World War II Ship wreck found: १९४२ साली दुसऱ्या महायुद्धात जपानी हल्ल्यामध्ये बुडालेल्या युद्धनौकेचा शोध आता ८१ वर्षांनंतर लागला आहे. या युद्धनौकेच नाव ‘यूएसएस एड्सॉल’ असे होते. यूएसएस एड्सॉल ही युद्धनौका १ मार्च १९४२ रोजी बुडाली. यात या नौकेवर असलेल्या २०० हून अधिक अमेरिकन नौसैनिकांचे प्राण गेले. गेल्या वर्षी क्रिसमस बेटाच्या पूर्वेला सुमारे २०० मैल, जावा बेटाजवळ रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्हीला या युद्धनौकेचे अवशेष आढळले. परंतु या शोधाची घोषणा मात्र अलीकडेच व्हेटरन्स डेच्या (११ नोव्हेंबर २०२४) निमित्ताने चरच दिवसांपूर्वी करण्यात आली, त्याची ही शोधगाथा.
शूरवीरांचा सन्मान
कॅप्टन जोशुआ निक्स आणि त्यांच्या दलाने शौर्याने दुसऱ्या महायुद्धात लढा दिला होता. जपानी युद्धनौका आणि क्रूझर्सकडून १,४०० तोफ गोळे डागण्यात आले होते, त्यापासून स्वतःचा बचाव करत २६ कॅरियर-डाइव्ह बॉम्बर्सच्या हल्ल्याला सामोरे गेले अशी माहिती अमेरिकेच्या ऑस्ट्रेलियातील राजदूत कॅरोलिन केनेडी यांनी रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्हीचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल मार्क हॅमंड यांच्या बरोबर असलेल्या एका व्हिडिओमध्ये शेअर केली आहे. त्या सांगतात, “देशासाठी त्याग करणाऱ्या शूरवीरांना सन्मान देण्याच्या सततच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. आता आम्ही या महत्त्वपूर्ण स्मारकाचे जतन करू शकतो आणि त्या ठिकाणी प्राण गमावलेल्या वीरांच्या कुटुंबीयांना त्यांचे प्रियजन शांततेत विसावले आहेत, हे माहीत होईल अशी आशा करतो,” असे ही केनेडी म्हणाल्या.
यूएसएस एड्सॉल हे नाव कसे मिळाले?
USS Edsall (DD-219) ही Clemson वर्गातील विनाशिका होती. ही युद्धनौका अमेरिकन नौदलाच्या सेवेत १९२० साली दाखल झाली. या युद्धनौकेला नाविक नॉर्मन एड्सॉल यांच्या नावावरून नाव देण्यात आले होते. त्यांनी फिलीपिन- अमेरिकन युद्धात १८९९ साली शौर्य गाजवले होते. १९२० आणि १९३० च्या दशकात USS Edsall अमेरिकन नौदलाच्या आशियायी ताफ्यात सेवा बजावत होती. या काळात तिने चीन, फिलीपिन्स आणि जपानच्या पाण्यात गस्त घालणे, स्थानिक संघर्षांमध्ये अमेरिकन नागरिकांचे संरक्षण करणे, आणि शांतता राखण्यासाठी विविध सहकार्य मोहिमांमध्ये भाग घेतला. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला, पर्ल हार्बरवरील हल्ल्यानंतर, USS Edsall ला प्रशांत महासागराच्या दक्षिणेस तैनात करण्यात आले होते. तिची प्रमुख जबाबदारी ऑस्ट्रेलियन किनाऱ्यांचे संरक्षण, मित्र राष्ट्रांचे सैन्य आणि जहाजांचे रक्षण करणे होती. USS Edsall ने जपानी हल्ल्यांपासून संरक्षण करणे आणि अन्य जहाजांना मदत करणे यासारखी अनेक महत्त्वपूर्ण कामे बजावली.
या युद्धनौकेला ‘डान्सिंग माऊस’ असे का म्हटले गेले?
एका जपानी लढाऊ सैनिकाने या युद्धनौकेला जहाजाला ‘डान्सिंग माऊस’ असे टोपणनाव दिले होते. कारण ही युद्धनौका अत्यंत चपळाईने शत्रूच्या गोळीबारापासून स्वतःचा बचाव करत असे. अत्यंत कौशल्यपूर्ण हालचाली, धुराचे आच्छादन करण्याच्या तंत्राचा वापर आणि शत्रूच्या हल्ल्यांपासून बचाव करण्याच्या क्षमतेमुळे हे टोपणनाव तिला मिळाले. ३१४ फुटांच्या या विनाशिकेचा शोध ऑस्ट्रेलियन नौदलासाठी अनपेक्षित होता. नौदलाने एका मोहिमेदरम्यान आधुनिक स्वायत्त आणि रोबोटिक प्रणालींचा वापर करून समुद्राच्या तळाशी या युद्धनौकेचा शोध घेतला. “या युद्धनौकेचे अवशेष हे अमेरिकेसाठी एक पवित्र ठिकाण आहे. हे स्थळ युद्धनौकेवर असलेल्या १८५ अमेरिकन नौसैनिक आणि अधिकारी व अमेरिकन हवाईदलाचे ३१ वैमानिक यांचे स्मरण करवून देण्याचे काम करते. या शोधामुळे आजच्या पिढीतील नौसैनिक आणि नागरिकांना देशासाठी प्राणत्याग करणाऱ्या नौसेनिकांच्या शौर्य आणि बलिदानातून प्रेरणा मिळेल”, असे नौदल संचालन प्रमुख लिसा फ्रांचेटी यांनी एका निवेदनात सांगितले.
यूएसएस एड्सॉल महत्त्वाची का होती?
USS Edsall महत्त्वाची होती, कारण तिने दुसऱ्या महायुद्धात महत्त्वपूर्ण भूमिका आणि कार्य बदावले होते. तिच्या लढाऊ कौशल्यामुळे तिने अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या नौदलाच्या इतिहासात विशेष स्थान मिळवले आहे. या युद्धनौकेचे कार्य-
१. ऑस्ट्रेलियन किनाऱ्यांचे संरक्षण: USS Edsall ने ऑस्ट्रेलियन किनाऱ्यांचे रक्षण करण्याचे महत्त्वाचे काम पार पाडले, विशेषतः जपानी हल्ल्यांपासून बचाव करण्यात तिचा मोठा वाटा होता. तिने ऑस्ट्रेलियाला सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये सहभाग घेतला.
२. जपानी पाणबुडीवर यशस्वी हल्ला: USS Edsall ने डार्विनजवळ जपानी पाणबुडी I-124 ला जलसमाधी देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. हे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात महत्त्वाचे यश होते, कारण जपानी पाणबुड्या ऑस्ट्रेलियाच्या समुद्री हद्दीत मोठा धोका निर्माण करत होत्या.
३. बलिदान आणि प्रतिकात्मकता: USS Edsall युद्धात तग धरू शकली नाही, पण तिचे बलिदान आणि त्यावेळेस तिच्यावर असलेले सर्व १८५ नौसैनिक आणि ३१ वैमानिक यांनी अंतिम क्षणापर्यंत लढा दिला. तिचा शोध लागणे हे त्या काळातील शौर्याचे प्रतीक आहे.
अधिक वाचा: एका रात्रीत ८०० मंड्यम अय्यांगारांची हत्या; ‘नरक चतुर्दशी’ हा दिवस शोकदिवस का ठरला?
५. सैन्य आणि नागरिकांसाठी प्रेरणा: या युद्धनौकेचा शोध लागल्याने आजच्या पिढीतील नौदल कर्मचारी आणि नागरिक यांना तिच्या शौर्य व बलिदानाने प्रेरित होण्याची संधी मिळाली आहे. तिची कथा, तिची लढण्याची तयारी आणि कर्मचाऱ्यांचे बलिदान हे नौदलासाठी एक प्रेरणास्रोत ठरले आहे.
यूएसएस एड्सॉल (DD-219) दुसऱ्या महायुद्धात (World War II) वापरण्यात आली होती.
ही युद्धनौका १९४२ साली जपानी सैन्याच्या हल्ल्यात बुडाली. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीच्या काळात, विशेषतः पर्ल हार्बरवरील हल्ल्यानंतर यूएसएस एड्सॉलने प्रशांत महासागरातील अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये यशस्वी योगदान दिले होते. या मोहिमांमध्ये ऑस्ट्रेलियन किनाऱ्यांचे संरक्षण, तसेच जपानी पाणबुड्यांचा नाश करणे यांसारख्या कामांचा समावेश होता. १ मार्च १९४२ रोजी, यूएसएस एड्सॉलचे अंतिम युद्ध झाले. तिच्यावर जपानी लढाऊ जहाजांवरून १४०० तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला, मात्र यूएसएस एड्सॉलने धुराच्या आच्छादनाद्वारे आणि चपळ हालचालींनी बचाव करण्याचा प्रयत्न केला. अखेर, २६ जपानी कॅरियर-डाइव्ह बॉम्बर्सच्या हल्ल्यात यूएसएस एड्सॉलला गंभीर नुकसान पोहोचले आणि तिला जलसमाधी मिळाली.
तब्बल ८१ वर्षांनी शोध
यूएसएस एड्सॉलचा शोध लागण्यास ८१ वर्षे लागली. रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्हीने २०२३ साली आधुनिक रोबोटिक आणि स्वायत्त उपकरणांचा वापर करून भारतीय महासागरात जावाच्या दक्षिणेस आणि क्रिसमस बेटाच्या पूर्वेला तिचे अवशेष शोधले. यूएसएस एड्सॉलला इतिहासात विशेष स्थान मिळाले आहे. जपानी हल्ल्यात तिने दिलेल्या प्रतिकारामुळे तिला ‘डान्सिंग माऊस’ म्हणून ओळखले गेले, आणि तिचे अवशेष सापडल्याने युद्धातील तिचे योगदान आणि अमेरिकन नौदलाच्या शौर्याचे एक प्रतीक म्हणून ती स्मरणात राहील.