‘Made in Bihar’ boots in the Russian army: एकेकाळी केवळ पायाभूत समस्यांमुळे चर्चेत असलेलं बिहार, आता आपल्या उत्पादनक्षमतेमुळे आंतरराष्ट्रीय संरक्षण क्षेत्रात ओळख निर्माण करत आहे. ‘मेड इन बिहार’ म्हणून ओळखले जाणारे बूट आता थेट रशियन लष्करात वापरले जात आहेत. ही केवळ उत्पादन यशाची नाही, तर भारताच्या बदलत्या संरक्षण धोरणाचीही साक्ष आहे. ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून भारत संरक्षण स्वयंपूर्णतेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असून देशांतर्गत विकसित होणारी शस्त्रास्त्रे, रणगाडे, विमाने, क्षेपणास्त्रे आणि नौदल उपकरणे ही त्याची ठोस उदाहरणे आहेत. भारताचा हा आत्मविश्वास आणि तंत्रज्ञानाधिष्ठित प्रगतीचा प्रवास आता केवळ देशापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर जागतिक व्यासपीठावर आपली छाप उमटवू लागला आहे.

मेड इन बिहार’ बूट्स

कधी काळी गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध असलेलं बिहार आता एका सकारात्मक कारणामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आहे. बिहारमध्ये तयार होणाऱ्या मजबूत बूटांना अधिकृतरीत्या रशियन लष्करात समाविष्ट करण्यात आलं आहे. हे भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रातील वाढत्या प्रभावाचं एक महत्त्वाचं लक्षण मानलं जात आहे. या संदर्भात भारतीय संरक्षण मंत्रालयाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या पत्रकात याविषयी माहिती दिली आहे. ‘मेड इन बिहार’ बूट्स हे भारताच्या उच्च दर्जाच्या उत्पादन क्षमतेचं प्रतीक आहेत. विशेष म्हणजे ते रशियन लष्कराचा अविभाज्य भाग ठरले आहेत, असं या पत्रकात म्हटले आहे. हे परिवर्तन भारताच्या बदलत्या संरक्षण धोरणाचा पुरावा आहे.

परिस्थिती बदलत आहे

एकेकाळी भारत परदेशी पुरवठादारांवर प्रचंड अवलंबून होता. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. सुमारे ६५% संरक्षण उत्पादने देशातच तयार होतात. भारताचा संरक्षण निर्यात पोर्टफोलिओ आता बुलेटप्रूफ जॅकेट्स, डॉर्नियर विमान (Do-228), चेतक हेलिकॉप्टर्स, फास्ट इंटरसेप्टर बोट्स आणि कमी वजनाच्या पाणतीरांसारख्या लष्करी वस्तूंनी समृद्ध झाला आहे. म्हणजेच भारतातून या संरक्षण उत्पादनांची निर्यात मोठ्या प्रमाणात होते.

लाख कोटींचं उद्दिष्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाअंतर्गत झालेल्या मोठ्या प्रगतीकडे MoD ने लक्ष वेधलं आहे. एकेकाळी ६५-७० टक्के परदेशी संरक्षण साहित्य आयातीवर अवलंबून असलेला भारत आता देशांतर्गत उत्पादन क्षमतेत झपाट्याने वाढ करत आहे. संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीपत्रकानुसार भारताने २०२३-२४ मध्ये १.२७ लाख कोटींच्या संरक्षण उत्पादनाचा विक्रमी टप्पा गाठला असून २०२९ पर्यंत ३ लाख कोटींचं उद्दिष्ट आहे.

अ‍ॅडव्हान्स्ड टोड आर्टिलरी गन सिस्टिम्स

या पार्श्वभूमीवर सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीने अलीकडेच अ‍ॅडव्हान्स्ड टोड आर्टिलरी गन सिस्टिम्स (ATAGS) खरेदीला मंजुरी दिली आहे. या व्यवहारात १५५ मिमी/५२ कॅलिबरच्या ३०७ तोफा आणि ३२७ उच्च गतिशीलता असलेली ६x६ गन टोइंग वाहने यांचा समावेश आहे. या सर्व गोष्टी ‘बाय इंडियन-इंडिजिनसली डिझाइन्ड, डेव्हलप्ड अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर’ (IDDM) श्रेणीतून १५ आर्टिलरी रेजिमेंट्ससाठी खरेदी करण्यात येणार आहेत. या व्यवहाराचा अंदाजे खर्च सुमारे ७,००० कोटी रुपये आहे. ATAGS (Advanced Towed Artillery Gun System) शस्त्र प्रणाली ही संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO), भारत फोर्ज आणि टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टिम्स यांनी एकत्र येऊन तयार केली आहे. ही तोफ ४० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर मारा करू शकते. यामध्ये अत्याधुनिक फायर कंट्रोल सिस्टिम, अचूक लक्ष्य भेदण्याची क्षमता, मानवी हस्तक्षेपाशिवाय गोळ्या लोड होण्याची व्यवस्था आणि झटका कमी करणारी रचना आहे. भारतीय लष्कराने या तोफेची चाचणी वेगवेगळ्या परिस्थितीत व वातावरणात केली आहे.

आधुनिक शस्त्रास्त्र आणि साधनांची यशस्वी निर्मिती

भारताच्या संरक्षण क्षमतेबाबत बोलताना संरक्षण मंत्रालयाने (MoD) नमूद केले की, भारत आता जगातील लष्करी आणि औद्योगिक क्षेत्रात एक महत्त्वाचा देश ठरला आहे. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमामुळे भारतात अनेक आधुनिक शस्त्रास्त्र आणि साधनांची यशस्वी निर्मिती झाली आहे. यात प्रामुख्याने धनुष्य तोफा, अर्जुन मुख्य रणगाडा, तेजस हे हलकं लढाऊ विमान, अ‍ॅडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर, आकाश क्षेपणास्त्र प्रणाली, शत्रूचं ठिकाण शोधणारा रडार आणि स्वदेशी बनावटीच्या युद्धनौका, विमानवाहू नौका, पाणबुड्या आणि समुद्रावर गस्त घालणाऱ्या नौकांचा समावेश होतो. हे सर्व यश भारताला जागतिक संरक्षण क्षेत्रात एक मजबूत स्थान मिळवून देत आहे.

भारताच्या मजबूत संरक्षण औद्योगिक अधिष्ठानात १६ संरक्षण सार्वजनिक क्षेत्र उपक्रम (PSUs), ४३० हून अधिक परवाना असलेले खाजगी उद्योग आणि सुमारे १६,००० सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSMEs) कार्यरत आहेत. हे उद्योग स्वदेशी उत्पादन क्षमतेला बळकटी देतात. आधुनिक युद्धनौका, लढाऊ विमानं, तोफा प्रणाली आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्र यांची देशांतर्गत निर्मिती होत असल्याने भारताने जागतिक संरक्षण उत्पादन क्षेत्रात स्वतःचं महत्त्वाचं स्थान निर्माण केलं आहे. ‘मेड इन बिहार’ बूट्सच्या आंतरराष्ट्रीय यशामुळे भारताच्या वाढत्या संरक्षण प्रभावाला आणखी बळ मिळालं आहे.

‘मेड इन इंडिया’ पासून ‘मेड इन बिहार’पर्यंतचा हा प्रवास केवळ उत्पादन क्षमतेचा नाही, तर भारताच्या आत्मनिर्भरतेच्या वाटचालीचा ठळक पुरावा आहे. जिथे कधी काळी विकासाऐवजी गोंधळाची परिस्थिती होती, तिथे आता आधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार निर्मिती आणि जागतिक विश्वासाचं अधिष्ठान निर्माण होतंय. ‘मेड इन बिहार’ बूट्सना रशियन लष्करात स्थान मिळणं ही केवळ एक यशोगाथा नसून, ती भारताच्या संरक्षण क्षेत्रातील क्रांतीची पावती आहे. भारत आता संरक्षणाच्या मैदानात ग्राहक नव्हे, तर निर्माता बनत आहे.