फुफ्फुसाचा कर्करोग हा जगभरात होणार्या मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. धुम्रपान या प्राणघातक आजारास कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. परंतु, द लॅन्सेट रिजनल हेल्थ साउथईस्ट एशिया जर्नलच्या नवीन संशोधनात एक नवीन माहिती समोर आली आहे. भारतात आढळून येणार्या निम्याहून अधिक फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांनी कधीही धूम्रपान केलेले नाही. मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरच्या डॉक्टरांच्या टीमने लिहिलेल्या, ‘युनिकनेस ऑफ लंग कॅन्सर इन साऊथईस्ट एशिया’ या लेखात लिहिले आहे की, बहुतांश फुफ्फुसाचा कर्करोग असणारे रुग्ण धूम्रपान न करणारे आहेत. फुफ्फुसाच्या आजारात भारत आशियात दुसऱ्या क्रमांकावर आहे. या अभ्यासानुसार भारतात २०२० मध्ये ७२,५१० कर्करोग प्रकरणे आढळून आलीत आणि ६६,२७९ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची कारणे कोणती आहेत? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
वायू प्रदूषण
धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग होण्याच्या प्रमुख करणांपैकी एक कारण म्हणजे वायू प्रदूषण. भारत हा जगातील सर्वात प्रदूषित देशांपैकी एक आहे. २०१८ पासून सलग चार वर्षे नवी दिल्ली जागतिक स्तरावर सर्वात प्रदूषित शहरांच्या आघाडीवर आहे. वाहने, उद्योग, ऊर्जा प्रकल्प, कोळसा आणि घरातील धुरामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या वाढत आहे, असे अभ्यासात आढळून आले आहे. २०२५ पर्यंत शहरी भागात प्रदूषणात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.
हेही वाचा : पावडर लावल्याने खरंच कॅन्सर होतो का? जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून धक्कादायक वास्तव उघड
हवामानातील बदलामुळे परिस्थितीमध्ये आणखीनच बिघाड
नवी दिल्लील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या (एम्स) संशोधकांनी दुसर्या एका अहवालात नमूद केले आहे की, चीन, भारत, इंडोनेशिया, फिलीपिन्स आणि थायलंड यांसारखे दक्षिण आशियाई देश नैसर्गिक परिस्थितीमुळे गंभीरपणे प्रभावित झाले आहेत. या देशांमध्ये २०२० मध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या सर्वाधिक प्रकरणांची नोंद झाली आहे, ज्यात ९६५,००० हून अधिक नवीन प्रकरणे आढळून आली आहेत. “हवामानातील बदलामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका आणखीनच वाढत आहे. आशियातील सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील हे सर्वात मोठे आव्हान आहे,” असे लेखकांनी लिहिले आहे.
अनुवांशिक घटक
अभ्यासात असे म्हटले आहे की, अनुवांशिक घटकामुळेही धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. ‘पब मेड’वर प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की एपिडर्मल ग्रोथ फॅक्टर रिसेप्टर (ईजीएफआर) सारख्या जंनुकांमधील उत्परिवर्तनामुळेही धूम्रपान न करणाऱ्यांना फुफ्फुसाचा कर्करोग होत आहे. या अनुवांशिक विसंगतींमुळे पेशींची अनियंत्रित वाढ आणि ट्यूमरचा विकास होऊ शकतो, असे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटने केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे.
वयाचा घटकही महत्त्वाचा
अभ्यासातून असे दिसून आले आहे की, भारतात धूम्रपान न करणार्यांना फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका सर्वाधिक आहे. फुफ्फुसाचा कर्करोग सरासरी ५४ ते ७० वयोवर्षाच्या नागरिकांमध्ये आढळून येत आहे. टाटा मेडिकल सेंटरच्या वैद्यकीय ऑन्कोलॉजी विभागातील लेखकांपैकी एक डॉ. कुमार प्रभाश यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला सांगितले की, पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतात कर्करोगाच्या रुग्णांचे प्रमाण कमी असूनही, मोठ्या लोकसंख्येमुळे ही संख्या लक्षणीय आहे. “अमेरिकेत फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचे प्रमाण प्रत्येकी हजारांमागे ३० आहे, परंतु भारतात हे प्रत्येकी हजारांमागे ६ आहे. परंतु, आपली लोकसंख्या पाहता, ६ टक्केदेखील खूप मोठी संख्या आहे, असे त्यांनी सांगितले.
टिबीचा वाढता प्रादुर्भाव
डॉ. कुमार प्रबाश यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला स्पष्ट केले की, भारतातील फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या समस्येचे आणखी एक कारण म्हणजे टिबीचा (क्षयरोग) वाढता प्रादुर्भाव. त्यांनी सांगितले, “दोन्हींची लक्षणे एकसारखी असल्याने निदानास अनेकदा विलंब होतो. तसेच याच्या उपचार पद्धती परदेशात असल्याने खर्चातही भर पडते.” पुढे त्यांनी सांगितले, “सामाजिक-आर्थिक स्थितीतील असमानता, उपचार पद्धती नसल्याने आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका वाढत आहे आणि त्याचा परिणाम मृत्युदरावरही होत आहे.” याव्यतिरिक्त, डॉ. प्रकाश यांनी निदर्शनास आणून दिले, “फक्त ५ टक्के फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी वेळेत शस्त्रक्रिया घेतात. आम्हाला ही संख्या पाश्चिमात्य देशांप्रमाणे किमान २० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची गरज आहे.”