खरे तर प्रत्येक धर्मात शांतीचं महत्त्व सांगताना गोंगाट गोंधळाला विरोध करण्यात आला आहे. आतल्या आवाजाचं ऐकत आत्म्याची शांती अनुभवावी असा संदेशही प्रत्येक धर्म देताना दिसतो. परंतु, मानवी कर्णेद्रियांना चालू शकणाऱ्या आवाजापेक्षा जास्त आवाज करणाऱ्या लाउड स्पीकर्सचा, भोंग्यांचा वा डिजेचा वापर प्रार्थनेसाठी, धार्मिक आवाहनासाठी वा मिरवणुकांसाठी करताना भारतात वारंवार दिसून येतो. अनेकांचा दावा आहे की, प्रार्थना वा मिरवणुकींसाठी भोंगे वापरणे ही परंपराच आहे. पण, लाउड स्पीकर्सचा शोध तर दूरध्वनीसह १८६१ मध्ये लागला, आणि सध्या आपण अनुभवत असलेल्या लाउड स्पीकर्सचा शोध तर नंतर तिसेक वर्षांनी लागला. याचा अर्थ ही परंपरा फारतर गेल्या १२० – १३० वर्षांची असू शकते, त्यापेक्षा जुनी नाही.

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

लाउड स्पीकर्सचा वापर पहिल्यांदा कधी झाला?

टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार लाउड स्पीकर्सचा प्रथम वापर सिंगापूरमध्ये सर्वप्रथम १९३६ मध्ये एका मशिदीत केला गेला. त्यापूर्वी मुअझ्झिन मशिदींमध्ये लाउड स्पीकर्सशिवायच बांग देत होते. १८९४ नंतर भारतामध्ये स्वातंत्र्य चळवळीमध्ये धार्मिक मिरवणुका राजकीय कार्यासाठी ब्रिटिशांविरोधात वापरायचं एक प्रभावी साधन म्हणून रस्त्यावर आल्या, ज्यात लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा समावेश होतो. विसाव्या शतकात यामध्ये लाउड स्पीकर्स म्हणजेच भोंग्याची भर पडली. पण, केवळ संदेशच द्यायचा असेल तर आता एकविसाव्या शतकात मोबाइल, दूरचित्रवाणी, आकाशवाणी व अन्य तंत्रज्ञान इतकं प्रगत आहे की त्यासाठी भोंग्यांची गरज भासू नये. शहरीकरणामुळे नागरी वस्त्या इतक्या दाट झाल्या आहेत की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जास्त महत्त्वाचा ठरायला हवा. अनेक पाश्चात्य देशांमध्ये धार्मिक संदेश देण्यासाठी चर्च दूरचित्रवाणीवरील स्वतंत्र वाहिन्या, मोबाइल फोन आदींचा वापर करत आहे. अत्यंत जास्त डेसीबल पातळी असते म्हणून खुद्द सौदी अरेबियामध्ये मे २०२१ मध्ये लाउड स्पीकर्सवरून अजान देण्यास बंदी घालण्यात आली.

मुंबईत ध्वनीप्रदुषणाची पातळी काय आहे?

मुंबईचा विचार केला तर ध्वनी प्रदूषणाची पातळी रस्त्यावरील वाहतूक, इमारत बांधकामे वगैरेंमुळे आधीच दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आहे. मुंबईतील ध्वनीप्रदूषण आत्ताच जागतिक आरोग्य संघटनेने मानवासाठी आखून दिलेल्या सुरक्षित पातळीपेक्षा जास्त होत आहे. आवाज फाउंडेशनच्या सुमेरा अब्दुलाली सांगतात, नुकतंच आम्ही केलेल्या मोजमापानुसार मुंबईत वाहतुकीमुळे ९५.३ डेसीबल इतका ध्वनीप्रदूषण होते तर बांधकामांमुळे ९७.२ डेसीबल इतके. ध्वनीप्रदूषण करणारी प्रत्येक गोष्ट भारतीय शहरांमधील गोंगाटात भर टाकत राहते. न्यायालयाच्या आदेशांचे पालन करत ध्वनीप्रदूषण कमी करण्याचे सोडून आपण हा विषय राजकीय व धार्मिक केल्याची खंत अब्दुलाली यांनी व्यक्त केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा २०००चा आदेश काय आहे?

सुप्रीम कोर्ट म्हणते, “शहरीकरणामुळे व औद्योगिकीकरणामुळे भारतातल्या काही शहरांमध्ये ध्वनीप्रदुषणाची पातळी प्रतिबंधित पातळीपेक्षा जास्त आहे. याचा अर्थ असा नाही की, म्हणून इतरांनाही ढोल बडवायला, जोरजोरात संगीत वाजवायला वा भोंगे वापरायला परवानगी द्यावी.” आवाज फाउंडेशन व सुमेरा अब्दुलाली यांच्या याचिकेवर निकाल देताना ऑगस्ट २०१६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने नमूद केले आहे की, “कुठलाही धर्म अथवा पंथ असा दावा करू शकत नाही की, भोंगे वा तत्सम ध्वनीवर्धक उपकरणे वापरणे कलम २५ अंतर्गत त्यांच्या धर्मातील अत्यावश्यक बाब आहे.”

मुंबई उच्च न्यायालय काय सांगते?

मुंबई उच्च न्यायालयाचा या संदर्भातला आदेश सांगतो की, डेसीबल पातळीची कायदेशीर मर्यादा राखणे हे सर्व धर्मांसाठी लागू आहे. अब्दुलाली खंत व्यक्त करताना सांगतात, परंतु सगळ्या राजकीय पक्षांचे नेते भावना भडकावणारी वक्तव्ये करतात आणि त्यांच्या राजकीय कुरघोडीच्या डावांमुळे ध्वनीप्रदुषणात भरच पडत आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loudspeaker use history and politics over this issue
Show comments