दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी जर्मनीच्या ‘लुफ्तान्सा’ एअरलाइन्स विरोधात प्रवाशांनी तीव्र आंदोलन केले. या एअरलाईन्सच्या विमानांची उड्डाणे ऐनवेळी रद्द झाल्यामुळे प्रवाशांचा मोठा गोंधळ उडाला होता. वैमानिकांनी केलेल्या संपामुळे जर्मनीच्या या एअरलाईन्सने जगभरातील प्रवासी आणि मालवाहतूक विमानांची उड्डाणे रद्द केली होती. या एअरलाईन्सने शुक्रवारी एका दिवसात जगभरातील तब्बल ८२१ विमान उड्डाणे रद्द केली. या एअरलाईन्सकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात उड्डाणे का रद्द करण्यात आली? वैमानिकांनी एकाचवेळी हा संप का पुकारला? या प्रश्नांचा आढावा घेणारे हे विश्लेषण…
जर्मनीतील म्युनिच आणि फ्रॅन्कफर्ट या महत्त्वाच्या शहरांमधील आंतरराष्ट्रीय विमानतळांवरून या संपामुळे अनेक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून म्युनिचसाठी ‘लुफ्तान्सा’ एअरलाईन्सचे विमान पहाटे १ वाजून १० मिनिटांनी उड्डाण करणार होते. त्यानंतर फ्रॅन्कफर्टसाठी पहाटे २ वाजून ५० मिनिटांनी आणखी एक विमान उड्डाणाच्या तयारीत होते. दरम्यान, शुक्रवारी दुपारपासूनच ‘लुफ्तान्सा’ एअरलाईन्सची अनेक उड्डाणे रद्द करण्यात येत होती. त्यामुळे प्रवाशांच्या जिवाची घालमेल वाढत होती. अखेर या एअरलाईन्सची अनेक उड्डाणे अचानक रद्द झाल्यानंतर दिल्ली विमानतळावर प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. या गोंधळातून प्रवाशांसह त्यांच्या कुटुंबीयांनी या एअरलाईन्सविरोधात तीव्र आंदोलन छेडले.
पगारासाठी वैमानिकांचा संप; लुफ्तान्साची ८०० उड्डाणे रद्द, प्रवाशांचा विमानतळावर गोंधळ
‘लुफ्तान्सा’ एअरलाईन्सची नेमकी समस्या काय?
वैमानिकांनी पुकारलेल्या एक दिवसीय संपामुळे १ सप्टेंबरला तब्बल ८०० विमान उड्डाणे रद्द करत असल्याचे या एअरलाईन्सकडून सांगण्यात आले होते. याचा फटका जवळपास १ लाख ३० हजार प्रवाशांना बसला आहे, असे वृत्त ‘रॉयटर्स’ या वृत्त संस्थेने दिले होते. ‘वेरेईनीगुन्ग कॉकपिट’ या वैमानिकांच्या युनियनने वेतनवाढीविषयीची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर हा संप पुकारला होता. यावर्षी पाच हजार वैमानिकांच्या वेतनात ५.५ टक्क्यांची वाढ यासह महागाई भत्त्याची या युनियनकडून मागणी करण्यात आली होती. वैमानिकांची ही मागणी परवडणार नसल्याची भूमिका ‘लुफ्तान्सा’ एअरलाईन्सकडून घेण्यात आली होती. यासंदर्भात वैमानिकांसोबत वाटाघाटी करण्यास आम्ही तयार आहोत. मात्र, युनियन करत असलेली मागणी अवास्तव असल्याचे एअरलाईन्सकडून स्पष्ट करण्यात आले होते. ही बैठक फिसकटल्यानंतरच वैमानिकांनी अखेर संप पुकारला.
दरम्यान, वैमानिकांचा हा संप अनाकलनीय असल्याची प्रतिक्रिया ‘लुफ्तान्सा’ एअरलाईन्सच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य मिशेल निग्गोमन यांनी दिली आहे. या वैमानिकांना अतिशय चांगली आणि सामाजिकदृष्ट्या संतुलित ऑफर देण्यात आली होती, असेही त्यांनी म्हटले आहे.
लुफ्तान्सा एअरलाईन्सने वैमानिकांना त्यांच्या मूळ वेतनात दरमहा ९०० युरोजची वाढ दोन टप्प्यांमध्ये १८ महिन्यांच्या कालावधीत देण्याचे कबूल केले होते. याशिवाय कॉकपिट विभागात गरजेनुसार कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येईल, असा प्रस्तावही एअरलाईन्सने वैमानिकांसमोर ठेवला होता.
वैमानिकांना वेतनवाढ का हवी होती?
करोना साथीमुळे गेली दोन वर्ष विमान सेवा विस्कळीत झाली होती. करोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर जगातील अनेक देशांमध्ये विमानसेवा पुन्हा सुरु करण्यात आली. मोठ्या कालावधीनंतर विमानसेवा सुरू झाल्याने विमानतळांवर प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे एअरलाईन्स आणि काही विमानतळांना कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा सामना करावा लागला होता. काही ठिकाणांवर कर्मचाऱ्यांनी संप देखील पुकारला होता. करोना महामारीचा मोठा आर्थिक फटका विमान कंपन्यांना बसला आहे. अशातच वाढती महागाई आणि रखडलेल्या वेतनवाढीमुळे वैमानिकांची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. यामुळेच वेतनवाढीसाठी लुफ्तान्सा एअरलाईन्सच्या वैमानिकांनी शुक्रवारी एक दिवसीय संप पुकारला.