्रदेश कार्याध्यक्ष पद सोपविले. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले किसन कथोरे यांना ताकद देताना ‘तुमच्यामागे मुख्यमंत्री उभा आहे’ असे जाहीर वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शिंदे यांच्या ठाण्यात येत्या २४ तारखेला गणेश नाईक यांचा जनता दरबार भरणार आहे. नाईक यांच्या पाठोपाठ संजय केळकर आणि निरंजन डावखरे या दोघा आमदारांनीही आठवड्यातून दोन दिवस ठाणेकरांसाठी असाच ‘दरबार’ भरविण्याचे जाहीर केले आहे. शिंदे यांच्या ठाण्यातील बालेकिल्ल्यात भाजपच्या मंत्री, आमदारांना लोकांमध्ये जाण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्याची चर्चा आहे. भाजपचे हे दरबार पक्षवाढीसाठी पूरक ठरावेत अशा पद्धतीची रचना करण्यात आली असली तरी यामागे शिंदे यांची कोंडी करण्याचे राजकारण सुरू आहे का, अशी कुजबूजही सुरू झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणेश नाईक यांचे जनता दरबार चर्चेत…

१९९५ मध्ये राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार पहिल्यांदा सत्तेवर आले. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी गणेश नाईक यांच्याकडे वन आणि पर्यावरण विभागाचे मंत्रीपद सोपविले. त्याचबरोबर नाईक यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पदही आले. त्यावेळी ठाणे आणि पालघर हा एकत्रित ठाणे जिल्हा होता. देशातील सर्वात मोठ्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नाईक तेव्हा चर्चेत आले. याच काळात नाईकांनी लोकांशी थेट संवाद साधता यावा आणि त्यांचे प्रश्न शासकीय व्यवस्थांसोबत आमने-सामने आणता यावेत यासाठी ‘जनता दरबारा’ची संकल्पना राबविण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे जनता दरबार भरविणारे पहिले मंत्री म्हणून तेव्हा नाईक नावाजले गेले. पुढे राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर आले आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करते झालेले नाईक २००४ ते २०१४ या काळात ठाण्याचे सलग दहा वर्ष पालकमंत्री राहिले. या काळात त्यांनी नवी मुंबई, ठाणे, पालघर अशा वेगवेगळ्या भागांमध्ये जनता दरबार भरविले. हजारोंच्या संख्येने नागरिक आपले प्रश्न घेऊन या दरबारात हजर राहात. दिवसदिवसभर हे जनता दरबार चालत.

भाजपच्या आक्रमक राजकारणाचा चेहरा?

अडीच वर्षांपूर्वी राज्यात महायुतीचे सरकार येताच डोंबिवलीचे रवींद्र चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागासारख्या महत्त्वाच्या मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. चव्हाण यांच्याकडे कोकण, पालघर आणि ठाण्याची जबाबदारीही देण्यात आली. कोकण, पालघर पट्टीत संघटना वाढीसाठी तसेच निवडणुकांच्या नियोजनासाठी चव्हाण यांनी पूर्ण कसब पणाला लावले. ठाण्यात मात्र चव्हाण आपला ठसा उमटवू शकले नाही. एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद असल्यामुळे ठाणे, डोंबिवलीत चव्हाण यांचे काही चालतही नव्हते. शिंदे पिता-पुत्राच्या आक्रमक राजकारणापुढे चव्हाण निष्प्रभ ठरले. संघटना पातळीवरदेखील ठाणे, डोंबिवली पट्ट्यात शिंदे यांच्यापुढे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे मनोबल उंचावेल असे फारसे त्यांच्याकडून काही घडले नाही. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. शिंदे हे मुख्यमंत्री नाहीत. गणेश नाईक हे चव्हाण यांच्यापेक्षा आक्रमक नेते आहेत. आगरी समाजातून येणारे नाईक यांना ठाणे, पालघर, रायगड पट्टीतील ग्रामीण भागात मानणारा एक मोठा वर्ग आहे. नाईक यांचे राजकारण ऐन भरात असताना सध्या राजकारणाच्या पहिल्या फळीत दिसणारे अनेक नेते तेव्हा राजकारणाची बाराखडी गिरवत होते. त्यामुळे शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात जनता दरबार घेताना प्रशासकीय यंत्रणा नाईक यांना ‘हलक्यात’ घेईल अशी शक्यता कमीच आहे. ठाणे शहरातील जनमानसावर या दरबारांचा किती प्रभाव पडेल याविषयी वेगवेगळे तर्क वितर्क असले तरी मरगळलेल्या भाजपमध्ये उत्साह फुंकण्यासाठी त्याचा उपयोग होईल असे अनेकांना वाटते.

शिंदे यांना रोखण्यासाठी?

शिवसेनेतील फुटीनंतर लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने चांगली कामगिरी केली आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसला. तेव्हाही शिंदे यांचा पक्ष बरी कामगिरी करताना दिसला. विधानसभा निवडणुकीत शिंदे यांनी बरीच मेहनत घेतली. त्यांचा चेहरा पुढे करत राबविण्यात आलेल्या योजनाही गाजल्या. या योजनांचा प्रभाव लक्षात घेता शिंदे स्वत:ची ओळख आजही ‘लाडका भाऊ’ असा करताना दिसतात. शिंदेचा हा वाढता प्रभाव लक्षात घेता त्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठा भाऊ कोण यावरून शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी या विधानसभा मतदारसंघात मध्यंतरी नाईक यांनी एक सभा घेताना ठाण्यात जनता दरबाराची घोषणा केली. शिंदे समर्थकांसाठी हा मोठा धक्का मानला गेला. ‘ठाण्यात फक्त कमळ’ अशी घोषणाही नाईकांनी केली. नाईक यांच्या या आक्रमक चालींवर भाजपच्या श्रेष्ठींनी देखील सोयिस्कर मौन स्वीकारल्याचे पाहायला मिळाले. आपल्या घरात येऊन नाईक आपल्याच नेत्याला आवाज देत असल्याची शिंदेसेनेतील प्रत्येकाची भावना आहे. नाईकांच्या जनता दरबाराच्या निमित्ताने भाजपकडून शहरात केले जाणारे शक्तिप्रदर्शनही शिंदेसेनेच्या पचनी पडणे अवघड झाले आहे. एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याची ही रणनीती असल्याची शंकाही शिंदेसेनेत दबक्या सुरात व्यक्त होऊ लागली आहे.