भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी आणि ब्रिटनमधील पहिले भारतीय खासदार अशी ओळख असलेल्या दादाभाई नौरोजी यांच्या लंडनमधील घराला ‘ब्लू प्लाक’ सन्मानने गौरवण्यात आलं आहे. या घरामध्ये दादाभाई नौरोजी हे आठ वर्ष वास्तव्यास होते. ‘ब्लू प्लाक’ सन्मान हा लंडनमधील महत्वाच्या ऐतिहासिक इमारतींना दिला जाणारा एक विशेष सन्मान आहे. इंग्लिश हेरिटेजच्या माध्यमातून हा सन्मान काही ठराविक वास्तूंना देण्यात येतो. भारत स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करुन ७६ व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना हा सन्मान देण्यात आल्याने त्याला विशेष महत्व प्राप्त जालेलं आहे.
भारतीय राजकारणातील एक आघाडीचे विचारवंत म्हणून ओळख असणारे दादाभाई नौरोजी हे १९ व्या शतकामध्ये जवळजवळ आठ वर्ष लंडनमधील याच घरात राहत होते. दादाभाई नौरोजी हे १८९७ मध्ये या घरामध्ये राहण्यासाठी गेले. हा तोच काळ होता ज्यावेळी ते भारताला ब्रिटीशांनी पूर्ण स्वातंत्र्य दिलं पाहिजे या विचाराचे खंदे समर्थक होते. नौरोजी यांचं वॉशिंग्टन हाउस ७२ एनर्ले पार्क, पेंगे ब्रोमली येथील या घराचं बांधकाम लाल विटांनी करण्यात आला आहे. या घराच्या बाहेर हे घर दादाभाईंचं होतं असा मजकूर असणारी पाटी लावण्यात आली आहे. ‘दादाभाई नौरोजी १८२५ ते १९१७, भारतीय राष्ट्रवादी नेते आणि खासदार येथे रहायचे,’ असं या पाटीवर लिहिलेलं आहे.
दादाभाई नौरोजींनी १९०५ मध्ये हे घर सोडलं
इंग्लिश हेरिटेजने जारी केलेल्या एका पत्रकामध्ये दादाभाईंनी सात वेळा इंग्लडचा दौरा केला. त्यांनी लंडनमध्ये ३० वर्षांहून अधिक काळ वास्तव्य केलं. १८८७ मध्ये ते वॉशिंग्टनला गेले आणि तिथे त्यांनी वेल्बी आयोगाच्या कामामध्ये हातभार लावला. ब्रिटीश सरकारने भारतामध्ये होत असणाऱ्या वायफळ खर्चाबद्दलचा आढावा घेण्यासाठी या आयोगाची निर्मिती केली होती. या संदर्भात त्यावेळेच्या अर्थतज्ज्ञांनी भारतामध्ये होणाऱ्या खर्चाबद्दल आपली मतं व्यक्त केली होती. यामध्ये दादाभाई नौरोजींनी १८९१ मध्ये त्यांच्या ‘पॉव्हर्टी अॅण्ड अनब्रिटिश रूल इन इंडिया’ या पुस्तकामध्ये भारतात होणाऱ्या सरकारी खर्चाबद्दल मतं व्यक्त केलेली. इंग्लिश हेरीटेजच्या माहितीनुसार नौरोजी यांनी १९०५ मध्ये हे घर सोडलं.
‘ब्लू प्लाक’चं ऐतिहासिक महत्त्व काय?
ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाच्या इमारतींवर स्मारक पट्ट्या लावण्याचा विचार सर्वात आधी ब्रिटिश नेते विलियम इवार्ट यांनी १८६३ साली हाउस ऑफ कॉमन्समध्ये मांडला. मात्र त्यावेळी त्यांचा हा ठराव सरकारने मान्य केला नाही. लंडनमध्ये पूर्वी वास्तव्यास असणाऱ्या महत्त्वपूर्ण व्यक्ती आणि संस्थांच्या इमारतींवर या स्मारक पट्ट्या लावण्यात याव्यात असं इवार्ट यांचं म्हणणं होतं. यानंतर रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्सने ‘ब्लू प्लाक’ योजनेची सुरुवात केली. राॉयल सोसायटी ऑफ आर्ट्सने संगीतकार, समाजसेवक, डॉक्टरांनी सुरुवातीला हा सन्मान दिला. १८६७ मध्ये पहिल्यांदा कवी लॉर्ड बायरन यांच्या २४ होल्स स्ट्रीट येथील क्वॅवेंडिश स्वेअर या घराला ‘ब्लू प्लाक’ हा सन्मान देण्यात आला. त्यानंतर १८८६ साली इंग्लिश हेरिटेजने ही योजना आपल्या ताब्यात घेतली. तेव्हापासून आतापर्यंत १५० वर्षांमध्ये लंडनमधील ९०० हून अधिक इमारतींना ‘ब्लू प्लाक’ सन्मान देण्यात आला आहे.
‘ब्लू प्लाक’ यापूर्वी या भारतीयांना मिळाला आहे
‘ब्लू प्लाक’ हा सन्मान प्रसिद्ध व्यक्ती किंवा इमारतीमध्ये घडलेल्या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दिला जातो. ब्रिटनच्या इतिहासावर ज्या व्यक्ती अथवा घटनांनी छाप पाडली त्यांच्याशी संबंधित इमारतींना या सन्मानाने गौरवण्यात येतं. यापद्धचा ‘ब्लू प्लाक’ सन्मान यापूर्वी महात्मा गांधी, मोहम्मद अली जिन्ना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजा राममोहन रॉय यांना देण्यात आला आहे. मात्र नूर इनायत खान या दक्षिण आशियामधील पहिल्या महिला होत्या ज्यांना लंडनमधील हा मानाचा ‘ब्लू प्लाक’ सन्मान देण्यात आला होता. १९१४ साली पहिल्या महायुद्ध सुरु झालं त्याच वर्षी जन्मलेल्या नूर इनायत खान यांचा १९४४ साली म्हणजेच दुसऱ्या महायुद्धाच्या वर्षीच मृत्यू झाला. नूर इनायत खान यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या कालावधीमध्ये ब्रिटनसाठी हेरगिरी केली होती. पंडित जवाहरलाल नेहरु, व्ही. के. कृष्ण मेनन, श्री अरबिंदो, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, रवींद्रनाथ टागोर, लोकमान्य टिळक यांनाही या सन्माने गौरवण्यात आलं आहे.