अमेझॉन प्राईम या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘मेड इन हेवन’ या वेब मालिकेच्या दुसऱ्या भागाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. या वेब मालिकेत अभिनेत्री राधिका आपटेने (मालिकेतील नाव पल्लवी) एका दलित मुलीचे पात्र साकारले असून तिच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. या वेब मालिकेतील पल्लवी या पात्राचा विवाह बौद्ध धर्माच्या विवाह पद्धतीनुसार झाल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे बौद्ध धर्माच्या विवाहाचीही तेवढीच चर्चा होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांनीदेखील राधिका आपटेच्या भूमिकेची प्रशंसा केली आहे. याच पार्श्वभूमीवर बौद्ध विवाह पद्धतीत काय विशेष आहे? या विवाहातील विधी कोणते असतात? वधू आणि वर पांढरेच वस्त्र का परिधान करतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या…
बौद्ध धर्मासाठी वेगळा विवाह विधी
ख्रिश्चन, हिंदू, जैन, मुस्लीम धर्मात स्वत:ची विवाहपद्धती आहे. म्हणजेच वेगवेगळ्या धर्मात विवाह करताना वेगवेगळ्या प्रथा, विधी, परंपरा आहेत. अगदी याच पद्धतीने बौद्ध धर्मातही स्वत:चा वेगळा विवाह विधी आहे. महाराष्ट्रासह भारतातील सर्व बौद्ध धर्मीय कमी-अधिक फरकाने याच विवाह विधीचे पालन करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेने बौद्ध धर्मातील विवाहादरम्यान कोणते विधी असावेत? विवाहाचे नियम काय आहेत? याबाबत सविस्तर सांगितले आहे.
विवाहादरम्यान वधू-वराच्या पोषाखाविषयी नियम काय?
बौद्ध धर्मातील विवाह पद्धतीत वधू आणि वराच्या पोषाखाला फार महत्त्व आहे. भारतीय बौद्ध महासभेने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विवाहादरम्यान वधू आणि वराने अंगावर पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करणे गरजेचे असते. विवाहाच्या वेळी वधू आणि वराला मुंडावळ्या, बाशिंग बाधू नये. वराच्या बहिणीच्या हातात कळशी, त्यावर नारळ ठेवलेला नसावा. वराच्या हातात लिंबू लावलेली सुरी, कट्यार, तलवार नसावी. हातात हळकुंड, गळ्यात कसलेही ताईत किंवा काळा धागा बांधू नये, असे वधू आणि वराच्या पोशाखाविषयीचे नियम आहेत.
बौद्ध धर्मीय लग्नाचा विधी काय असतो?
बौद्ध धर्माच्या लग्नविधीत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा समोर ठेवली जाते. प्रतिमेच्या रुपाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या विचारांना स्मरून, साक्ष ठेवून ठेवून लग्नाचे सर्व विधी पार पाडले जातात. प्रत्यक्ष लग्नविधीला सुरुवात झाल्यानंतर वधू-वरासह लग्न समारंभाला उपस्थित असलेल्या सर्वांनाच डोक्यावरील शेला, पागोटे, टोपी, रुमाल काढण्यास सांगितले जाते. त्यानंतर प्रत्यक्ष विवाह विधीला सुरुवात होते. सर्वप्रथम पंचांग प्रणाम किंवा वंदनाचा कार्यक्रम होतो. यावेळी वधू आणि वराचे आई-वडील किंवा पालक तसेच वधू आणि वर गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून वंदन करतात. त्यानंतर त्रिसरण, पंचशील, बुद्ध पूजा पाठ, भीमस्मरण, भीमस्तुती, परित्राण पाठ, महामंगल सुत्त, जयमंगल अष्टगाथा, वधू-वर प्रतिज्ञा, आशीर्वाद गाथा, सरणतय, अशा प्रकारचे सर्व विधी पार पाडले जातात. हे सर्व विधी बौद्ध भिक्खू किंवा बौद्धाचार्यांकडून करून घेतले जातात.
करार आणि विवाहाचे प्रमाणपत्र
विशेष म्हणजे लग्नविधी सुरू करण्याच्या अगोदर भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने एक करारपत्र तयार करण्यात येते. या करारपत्रावर वधू आणि वराच्या आईवडिलांची या विवाहास समंती आहे, असे लिहून घेण्यात येते. या करारपत्रावर वधू-वरासह त्यांच्या आई-वडिलांच्या सह्या घेतल्या जातात. तसेच संपूर्ण लग्नविधी पार पडल्यानंतर नवविवाहीत दाम्पत्याला लग्नाचे प्रमाणपत्र दिले जाते. या प्रमाणपत्रात संबंधित वधू आणि वराचे लग्न झाले असून ते पती-पत्नी आहेत, असा उल्लेख असतो.
अष्ट गाथेनंतर वधू आणि वर एकमेकांच्या गळ्यात पुष्पहार घालतात.
‘मंगल परिणय प्रतिज्ञा’ या विधीमध्ये वधू आणि वराला आम्ही विवाह बंधनात अडकत आहोत, आमची त्यास संमती आहे, असे सर्वांसमक्ष म्हणावे लागते. त्यानंतर वधू आणि वराकडून वैवाहिक जीवनात त्यांना पार पाडावयाची कर्तव्ये ‘प्रतिज्ञे’च्या स्वरूपात वदवून घेतली जातात. जयमंगल अष्टगाथेस सुरुवात झाल्यानंतर वधू आणि वराच्या हातात पुष्पमाला दिली जाते.
‘अष्टगाथा’ विधीतील शेवटची गाथा पूर्ण झाल्यानंतर पहिल्या प्रथम वधूने वराच्या गळ्यात पुष्पहार घालते. त्यानंतर वर वधूच्या गळ्यात पुष्पहार घालतो. शेवटी विवाहास जमलेले पाहुणे वधू आणि वराच्या अंगावर पुष्प टाकून त्यांच्या भावी सहजीवनासाठी शुभेच्छा देतात. त्यानंतर विवाह संपन्न झाला असे समजले जाते.
बौद्ध धर्मात विवाहासमयी पांढरे वस्त्र का परिधान करतात?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली. बौद्ध महासभेने बौद्ध धर्मातील विवाह कसा असावा? त्यासाठी कोणत्या विधी असाव्यात? याबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहेत. याच मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून बौद्ध धर्मात विवाह होतात. याबाबत बौद्धाचार्य शिद्धोधन शिंदे (परभणी), बौद्धाचार्य कांबळे गुरुजी (मुंबई) यांनी अधिक माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार बौद्ध धर्मात पांढऱ्या शुभ्र वस्त्राला खूप महत्त्व आहे. पांढरा रंग हा शांती आणि शीलाचा प्रतीक मानला जातो. बौद्ध धर्मातील लग्नविधीदरम्यान वधू आणि वर पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करतात. विवाहबंधनात अडकणाऱ्या दाम्पत्यांचे वैवाहिक जीवनही असेच पांढऱ्या रंगाप्रमाणेच कोणताही डाग नसलेले (कोणताही अडथळा, संकट) असावे, अशा भावनेतून पांढरे वस्त्र परिधान करण्यास सांगितले जाते.
सर्वच संस्कार विधीमध्ये पांढऱ्या कपड्यांना महत्त्व
दरम्यान, बौद्ध धर्मात विवाहाव्यतिरिक्त अनेक वेगवेगळे संस्कारविधी आहेत. उदाहरणादाखल गृहप्रवेश, गर्भसंस्कार विधी (सातव्या महिन्यातील डोहाळे), नामकरण विधी (बारसे), केशवपनविधी (जावळ काढणे), अंत्यसंस्कार विधी, पुण्यानुमोदन (तेरवी), स्मृतीदिन म्हणजेच पुण्यतिथी संस्कार असे वेगवेगळे विधी असतात. बौद्ध धर्मात अशा सर्वच विधींमध्ये पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करण्याचा आग्रह धरला जातो.
प्रकाश आंबेडकरांनी काय प्रतिक्रिया दिली?
‘मेड इन हेवन’च्या दुसऱ्या पर्वातील पाचव्या भागात पल्लवीच्या लग्नाची गोष्ट दाखविण्यात आली आहे. हा एपिसोड पाहिल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट केले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एपिसोडमधील दोन फोटो शेअर केले आहेत. फोटो पोस्ट करीत त्यांनी लिहिले, “पल्लवी या दलित स्त्री पात्राचा दृढनिश्चय, तिनं उघडपणे केलेला विरोध व प्रतिकार या गोष्टी मला खूप आवडल्या. ज्या वंचित आणि बहुजनांनी या मालिकेचा हा भाग पाहिला आहे, त्यांना माझं असं सांगणं आहे की, त्यांनी त्यांचं व्यक्तिमत्त्व व ओळख यावर दृढ राहिलं पाहिजे. ते दृढ राहिले तरच त्याला राजकीय महत्त्व प्राप्त होऊ शकेल. कारण- पल्लवी म्हणते की, “एकूणच सर्व काही राजकारणासाठी चाललंय.” विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्या या ट्विटवर या भागाचे दिग्दर्शक नीरज घेवन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “खूप खूप धन्यवाद सर. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे,” असे म्हणत नीरज घेवन यांनी प्रकाश आंबेडकरांचे आभार मानले आहेत.