Buddha Purnima : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे इतिहासाच्या पानातील असे नाव आहे, ज्यांनी प्रत्येक भारतीयाच्या मनात संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची मूल्ये रुजवली. त्यांनी आर्थिक, राजकीय पातळीवर देशकल्याणासाठी भरीव काम केले, यासह सामाजिक क्षेत्रातही भरीव योगदान दिले. देशातील दलित, पीडित, अस्पृश्य, महिलावर्गाला समान अधिकार मिळावेत म्हणून त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात बौद्ध धर्माचा स्वीकार करून दलितांना समान अधिकार मिळवून देण्यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे हिंदू धर्माव्यतिरिक्त ख्रिश्चन, शीख, मुस्लीम असे अन्य धर्म स्वीकारण्याचा पर्याय होता. मात्र त्यांनी बौद्ध धर्मच का निवडला, असा प्रश्न उपस्थित केला जातो. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न-
केळुसकर गुरुजींनी दिले भगवान बुद्धाचे चरित्र
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यात भगवान गौतम बुद्ध लहानपणापासूनच आले. गौतम बुद्धांच्या विचारांचा, शिकवणीचा प्रभाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लहानपणापासूनच पाहायला मिळतो. १९०७ साली बाबासाहेब मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. या परीक्षेत त्यांना ७५० पैकी २८२ गुण मिळाले. त्या काळात एका महार मुलाने मॅट्रिकच्या परीक्षेत यश मिळवणे म्हणजे एक मोठी घटना होती. याच कारणामुळे भीमराव रामजी आंबेडकर (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) यांच्या सत्कारासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास त्या काळातील प्रसिद्ध शिक्षक, नावाजलेले ग्रंथकार, समाजसुधारक कृष्णाजी अर्जुन केळुसकर हेदेखील उपस्थित होते. या कार्यक्रमात केळुसकरांनी स्वत: लिहिलेले मराठीतील बुद्धचरित्र भीमराव यांना भेट दिले. तेव्हापासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर गौतम बुद्ध आणि बुद्धांच्या शिकवणीचा प्रभाव राहिला.
हेही वाचा >> विश्लेषण: बुद्ध पौर्णिमा २०२३- बुद्धमूर्तीमुळे प्रकाशात आले पहिल्या शतकातील प्राचीन जागतिकीकरण !
‘हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही…’
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, असे असले तरी त्यांनी धर्मांतराचे संकेत बऱ्याच वर्षांआधी दिले होते. १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवल्यात एका परिषदेला संबोधित करताना ‘दुर्दैवाने मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो, हा काही माझा अपराध नाही. परंतु मरताना मात्र मी हिंदू म्हणून मरणार नाही,’ असे बाबासाहेब म्हणाले होते. आपल्या भाषणात त्यांनी हिंदू धर्मामधील असमानतेवरही बोट ठेवले होते. “आपले माणुसकीचे साधे अधिकार मिळवण्यासाठी आणि हिंदू समाजामध्ये समान दर्जा प्राप्त करून घेण्यासाठी ही चळवळ निष्फळ ठरली आहे. त्या चळवळीसाठी व्यतीत केलेला वेळ, काळ, पैसा वाया गेला आहे. ही मोठी दु:खदायक वस्तुस्थिती आहे. म्हणूनच आपल्याला यासंबंधी अखेरचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. आपल्या दुर्बलतेची, अवनतीची स्थिती आपण हिंदू समाजाचे घटक आहोत, म्हणून आपल्यावर ओढवली आहे. म्हणून जो धर्म समान दर्जा देईल, समान हक्क देईल आणि योग्य तऱ्हेने वागवील अशा एखाद्या दुसऱ्या धर्मात जावे, असे तुम्हाला वाटत नाही का?” असे डॉ. आंबेडकर यांनी आपल्या भाषणात विचारले होते. हे करतानाच बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडा, असे आवाहन आपल्या अनुयायांना केले होते. “हिंदू धर्माशी असलेला संबंध तोडा. स्वाभिमान आणि शांतता मिळेल, अशा दुसऱ्या धर्मात जा. परंतु लक्षात ठेवा जो धर्म तुम्ही निवडाल त्यात समान दर्जा, समान संधी आणि समान वागणूक मिळाली पाहिजे!” असे बाबासाहेब म्हणाले होते.
हेही वाचा >> विश्लेषण : बुद्ध पौर्णिमा २०२३ : गौतम बुद्धांच्या हस्तमुद्रा काय सूचित करतात ?
धर्मगुरू आणि धर्मप्रचारकांचे बाबासाहेबांना साकडे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची भाषा केल्यामुळे हिंदू धर्मगुरूंसह इतर धर्मीयदेखील चकित झाले. आंबेडकर तसेच त्यांचे अनुयायी आपल्या धर्मात आल्यास निश्चितच आम्हाला त्याचा फायदा होईल, असे मुस्लीम, ख्रिश्चन यांच्यासह शीख धर्मगुरूंना वाटत होते. त्यासाठी या मंडळींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी संवादही साधण्याचा प्रयत्न केला. डॉ. आंबेडकरांच्या ‘राजगृह’ या निवासस्थानावर स्वदेश तसेच परदेशांतून तारा आणि पत्रांचा वर्षाव सुरू झाला. मुस्लीम आणि ख्रिश्चन पुढाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या होत्या. अस्पृश्य समाजाला राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक क्षेत्रांत समान अधिकार देण्यास आम्ही मुस्लीम तयार आहोत. त्यांच्या स्वागतासाठी हिंदी मुस्लीम सिद्ध आहेत, अशा आशयाची तार कन्हेयालाल गौबा नावाच्या विधिमंडळातील एका मुस्लीम सभासदाने बाबासाहेबांना केली होती.
सुवर्ण मंदिर संस्थेच्या उपाध्यक्षांचेही पत्र
पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिर संस्थेचे तत्कालीन उपाध्यक्ष सरदार दरिपसिंग दोबिया यांनी बाबासाहेबांना एक तार लिहिली होती. यामध्ये “अस्पृश्यांना आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी शीख धर्म देऊ शकतो. शीख धर्म एकेश्वरी आहे. शीख धर्म सर्वांना ममतेने आणि समतेने वागवणारा आहे,” असे दोबिया आपल्या या तारेमध्ये म्हणाले होते.
हेही वाचा >> विश्लेषण: बुद्ध पौर्णिमा २०२३- भारतात सर्वाधिक बौद्ध लेणी का आढळतात?
धर्मांतराचे ख्रिश्चन धर्माकडून स्वागत आहे- ख्रिश्चन धर्मगुरू
ख्रिश्चन धर्मीयांनीदेखील बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या भूमिकेचे स्वागत केले होते. “ख्रिश्चन धर्माच्या जीवनादर्शाप्रमाणे बोलायचे झाल्यास, एवढ्या मोठ्या समाजाला मनोभावे धर्मांतराची आवश्यकता वाटल्याविना ते हृदयाने खरे ख्रिश्चन होतील, ही गोष्ट अशक्य आहे. आंबेडकरांच्या धर्मांतराचे ख्रिश्चन धर्माकडून स्वागत आहे. अस्पृश्य समाजाच्या नव्या युगाची सकाळ जवळ आली आहे. आंबेडकरांची घोषणा हे त्याचेच प्रतीक आहे,” असे मुंबईतील मॅथॉडिस्ट एपिस्कोपल चर्चचे बिशप ब्रेनटन थॉबर्न ब्रॅडले म्हणाले होते.
बौद्ध धर्मच का स्वीकारला? खुद्द बाबासाहेब म्हणतात…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३५ साली धर्मांतर करण्याचे संकेत दिले असले तरी, त्यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काळात प्रत्यक्ष धर्मांतर केले. धर्मांतरासाठी त्यांनी बौद्ध धर्माचीच निवड केली. डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी धर्मांतरापूर्वी सर्व धर्मांचा सखोल अभ्यास केला होता. वेगवेगळ्या धर्मांची मूल्ये, शिकवण अभ्यासूनच त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याचे ठरवले. डॉ. आंबेडकरांनी १९५० साली ‘बुद्ध आणि त्याच्या धर्माचे भवितव्य’ नावाने एक महत्त्वपूर्ण लेख लिहिला होता. या लेखात त्यांनी बौद्ध धर्माच्या जमेच्या आणि कमकुवत बाजूंवर भाष्य केले होते. प्रचलित धर्मांमध्ये जगाने स्वीकार करावा, असा बौद्ध धर्म हा एकच धर्म आहे, असे आंबेडकर म्हणाले होते. या लेखावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला याची उत्तरे मिळू शकतात.
हेही वाचा >> विश्लेषण : ‘एआय’चा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होण्याची भीती? मायक्रोसॉफ्ट, गुगल उच्चाधिकाऱ्यांनी का व्यक्त केली चिंता?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर या लेखात काय म्हणाले होते?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला हा लेख ‘महाबोधी’ या संस्थेच्या मासिकात १९५० च्या मे महिन्यात प्रसिद्ध झाला होता. या लेखात “समाजाच्या स्थैर्याला निर्बंधांचा किंवा नीतीचा आधार पाहिजे. यापैकी कोणत्याही एकाचा अभाव असल्यास समाज खात्रीने रसातळाला जाईल. जर धर्म चालू राहावयाचा असेल तर तो बुद्धिप्रामाण्यवादी असावा. विज्ञान हे बुद्धिप्रामाण्यवादाचे दुसरे नाव आहे. धर्माने केवळ नीतीची संहिता बनणे हे काही धर्माचे वर्चस्व नाही. धर्माच्या नैतिक संहितेने स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूलभूत तत्त्वांना मान्यता दिली पाहिजे. धर्माने दारिद्र्याला पवित्र मानायला नको,” असे आंबेडकर यांनी या लेखात म्हटले होते. तसेच या सर्व अपेक्षा हा बौद्ध धर्मच पूर्ण करतो. त्यामुळे सध्या असलेल्या सर्व धर्मांमध्ये जगाने स्वीकारायला हवा असा बौद्ध धर्म हा एकमेव धर्म आहे, असेही मत आंबेडकर यांनी या लेखात व्यक्त केले होते. प्रचलित बौद्ध भिक्षूंच्या अंगी ज्ञान आणि सेवा यांचा अभावच आहे. बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी एखादा आधारभूत ग्रंथ पाहिजे, अशा भावनाही आंबेडकर यांनी या लेखात व्यक्त केल्या होत्या.
बौद्ध धर्माची तत्त्वे टिकाऊ आहेत- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ५ मे १९५० रोजी मुंबईत परतले होते. तेव्हा ‘जनता’ नियतकालिकाच्या प्रतिनिधीने डॉ. आंबेडकरांना ‘तुम्ही बौद्ध धर्म स्वीकारणार का,’ असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाच्या उत्तरातही डॉ. बाबासाहेब आबंडेकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला याची उत्तरे मिळू शकतात. “बौद्ध धर्माकडे माझ्या मनाचा कल निश्चित झालेला आहे. कारण बौद्ध धर्माची तत्त्वे टिकाऊ आहेत. ही तत्त्वे समानतेवर आधारलेली आहेत,” असे आंबेडकर तेव्हा म्हणाले होते.
हेही वाचा >> विश्लेषण: अमेरिकेतील आणखी एक बँक का बुडाली? ही संकटमालिका सुरूच राहणार?
बौद्ध धर्माची घेतली दीक्षा
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सुरुवातीपासूनच बौद्ध धर्माकडे कल असला तरी त्यांनी लगेच हिंदू धर्माचा त्याग केला नाही. त्यांनी हिंदू धर्मातील अनिष्ट चालीरीती, अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी सामाजिक चळवळ उभी केली. हा लढा नेटाने लढला. महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिराचा सत्याग्रह, अस्पृश्य समाजातील लोकांचे प्रबोधन करण्यासाठी घेतलेल्या परिषदा, सभा ही त्याचीच उदाहरणे म्हणता येतील. मात्र आयुष्याच्या शेवटच्या काही दिवसांत त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याचे ठरवले. पुढे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांनी नागपूरमध्ये आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
संदर्भ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर- धनंजय कीर