रशियात तयार झालेली ‘आयएनएस तुशील’ ही शक्तिशाली युद्धनौका रशियाने सोमवारी (९ डिसेंबर) भारताकडे सुपूर्द केली. रशियाच्या कॅलिनिनग्राड येथील यंतर शिपयार्डमध्ये आयएसएस तुशील सुपूर्द करण्यात आली. त्यामुळे भारताच्या नौदल सामर्थ्यात आणखी वाढ झाली आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या युद्धनौकेचे वर्णन भारताच्या वाढत्या सागरी सामर्थ्याचा पुरावा आणि भारत व रशिया या दोन देशांमधील दीर्घकालीन मैत्रीतील महत्त्वाचा टप्पा म्हणून केले. भारताचे नौदल सामर्थ्य वाढवण्याबरोबरच ‘आयएनएस तुशील‘चे विशेष महत्त्व आहे. कारण- रशिया-युक्रेन युद्धादरम्यान जहाजाचे इंजिन युक्रेनमध्ये तयार केले गेले आहे. भारतीय नौदलासाठी ‘आयएनएस तुशील‘चे कार्यान्वित होणे महत्त्वाचे का मानले जात आहे? त्याविषयी जाणून घेऊ.

आयएनएस तुशील

आयएनएस तुशील याचा अर्थ संस्कृतमध्ये संरक्षक कवच, असा होतो. ‘आयएनएस तुशील‘ भारतीय नौदलाच्या ‘स्वार्ड आर्म’मध्ये सामील होईल. भारतीय नौदलाच्या मते, ही नौका जगातील सर्वांत तांत्रिकदृष्ट्या प्रगत विनाशिकांमध्ये गणली जाईल. २५ जानेवारी २०२४ रोजी ही युद्धनौका तिच्या पहिल्या समुद्री चाचण्यांसाठी निघाली आणि तिने चाचण्यांचे संपूर्ण वेळापत्रक पूर्ण केले. या युद्धनौकेने सर्व रशियन शस्त्रास्त्र प्रणालींच्या चाचण्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत आणि लढाईसाठीच्या सज्ज स्थितीत ते भारतात पोहोचेल.

कार्यक्रमाला उपस्थित असलेले संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या युद्धनौकेचे वर्णन भारत व रशिया या दोन देशांमधील दीर्घकालीन मैत्रीतील महत्त्वाचा टप्पा म्हणून केले. (छायाचित्र-राजनाथ सिंह/एक्स)

हेही वाचा : पाकिस्तानातील पहिले हिंदू पोलीस अधिकारी; कोण आहेत राजेंद्र मेघवार?

रशियाने भारतीय नौदलासाठी ‘आयएनएस तुशील’ची रचना व निर्मिती केली आहे. या जहाजाची रचना रशिया वापरत असलेल्या ॲडमिरल ग्रिगोरोविच-क्लास फ्रिगेट्सची अधिक प्रगत आवृत्ती आहे. १९९९ ते २०१३ या कालावधीत रशियाने आतापर्यंत अशी सहा जहाजे बांधून भारताला दिली आहेत. ‘आयएनएस तुशील’ युद्धनौकेसाठी जेएससी रोसोबोरॉन एक्स्पोर्ट, भारतीय नौदल आणि भारत सरकार यांच्यात ऑक्टोबर २०१६ मध्ये करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. २०२२ च्या अखेरीस ही युद्धनौका भारताच्या ताब्यात मिळेल, असा अंदाज होता. परंतु, रशियाच्या युनायटेड शिपबिल्डिंग कॉर्पोरेशनचे महासंचालक अलेक्सी रखमानोव्ह यांनी स्पष्ट केले की, पुरवठा वितरणास विलंब झाला.

‘आयएनएस तुशील’चे इंजिन युक्रेनमध्ये तयार

विशेष म्हणजे जहाजाचे इंजिन उशिरा मिळाल्यामुळे ‘आयएनएस तुशील’च्या ताब्यात मिळण्यास उशीर झाला. आयएनएस तुशील ही क्रिवाक फ्रिगेट आहे, ती युक्रेनच्या झोरिया मॅशप्रोक्टच्या इंजिनाद्वारे चालविली जाते. झोरिया-मॅशप्रोएक्ट इंजिन सागरी वायू टर्बाईन उत्पादनात महत्त्वाचे आहे. त्याशिवाय भारतीय नौदलाची सुमारे ३० जहाजे प्राथमिक स्रोत म्हणून युक्रेनियन कंपनीच्या गॅस टर्बाईनचा वापर करतात. यापूर्वी भारतीय नौदलाचे माजी प्रवक्ते कॅप्टन डी. के. शर्मा (निवृत्त) यांनी इशारा दिला होता की, युक्रेनमधील संघर्ष भारतीय नौदलाला कमकुवत करू शकतो. रशिया-युक्रेन युद्ध सुरू असताना, कीवने मॉस्कोला सर्व उत्पादनांची डिलिव्हरी थांबवली; ज्यामुळे जहाजबांधणीला विराम मिळाला. मात्र, भारताने युक्रेनच्या कंपनीशी आंतर-सरकारी कराराद्वारे करार केला. करारानुसार, नवी दिल्ली ही इंजिने थेट खरेदी करेल आणि नंतर ती रशियातील शिपबिल्डिंग यार्डमध्ये पोहोचवेल.

आयएनएस तुशील ही १२५ मीटर लांब आणि ३,९०० टन वजनाची युद्धनौका आहे. (छायाचित्र-पीटीआय)

भारतीय नौदलासाठी गेम चेंजर

आयएनएस तुशील ही १२५ मीटर लांब आणि ३,९०० टन वजनाची युद्धनौका आहे. ही युद्धनौका रशियन, भारतीय अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि युद्धनौका बांधणीतील सर्वोत्तम पद्धतींचे प्रभावी मिश्रण आहे. त्या तुलनेत, आयएनएस कोलकाता ही सर्वांत ताकदवान युद्धनौका आहे. त्याची लांबी केवळ १६३ मीटर आहे आणि तिचे विस्थापन ७,५०० टन आहे. त्यात ३० नॉट्सपेक्षा जास्त वेग गाठण्याची क्षमतादेखील आहे. जहाजावर आठ ब्राह्मोस अनुलंब प्रक्षेपित केलेली जहाजविरोधी क्रूझ क्षेपणास्त्रे, २४ मध्यम श्रेणीची व आठ कमी पल्ल्याच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, १०० मिमी तोफा आणि क्षेपणास्त्रांपासून संरक्षणासाठी दोन जवळची शस्त्रे आहेत. त्याशिवाय पाणबुड्यांचा सामना करण्यासाठी त्यात दोन डबल टॉर्पेडो ट्यूब आणि रॉकेट लाँचर आहेत. हे रडार, सोनार आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट्स, फायर कंट्रोल सिस्टीम आणि डेकोयसह सुसज्ज आहे.

हेही वाचा : दुबईचा व्हिसा मिळवताना भारतीय पर्यटकांना अडचणी का येत आहेत? काय आहेत नवे नियम?

नॅशनल डिफेन्स मॅगझिनचे मुख्य संपादक व सेंटर फॉर ॲनालिसिसचे संचालक
इगोर कोरोत्चेन्को यांनी ‘स्पुतनिक इंडिया’ला सांगितले, “आयएनएस तुशील ही प्रगत पाणबुडीविरोधी युद्धनौका आहे. यात प्रगत युद्ध आणि हवाई संरक्षण प्रणाली आहे; ज्यामुळे याचा अनेक मोहिमांसाठी वापर केला जाऊ शकतो. ते पुढे म्हणाले की, आयएनएस तुशील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणाच्या अनुषंगाने भारताच्या भौगोलिक राजकीय हितासाठी महत्त्वाची ठरेल. आयएनएस तुशील हिंद महासागरात चीनच्या वाढत्या सामर्थ्याचा मुकाबला करण्यासाठी भारताला मदत करील. काही तज्ज्ञांनी असे म्हटले आहे की, चीनचे नौदल हे जगातील सर्वांत वेगाने वाढणारे आहे आणि ताकदीच्या बाबतीत ते अमेरिकेच्या नौदलाला मागे टाकू शकते.