लहानपणी ‘सांग सांग भोलानाथ’ या बडबडगीतामध्ये ‘आठवड्यातून रविवार येतील का रे तीनदा’ असे आर्जव केले जायचे. मुळात आठवड्यातून तीन रविवार असणे अशक्यप्राय असले तरी तीन सुट्यांचे दिवास्वप्न हे गीत ऐकताना बालके पाहायची. मात्र हे दिवास्वप्न आता खरे होणार आहे, ते बालकांसाठी नव्हे, तर कर्मचाऱ्यांसाठी. कारण करोनाचा फटका बसल्याने जगातील अनेक देश चार दिवसांचा आठवडा म्हणजेच चार दिवस काम आणि तीन दिवस सुटी असा प्रयोग करत असून मागे यूएई आणि आता बेल्जियम या देशांनी याबाबत निर्णयही घेतला आहे.
बेल्जियम सरकारचा निर्णय काय?
बेल्जियम सरकारने नोकरदार वर्गासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या देशातील कर्मचाऱ्यांना आता आठवड्यातून फक्त चार दिवस काम करावे लागणार आहे. पंतप्रधान ॲलेक्झांडर डी क्रू यांनी मंगळवारी त्याबाबत घोषणा केली असून कामगार कायद्यात मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमानुसार कर्मचाऱ्यांना सोमवार ते गुरुवार काम करावे लागणार असून शुक्रवार ते रविवार अशी तीन दिवस सुटी असेल. मात्र चार दिवसांत आठवडा असला तरी आठवडाभरात ३८ तास काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास वाढणार आहे. विशेष म्हणजे काम झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना कार्यालयीन संदेशाकडे दुर्लक्ष करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. ‘‘करोना काळाने आम्हाला अधिक लवचिकतेने काम करण्यास भाग पाडले आहे. नोकरदारांनीही त्या अनुषंगाने अनुकूलता दाखवण्याची गरज असून बेल्जियम नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठीच हा निर्णय घेतला आहे,’’ असे पंतप्रधान क्रू यांनी सांगितले.
जगातील अन्य देशांत काय स्थिती?
स्कॉटलंडने सप्टेंबर २०२१मध्ये चार दिवसांच्या आठवड्याबाबत परीक्षण सुरू केले होते. स्कॉटिश नॅशनल पक्षाने सत्तेत येण्यापूर्वी निवडणूक प्रचारात याबाबत जनतेला आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी ‘चार दिवस काम, तीन दिवस सुटी’ असा प्रयोग सुरू केला आहे. स्पेन, आइसलँड आणि जपान या देशांनीही गत वर्षी प्रयोगिक तत्त्वावर काही कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय घेतला आहे. स्पेन सरकारने २०० कंपन्यामध्ये हा प्रयोग केला आहे, ज्यात जवळपास तीन ते सहा हजार कर्मचारी पुढील तीन वर्षे आठवड्यातील चारच दिवस काम करणार आहेत. न्यूझीलंडमध्ये गेल्या वर्षी युनिलीव्हर कंपनीने कर्मचाऱ्यांना पगारकपात न करता चार दिवसांचा आठवडा सुरू केला आणि त्यांना चांगला परिणाम पाहायला मिळाला. संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएई सरकारने गेल्या महिन्यांत साडेचार दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला आहे. युएईसह बहुतेक आखाती देशांमध्ये रविवार ते गुरुवार असा कामकाजाचा आठवडा असतो, तर शुक्रवार- शनिवार साप्ताहिक सुटी असते. मुस्लीमबहुल असलेल्या या देशांतील नागरिकांना शुक्रवारचा नमाज पठण करता यावे म्हणून सुट्ट्यांचे अशा प्रकारे नियोजन केले जाते. मात्र जागतिक स्पर्धेत बरोबरी करण्यासाठी यूएई सरकारने यात बदल करून शनिवार व रविवार हे साप्ताहिक सुटीचे दिवस केले आहेत, तर शुक्रवारी कर्मचाऱ्यांना केवळ अर्धा दिवस काम करावे लागणार आहे. शुक्रवारी दुपारी नमाज पठण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सुटी देण्यात आली असल्याचे येथील सरकारने हा निर्णय घेताना सांगितले होते.
भारतामध्ये केंद्र सरकारचा प्रस्ताव…
केंद्र सरकाने कामगार नियमांमध्ये अशी तरतूद केली आहे की कंपन्यांना कामाचा आठवडा चार दिवसांचा करता येऊ शकेल. म्हणजेच कर्मचाऱ्यांना तीन दिवस साप्ताहिक सुटी देण्याची मुभा या तरतुदीनुसार देण्यात आली आहे. मात्र हा निर्णय घेताना आठवड्याची ४८ तास काम ही मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे. सहा दिवसांचा कामकाजाचा आठवडा असलेल्या कंपन्यांमध्ये कर्मचारी आठ तास काम करतात, तर पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा असलेल्या कर्मचाऱ्यांना किमान नऊ तास काम करावे लागते. जर चार दिवसांचा कामकाजाचा आठवडा झाला तर कर्मचाऱ्यांना १२ तास काम करावे लागणार आहे. तीन दिवसांच्या साप्ताहिक सुटीमुळे कर्मचाऱ्यांना अधिक वेळ कुटुंबासोबत व्यतीत करायला मिळणार असून घरगुती कामे करण्यासही वेळ मिळणार आहे. मात्र चार दिवस १२ तासांपेक्षा अधिक दिवस काम करावे लागणार असल्याने या निर्णयाला विरोध होण्याची शक्यता आहे. चार दिवसांचा आठवडा हा केवळ पर्याय असेल आणि कंपन्यांना त्याची सक्ती नसेल, असे आधीच केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
भारतात यश मिळेल?
तीन दिवस साप्ताहिक सुटी मिळाल्याने कर्मचाऱ्यांना कौटुंबिक आनंद उपभोगायला मिळणार असला तरी १२ तासांचे कामाचे ओझे वाहावे लागणार आहे. त्यामुळे उद्योग संघटना किंवा कामगार संघटना याच अनुकूल असतील का हे पाहावे लागणार आहे. कर्मचाऱ्यांना १२ तासांचे काम करण्याचा शीण येऊन त्याच्या उत्पादकेवरही परिणाम होऊ शकतो. मुंबईसारख्या शहरात कर्मचाऱ्यांना घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर यासाठी तीन ते चार तास प्रवासात व्यतीत करावे लागतात. दिवसाला १२ तासांचे काम करावे लागल्यास तब्बल १६ ते १७ तास घराबाहेर राहावे लागणार असल्याने कार्यालयीन दिवसांत कुटुंबाकडे सपशेल दुर्लक्ष करावे लागेल, त्याशिवाय शारीरिक आणि मानसिक थकवा येण्याचीही शक्यता आहे. महिला वर्ग आणि कुटुंबाची अधिक जबाबदारी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिक काळ कुटुंबाशिवाय राहणे शक्य होणार नाही. रुग्णालय, रेल्वे, बँका, मॉल, हॉटेल यांसह अत्यावाश्यक सेवा पुरवणाऱ्या क्षेत्रामध्ये चार दिवसांचा आठवडा हा पर्याय निवडणे शक्यच होणार नाही.
उत्पादकतेवर परिणाम?
कामाचे तास आणि उत्पादकता यावर जगभरात बरीच संशोधने झाली आहे. कर्मचारी किती तास काम करतात यापेक्षा त्यांची काम करण्याची एकग्रता, काम करण्यातून मिळणार आनंद आणि मन लावून केले काम यांमुळे उत्पादकता वाढते, असे कामगार क्षेत्रातील काही तज्ज्ञांचे मत आहे. अमेरिकेच्या ओहायो विद्यापीठाने कामकाजाचे तास आणि उत्पादकता यावर संशोधन केले आहे. त्यासाठी त्यांनी अमेरिका आणि स्वीडन या देशांची तुलना केली आहे. अमेरिकेत पाच दिवसांचा आठवडा असला तरी ४० टक्के कर्मचारी आठवड्याला ५० तास काम करतात. अमेरिकेतील ॲफोर्डेबल केअर ॲक्टनुसार आठवड्याला ४० तासांचे काम कर्मचाऱ्यांसाठी योग्य आहे. मात्र याचे पुरेसे पालन केले जात नाही. स्वीडनमध्ये पाच दिवसांचा आठवडा असला तरी कर्मचाऱ्यांसाठी दिवसाला सहा तासांचा मर्यादा आहे. त्यामुळे स्वीडनमधील बहुतेक कंपन्यांमध्ये उत्पादकता अधिक असल्याचे दिसून येते, असे ओहायो विद्यापीठातील संशोधकांनी सांगितले. कामाचा आठवडा लहान केल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या उत्पादकतेत ६४ टक्के वाढ होते. मात्र त्यासाठी सहा दिवसांचे कामकाजाचे तास चार दिवसांत संपवणे असा त्याचा अर्थ नाही, असे या संशोधकांनी सांगितले.