‘तुम्ही काळजी करू नका, तुमचा भाऊ पाठीशी आहे’ अशी सभांमधून साद घालत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्यात भाजपला अनुकूल स्थिती निर्माण केली. निवडणुकीत जरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हा चेहरा असला तरी, स्थानिक पातळीवर शिवराजसिंह ऊर्फ मामा हेच सब कुछ होते. मध्य प्रदेशच्या इतिहासात सर्वाधिक १५ वर्षांहून अधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले ६४ वर्षीय मामाजी उत्तम संघटन कौशल्य, साधेपणा यामुळे जनतेत अफाट लोकप्रिय आहेत. भाजप राज्यात दोन दशके सत्तेत असताना सरकारविरोधी जनतेला बदलण्याची किमया यंदा शिवराजमामांनी केली. यामागे ‘लाडली बहना’ या त्यांच्या लोकप्रिय योजनेचा हात असला तरी, शिवराजसिंह चौहान यांची पक्षनिष्ठा तसेच अपार मेहनत घेण्याची वृत्ती यामुळेच हिंदी भाषिक पट्ट्यातील मध्य प्रदेश हे मोठे राज्य आज भाजपच्या विचारांची प्रयोगशाळा झाली आहे.
संघविचारांची पार्श्वभूमी
साधारण १९७७-७८ च्या सुमारास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून सार्वजनिक जीवनातील कार्याला त्यांनी सुरुवात केली. मुळात मध्य प्रदेशमध्ये पूर्वी जनसंघ आणि नंतर भाजपचे व्यापक संघटन आहे. पुढे सात ते आठ वर्षांत त्यांनी भाजपमधून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. पक्षाच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळत असताना १९९० मध्ये ते बुधनीमधून पहिल्यांदा आमदार झाले. पुढे विदिशा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले. चार वेळा ते खासदार झाले. नोव्हेंबर २००५ मध्ये मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा त्यांच्याकडे आली. १३ वर्षे सलग मुख्यमंत्रीपद सांभाळल्यानंतर गेल्या वेळी म्हणजे २०१८ मध्ये थोडक्यात भाजपची सत्ता गेली. फोडाफोडीनंतर १५ महिन्यांत २४ मार्च २०२० रोजी चौथ्यांदा राज्याचे नेतृत्व त्यांच्याकडे आले. राज्यात भाजपमध्ये अनेक नेते असले, तरी ते ठरावीक जिल्हा किंवा विभागापुरते आहेत. राज्यव्यापी असा नेता म्हणजे शिवराजमामाच. भले पक्षश्रेष्ठींना कितीही वाटो की आता बदल करावा, मात्र जनतेमध्ये शिवराज यांच्याबद्दल जी सहानुभूती आहे ती पाहता त्यांना हटविणे कठीण आहे. जर त्यांना हटवले तर पक्षाच्या दिल्लीतील नेत्यांनी राज्याच्या लोकनेत्याला डावलले हा संदेश जाण्याची भीती आहे. लोकांचा पाठिंबा हीच त्यांची ताकद आहे.
कल्याणकारी योजनांमुळे लोकप्रिय
राज्यात उद्योगधंद्यांना अनुकूल असे वातावरण निर्माण करण्यात गेल्या पंधरा वर्षांत त्यांना यश मिळाले. त्याचबरोबर कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी व्यवस्थित होईल याचीही खबरदारीही घेतली. यामुळे भाजप सत्तेत असतानाही जनतेत सरकारविरोधात संताप नव्हता. या वर्षी मार्चमध्ये लागू केलेली ‘लाडली बहना’ योजना याखेरीज ‘मुख्यमंत्री कन्या विवाह’ आणि ‘नकाह’ योजना तसेच ‘मुख्यमंत्री कन्या अभिभावक पेन्शन योजना’ या भाजपसाठी निर्णायक ठरल्या. गेल्या वेळी काँग्रेसपेक्षा जागा कमी जरूर मिळाल्या. तरीही भाजप १०९ जागांसह सत्तेच्या जवळच होता. विविध योजनांचे यश त्याला हिंदुत्वाची जोड देण्यात शिवराजसिंह चौहान यशस्वी ठरले.
उजैनचा कायापालट हे चौहान यांचे यश आहे. सामान्य मतदाराला आपला नेता हा धार्मिक विचारांशी आस्था बाळगणारा आहे हे ठसवण्यात ते यशस्वी झाले. त्याच जोडीला मामांची प्रतिमा त्या अर्थाने कट्टर हिंदुत्ववादी अशी नाही. असा मिलाफ त्यांनी साधला. अर्थात अलीकडे त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांना शह देण्यासाठी हिंदुत्वाच्या प्रतीकांचा अधिक जोरकस वापर चालवला होता. तरीही ‘विकासपुरुष’ ही त्यांची प्रतिमा टिकून आहे. आज भाजपकडे योगी आदित्यनाथ यांच्यानंतर लोकप्रियतेच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांमध्ये शिवराजसिंह चौहान यांचाच क्रमांक लागतो.
दिवसाला दहा सभांचा धडाका
सलग सत्ता असल्याने जनतेत काही प्रमाणात नाराजी असणारच. कारण विकासकामांच्या बाबतीत साऱ्याच अपेक्षा पूर्ण करणे शक्य नसते. मध्य प्रदेशात भाजपसाठी काही प्रमाणात बिकट स्थिती होती. मात्र शिवराजसिंह चौहान यांनी जनसंपर्क विविध कार्यक्रमांद्वारे वातावरण भाजपला अनुकूल केले. १ जानेवारी ते १५ नोव्हेंबर या साडेदहा महिन्यांच्या कालावधीत एक हजार कार्यक्रमांना चौहान यांनी उपस्थिती लावली. जवळपास सरासरी रोज तीन कार्यक्रमांना ते हजर होते. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी ५३ जिल्ह्यांमध्ये ५३ महिला सभांना त्यांनी मार्गदर्शन केले. ९ ऑक्टोबरला आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर ३७ दिवसांत राज्यातील २३० पैकी १६५ मतदारसंघांत त्यांच्या सभा झाल्या. दिवसाला १० ते १२ सभा त्यांनी घेत जनतेशी संवाद साधला.
कमलनाथ यांच्याशी तुलना
शिवराज सिंह यांची तुलना सातत्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ७७ वर्षीय कमलनाथ यांच्याशी होत होती. कमलनाथ हे मध्य प्रदेशच्या राजकारणातील बडे प्रस्थ. काँग्रेसला यंदा सत्ता मिळणारच असा अतिआत्मविश्वास त्यांना भोवला. त्या तुलनेत शिवराजसिंह शांतपणे प्रचार करत राहिले. भाजप श्रेष्ठींनी राज्यात मुख्यमंत्रीपदाचा दावेदार जाहीर न करता पक्ष अन्य पर्यायाची चाचपणी करत असल्याचा संदेशही दिला. शिवराजसिंह यांना उमेदवारीसाठीही त्यांना तिसऱ्या यादीपर्यंत थांबावे लागले. मात्र या साऱ्याचे कोठेही त्यांनी भांडवल केले नाही. राज्यात सातत्याने फिरत असल्याने लोकांमध्ये काय चर्चा आहे, त्यांचा कल काय असेल, याची कल्पना शिवराजमामांना होती. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधानांनीही त्यांची स्तुती केली. त्यावरून मध्य प्रदेशात भाजपकडे त्यांच्या तोलामोलाचा नेता नाही हे स्पष्ट होते. आता निकालातूनही त्याचे प्रत्यंतर आले.
hrishikesh.deshpande@expressindia.com