Are Bihar-made boots used by Russian soldiers?: कधी काळी गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध असलेलं बिहार आता एका सकारात्मक कारणामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आहे. बिहारमध्ये तयार होणाऱ्या मजबूत बूटांना अधिकृतरीत्या रशियन लष्करात समाविष्ट करण्यात आलं आहे. हे भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रातील वाढत्या प्रभावाचं एक महत्त्वाचं लक्षण मानलं जात आहे.
या संदर्भात भारतीय संरक्षण मंत्रालयाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या पत्रकात याविषयी माहिती दिली आहे. ‘मेड इन बिहार’ बूट हे भारताच्या उच्च दर्जाच्या उत्पादन क्षमतेचं प्रतीक आहेत. विशेष म्हणजे ते रशियन लष्कराचा अविभाज्य भाग ठरले आहेत, असं या पत्रकात म्हटले आहे. हे परिवर्तन भारताच्या बदलत्या संरक्षण धोरणाचा पुरावा आहे.
रशियन लष्करात बिहारचे बूट
बिहारमध्ये तयार होणाऱ्या मजबूत बूटांना अधिकृतरीत्या रशियन लष्करात समाविष्ट करण्यात आलं आहे. हे भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रातील वाढत्या प्रभावाचं एक महत्त्वाचं लक्षण मानलं जात आहे. पाटणानंतर बिहारमधील दुसऱ्या क्रमांकाचं जलदगतीने विकसित होणारं शहर असलेलं हाजीपूर आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पादत्राणे निर्मितीसाठी लोकप्रिय ठरत आहे. कॉम्पिटन्स एक्स्पोर्ट्स ही खासगी कंपनी रशियन लष्करासाठी लागणारे हे विशेष बूट तयार करते तसेच ही कंपनी सध्या भारतातील सर्वात मोठ्या निर्यातदारांपैकी एक म्हणून उदयाला आली आहे. दोन वर्षांमागे त्यांनी युद्धग्रस्त राष्ट्राला सुमारे १.५ दशलक्ष जोडी लष्करी बूट पाठवले होते. त्यांची किंमत सुमारे १०० कोटी इतकी होती.
रशियाला भारतीय साथ
गेल्या काही वर्षांमध्ये रशियाच्या लष्कराची हालचाल वेगाने वाढली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या प्रत्येक मोहिमेत त्यांना भारतातून निर्यात होणारे बूट साथ देत आहेत. बिहारमधील हाजीपूरमध्ये तयार होणारे हे ‘मेड इन बिहार’ बूट रशियन लष्कराची पहिली पसंती ठरले आहेत. कृषी उत्पादनांसाठी प्रसिद्ध असलेलं आणि पाटण्यानंतर बिहारमधील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात जलद विकसित होणारं शहर असलेलं हाजीपूर अलीकडच्या काळात पादत्राणे निर्मितीतील आपली क्षमता आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध करत आहे. हाजीपूरस्थित कॉम्पिटन्स एक्स्पोर्ट्स तर आता रशियानंतर युरोपीय बाजारासाठी खास डिझायनर शूज लाँच करण्याच्याही विचारात आहे.
या उत्पादन कंपनीचे जनरल मॅनेजर शिब कुमार रॉय यांनी गेल्या वर्षी एएनआयला (ANI) दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “स्थानिक रोजगारनिर्मिती हा मुख्य उद्देश ठेवून आम्ही २०१८ साली हाजीपूरमधील यंत्रणा सुरू केली. येथे आम्ही रशियासाठी निर्यात होणारे सेफ्टी शूज तयार करतो. हळूहळू आम्ही युरोपमध्येही विस्तार करत आहोत आणि लवकरच देशांतर्गत बाजारातही प्रवेश करण्याचा आमचा मानस आहे.”
प्रगतीच्या पाऊलखुणा
कॉम्पिटन्स एक्स्पोर्ट्स कंपनीने तयार केलेले बूट रशियन लष्कराच्या कठोर गरजा लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आले आहेत. या सेफ्टी शूजच्या वैशिष्ट्यांबाबत बोलताना शिब कुमार रॉय म्हणाले होते की, “बूट हलके असावेत, घसरणारे नसावेत. ते लक्षात घेऊनच सोलची रचना करण्यात आली आहे आणि ४० अंश सेल्सियससारख्या अत्यंत प्रतिकूल हवामानाचा सामना करण्यास ते सक्षम आहेत. आम्ही हे सर्व निकष लक्षात घेऊन सेफ्टी शूज तयार करतो.”
या बूट्ना प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे ही कंपनी रशियातील सर्वात मोठ्या निर्यातदारांपैकी एक ठरली आहे. गेल्या वर्षी त्यांनी १.५ दशलक्ष जोडी बूट निर्यात केले होते. त्यांची किंमत १०० कोटी होती. एआयने दिलेल्या वृत्तानुसार येणाऱ्या वर्षात हा आकडा ५० टक्क्यांनी वाढवण्याचा त्यांचा मानस होता. भारत आणि रशियामध्ये औषधांपासून यंत्रसामग्रीपर्यंत विविध प्रकारच्या वस्तूंच्या व्यापाराचे दीर्घकालीन संबंध आहेत. बिहारमध्ये तयार होणाऱ्या या बुटांच्या वापरामुळे भारताचे संरक्षण साहित्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट अधिक बळकट होत असून दोन्ही देशांमधील भागीदारी आणखी घट्ट होत आहे.
१०० अब्ज डॉलर्सचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट
सध्या भारत आणि रशियामधील द्विपक्षीय व्यापार सुमारे ६७ अब्ज डॉलर इतका आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील मॉस्को भेटीदरम्यान भारताने विविध क्षेत्रांतून रशियात निर्यात वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला. दोन्ही देशांनी २०३० पर्यंत वार्षिक १०० अब्ज डॉलर व्यापाराचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठरवलं असून त्यासाठी दोन्ही देश आपापल्या राष्ट्रीय चलनांद्वारे मजबूत द्विपक्षीय पेमेंट सेटलमेंट यंत्रणा विकसित करण्याच्या दिशेने काम करत आहेत.
७० टक्के महिला कर्मचारी
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (MD) दानेश प्रसाद यांना बिहारमध्ये जागतिक दर्जाची फॅक्टरी उभारायची आहे आणि राज्यातील रोजगारात भर घालायची आहे, असं रॉय यांनी ANI ला सांगितलं. “आम्ही आमच्या कर्मचार्यांना जास्तीत जास्त रोजगार देण्याचा प्रयत्न करत आहोत,” असं रॉय यांनी पुढे सांगितलं. त्यांनी या कंपनीच्या कामगार व्यवस्थेतील एक महत्त्वाचा पैलूही अधोरेखित केला. या कंपनीत कार्यरत ३०० कर्मचार्यांपैकी ७० टक्के महिला आहेत. बिहार सरकारने औद्योगिक क्षेत्राला पाठबळ दिले असले तरी अजूनही सुधारण्याची गरज असल्याचं रॉय यांनी नमूद केलं.
कौशल्यपूर्ण कामगार
रॉय यांनी सांगितलं की, रशियातून खरेदीदार सहज येऊ शकतील अशा प्रकारचे रस्ते आणि दळणवळण यांसारख्या पायाभूत संरचना अधिक विकास करणे आवश्यक आहे. “आम्हाला तयार-प्रशिक्षित मनुष्यबळ हवं आहे आणि त्यासाठी एक प्रशिक्षण संस्था उभारली गेली पाहिजे, जेणेकरून आम्हाला कुशल कामगार मिळतील. अन्यथा, आम्हालाच कामगारांना सामावून घेण्यापूर्वी प्रशिक्षण द्यावं लागतं,” असं त्यांनी शेवटी नमूद केलं.
२०२२ साली अधिकाऱ्यांनी केलेल्या एका सर्वेक्षणात असे आढळून आले की, बिहारमधील राज्य सरकारच्या ‘कुशल युवा कार्यक्रम’ (KYP) अंतर्गत युवकांना प्रशिक्षण देणारी १४३ कौशल्य विकास केंद्रे कार्यरतच नव्हती किंवा कार्यरत असलेल्या केंद्रांमध्ये आवश्यक ते प्रशिक्षक किंवा मानव संसाधन कर्मचारी नव्हते. ते ठरवलेल्या निकषांनुसार आवश्यक होते.
क्षितिज विस्तारत आहे
रशियन ग्राहकांसाठी तयार होणाऱ्या सुरक्षित बुटांच्या निर्मीतीव्यतिरिक्त कॉम्पिटन्स एक्स्पोर्ट्स कंपनीने आता लक्झरी फुटवेअर मार्केटमध्येही मोठी उडी घेतली आहे. ही कंपनी सध्या इटली, फ्रान्स, स्पेन आणि यूकेमधील उच्च दर्जाच्या बाजारात डिझायनर शूज निर्यात करत आहे. कंपनीचे फॅशन डेव्हलपमेंट आणि मार्केटिंग प्रमुख मझहर पल्लुमिया यांनी सांगितलं की, “आमचं उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय ब्रँड्ससाठी उच्च दर्जाचे शूज तयार करणं आहे. आम्ही अलीकडेच एका बेल्जियन कंपनीबरोबर वाटाघाटी सुरू केल्या आहेत.” पल्लुमिया यांनी असंही नमूद केलं की, सुरुवातीला परदेशी कंपन्यांना बुटांची गुणवत्ता आणि कारागिरीबाबत काही शंका होत्या. मात्र, एकदा नमुने मिळाल्यानंतर त्यांच्या सर्व शंका दूर झाल्या आहेत. “आम्ही अपेक्षा करतो की, पुढच्या महिन्यात काही परदेशी कंपन्या आमच्या फॅक्टरीला भेट देतील,” असंही त्यांनी सांगितलं.
२०३० पर्यंत ४७ अब्ज डॉलर्सपर्यंत झेप
भारताच्या लेदर आणि फुटवेअर उद्योगाच्या वाढीची क्षमता प्रचंड आहे. काउन्सिल फॉर लेदर एक्स्पोर्ट्स (CLE) यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिजन डॉक्युमेंटनुसार सध्या १७.३ अब्ज डॉलर्स असलेला हा उद्योग २०३० पर्यंत ४७ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. येत्या सहा वर्षांत निर्यात दुपटीहून अधिक वाढून १३.७ अब्ज डॉलर्सपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या अडचणी जसे की, पायाभूत सुविधांची मर्यादा असूनही कंपनी भविष्यातील शक्यतांबाबत आशावादी आहे. पल्लुमिया यांनी नमूद केलं की, “बिहार आणि हाजीपूरमध्ये फॅशन उद्योग सुरू करणं हे एक आव्हान आहे, पण प्रवर्तकांचा दूरदृष्टीपूर्ण दृष्टिकोन आणि सरकारच्या पाठबळामुळे आम्हाला या दिशेने वाटचाल सुरू ठेवण्याचा आत्मविश्वास आहे.”
© IE Online Media Services (P) Ltd