अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक असलेले आणि जगभरात आदरणीय असलेले अब्राहम लिंकन यांच्या लैंगिक जीवनाविषयी एका नवीन लघुपटामुळे वाद निर्माण झाला आहे. अब्राहम लिंकन समलिंगी होते आणि त्यांचे वेगवेगळ्या वेळी चार पुरुषांबरोबर शारीरिक संबंध होते असे ‘लव्हर ऑफ मेन’ या लघुपटातून सुचवण्यात आल्यामुळे वाद उद्भवला आहे.
समलिंगी संबंधांबद्दल प्रथम नोंद…
अमेरिकेच्या यादवी युद्धादरम्यान, १८६२मध्ये अब्राहन लिंकन यांचे त्यांच्या डेव्हिड डेरिकसन या अंगरक्षकाशी संबंध सुरू झाल्याची नोंद एका डायरीत करण्यात आली होती. लिंकन यांच्या नौदलातील सहाय्यकाची पत्नी व्हर्जिनिया वूडबरी फॉक्स यांनी ही डायरी लिहिली होती. श्रीमती फॉक्स यांनी नोंदवल्यानुसार, डेव्हिडने स्वतःला अध्यक्षांच्या प्रति समर्पित केले होते, तो त्यांच्याबरोबर वाहन चालवत असे आणि जेव्हा श्रीमती लिंकन घरी नसत तेव्हा त्यांची शय्यासोबत करत असे. “काय प्रकरण आहे हे!” असा उल्लेख त्यांनी याबद्दल केला आहे.
हेही वाचा : विश्लेषण: तारांगण संकल्पनेच्या शतकपूर्तीमुळे खगोलीय जिज्ञासा वाढेल?
लिंकन यांच्या आयुष्यातील चार पुरुष…
या अफवेमुळे लिंकन यांना लक्ष्य करण्यासाठी टीकाकारांना पुरेशी सामग्री मिळाली होती. “लव्हर ऑफ मेन’मध्ये लिंकन यांच्या चार जणांबरोबरच्या समलिंगी संबंधांचा धांडोळा घेण्यात आला आहे. लिंकन यांच्या वयाची विशी ते पन्नाशी अशा साधारण ३० ते ३५ वर्षांच्या कालावधीत हे चार पुरुष लिंकन यांच्या आयुष्यात आल्याचा दावा त्यामध्ये करण्यात आला आहे. लिंकन यांच्या अखेरच्या दिवसांवर आधारिक ‘ओ मेरी’ हे विनोदी नाटक अलिकडेच न्यूयॉर्कमधील ब्रॉडवेवर सुरू होते. त्यामध्ये लिंकन स्वतःचे समलिंगी संबंध लपवण्यासाठी पत्नी मेरीचा प्रेयसीसारखा वापर करत असल्याचे चित्रण आहे.
सुरुवातीच्या संबंधांच्या चर्चा
१८३०च्या दशकाच्या सुरुवातीला, एका दुकानात काम करताना लिंकन आणि त्यांचा सहकारी विल्यम ग्रीन १८ महिने एका शय्येवर झोपत होते. त्याबद्दल ग्रीन याने काही खासगी नोंदी केल्या आहेत. पुढे १९३७मध्ये लिंकन वकिली व्यवसायासाठी स्प्रिंगफील्ड येथे गेले. तिथे त्यांची भेट जोशुआ स्पीड याच्याशी झाली. तेथेही तब्बल चार वर्षे एका पलंगावर झोपत होते. कोणत्याही दोन पुरुषांमध्ये यापेक्षा अधिक जवळीक शक्य नाही, असे जोशुआने त्या दिवसांबद्दल लिहिले आहे. आता ही जवळीक नेमकी किती होती हा अभ्यासकांसाठी संवेदनशील विषय राहिला आहे.
हेही वाचा : विश्लेषण : हरियाणात भाजपने अनपेक्षितरित्या विजयाची हॅटट्रिक कशी साधली?
अभ्यासकांचे म्हणणे काय?
मायकेल बर्लिंगेम या इतिहासतज्ज्ञांच्या मते, त्या काळी इलिनॉयमध्ये अशा प्रकारे एकाच पलंगावर झोपण्याची व्यवस्था सर्वसामान्य होती. त्यात विशेष काहीही नव्हते. बर्लिंगेम हे इलिनॉय विद्यापीठात इतिहासाचे अध्यापन करतात. लिंकन यांनी अन्य पुरुषांबरोबर एका पलंगावर झोपणे हा काही त्यांच्या समलिंगी संबंधांचा पुरावा नाही असे ते म्हणतात. त्या काळी गाद्या महाग होत्या असे त्यांचे म्हणणे आहे. पण वकील झाल्यावर लिंकन यांना केवळ पलंगच नव्हे तर संपूर्ण घर घेणे परवडले असते असे इस्टर्न कनेक्टिकट स्टेट युनिव्हर्सिटीचे थॉमस बालसर्स्की यांचे म्हणणे या लघुपटात ऐकायला मिळते. लिंकन यांना अन्यत्र घर मिळत होते, पण त्यांनी स्पीडबरोबर राहण्यास पसंती दिली असे बालसर्स्की यांचे म्हणणे आहे.
स्पीड यांच्याबरोबरचे कथित संबंध
स्पीड १८४१मध्ये केंटकीला परत गेल्यानंतर लिंकन वैफल्यग्रस्त झाले होते. “मी जगातील सर्वात दुःखीकष्टी इसम आहे,” असे त्यांनी त्यावेळी लिहिले होते. “जर माझ्या भावना सर्व मानवजातीने समप्रमाणात वाटून घेतल्या तर पृथ्वीवर एकही आनंदी चेहरा दिसणार नाही,” अशा अतिशय भावनाशील शब्दांचा त्यांनी प्रयोग केल्याचे दिसते. या काळात लिंकन आणि स्पीड यांच्यादरम्यान पत्रव्यवहार सुरू होता. त्यामध्ये ते विवाह आणि महिला यांच्याबद्दल वाटणाऱ्या भीतीबद्दल आपापल्या भावना कळवत असत.
सावत्र आईचा दावा
लिंकन यांना महिलांबद्दल वाटणारा तिटकारा याबद्दल त्यांच्या सावत्र आईने, सारा बुश लिंकन यांनी उघडपणे सांगितले आहे. अब्राहमला कधीही मुली फारशा आवडल्या नाहीत असे त्या म्हणाल्या होत्या. मात्र, सार्वजनिक पदांवर राहण्यासाठी विवाह उपयुक्त होता आणि अब्राहम लिंकन यांनी १८४२मध्ये मेरी टॉड यांच्याशी विवाह केला. लिंकन यांचा स्पीडबरोबर पत्रव्यवहार कायम राहिला पण त्यांनी पत्नीला फारशी पत्रे लिहिली नाहीत.
हेही वाचा : जगातील सर्वांत घातक विषाणूमुळे आतापर्यंत १२ लोकांचा मृत्यू; काय आहे मारबर्ग व्हायरस? त्याची लक्षणं काय?
लिंकन यांच्याबद्दल शंकाकुशंका
व्यक्तिवादी राजकारण वाढलेल्या काळात लिंकन यांच्या लैंगिकतेबद्दल शंकाकुशंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. पण हे प्रकार नवीन नाहीत. पुलित्झर विजेते चरित्रकार कार्ल सँडबर्ग यांनी १९२६मध्ये लिंकन यांचे चरित्र लिहिले होते. त्यामध्ये त्यांच्या समलैंगिकतेबद्दल सूचक उल्लेख करण्यात आले होते. मात्र संबंधित परिच्छेद नंतर हटवण्यात आला.
पुन्हा चर्चा का?
समलिंगी संबंधांना कायदेशीर आणि सामाजिक मान्यता मिळत असताना, इतिहासकारांनी पुन्हा एकदा हा मुद्दा उपस्थित केला आहे. ‘लव्हर ऑफ मेन’ हा लघुपट सनातनी विचार आणि कथ्यांना आव्हान देणारा सुधारणावादी इतिहासाचा भाग मानला जात आहे. नव्या दमाच्या इतिहासकारांच्या विश्लेषणाच्या नवीन पद्धती आणि दृष्टिकोन याच्या माध्यमातून आतापर्यंत मांडण्यात आलेल्या इतिहासाकडे वेगळ्या परिप्रेक्ष्यातून पाहता येते असे मानले जाते. उदाहरणार्थ, थॉमस जेफरसन हे त्यांची गुलाम सॅली हेमिंग्जच्या मुलांचे पिता होते हे मान्य करण्यास इतिहासकारांनी अनेक वर्षे नकार दिला होता. हे सत्य पचवणे त्यांच्यासाठी कठीण होते. आज मात्र अनेक इतिहासकार ते वास्तव होते हे मान्य करतात. लिंकन यांच्या पुरुषांबरोबरच्या नातेसंबंधांबाबतच्या धारणाही लक्षणीयरित्या बदलल्या असल्याचे हार्वर्ड विद्यापीठात अध्यापन करणारे इतिहासकार जॉन स्टॉफर यांचे म्हणणे आहे. त्याचवेळी लिंकन यांचे हे संबंध केवळ भावनिक स्वरूपाचे होते असे मानणारे इतिहासकारही आहेत. विशेषतः लिंकन यांच्या अफाट कार्यामुळे त्यांना देवत्व बहाल करणाऱ्यांसाठी त्यांचे समलिंगी संबंध स्वीकारणे सोपे नाही. ‘लव्हर ऑफ मेन’च्या निमित्ताने याबद्दल निकोप चर्चा घडत आहेत हेही खरे. या निमित्ताने एका पिढीला पचवण्यास कठीण असलेल्या गोष्टी स्वीकारणे पुढील पिढ्यांना तुलनेने सोपे जात असल्याचेही दिसत आहे.