केंद्र सरकारच्या चित्ता प्रकल्पाअंतर्गत मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात पहिल्या तुकडीत नामिबिया तर दुसऱ्या तुकडीत दक्षिण आफ्रिकेतून चित्ते स्थानांतरित करण्यात आले. कुनोत चित्ते स्थिर झाल्यानंतर २०२४ मध्ये हिवाळ्यात दक्षिण आफ्रिकेतून चित्त्यांची तिसरी तुकडी भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यासाठी गांधीसागर अभयारण्य सज्ज असून नुकतेच दक्षिण आफ्रिकेच्या प्रतिनिधी मंडळाने या तयारीची चाचपणी केली. तरीही या नव्या अधिवासात चित्त्यांना आणणे इतके सोपे नाही.
नवीन अधिवासात कोणती तयारी?
गांधीसागर अभयारण्य मध्य प्रदेशातच असले तरी चित्त्यांसाठी हा नवीन अधिवास असणार आहे. तो ६४ चौरस किलोमीटर क्षेत्रात तयार करण्यात आला आहे. १७.७२ कोटी रुपये खर्चून गांधीसागर अभयारण्य विकसित करण्यात आले आहे. हा भाग तारांच्या कुंपणांनी संरक्षित करण्यात आला आहे. २५ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी कुनो राष्ट्रीय उद्यानातून चित्त्यांचे निरीक्षण आणि त्यांची काळजी घेण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण आधीच घेतले आहे. चित्ता पुनर्वसन योजनेअंतर्गत चित्त्यांसाठी दूसरे अभयारण्य मध्यप्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात आहे.
हेही वाचा : विश्लेषण : नऊ महिन्यांत मुंबईत तीन कैद्यांच्या कोठडीत आत्महत्या…पोलीस, तुरुंग प्रशासनाचे नेमके कुठे चुकले?
स्थानिकांचा या नव्या अधिवासाला विरोध का?
गांधीसागर अभयारण्यालगत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला चैनपुरिया हे गाव आहे. ४५२ कुटुंबातील सुमारे अडीच हजार गावकरी येथे राहतात. त्यांचा मुख्य व्यवसाय पशुपालन आणि शेती आहे. प्रत्येक गावकऱ्याकडे ७० ते १०० पाळीव जनावरे आहेत. म्हशी आणि शेळ्यांची संख्या २५ हजारपेक्षा कमी आहे. पाच दशकांपूर्वी गांधीसागर धरणाच्या बांधकामादरम्यान अनेक गावकऱ्यांची जमीन धरणाच्या बुडीत क्षेत्रात आल्याने प्रशासनाने त्यांना विस्थापित केले. तेव्हापासून दुग्धव्यवसाय हा त्यांचा मुख्य आर्थिक स्त्रोत आहे. गावकऱ्यांच्या म्हशी आणि शेळ्या ज्याठिकाणी चरत असतात, नेमके त्याचठिकाणी चित्त्यांना जाण्यासाठी दगडी भिंत आणि तारांचे कुंपण बांधण्यात आले. त्यामुळे गावकऱ्यांच्या उपजीविकेवर पुन्हा एकदा संकट आले आहे.
चित्त्यांसाठी शिकारीचा पुरवठा कसा?
आतापर्यंत नृसिंहगड येथून सुमारे ३५० हून अधिक चितळे गांधीसागरमध्ये सोडण्यात आली. तर केंद्र सरकारने शाजापूर येथून हरीण पकडण्याचे काम आफ्रिका वाईल्डलाईफ अँड कन्झर्व्हड सोल्युशन कंपनीला दिले. आफ्रिकेतून येणारे चित्ते हिवाळ्यापर्यंत मंदसौर जिल्ह्यातील गांधीसागर अभयारण्यात येतील. यापूर्वी लोकसभा निवडणुकीमध्ये हा प्रकल्प पुढे ढकलण्यात आला होता आणि आता शाजापूर येथून काळवीट आणण्याचा प्रकल्पदेखील पाऊस पडेपर्यंत पुढे ढकलला जाऊ शकतो. शाजापूर येथून ४०० हरणे पकडली जाणार होती. मात्र, पहिल्या हेलिकॉप्टरच्या निविदेतील तांत्रिक बिघाडामुळे करार होऊ शकला नाही. आता उन्हाळा सुरू झाल्याने आफ्रिकन संघाने हरीण पकडण्यास नकार दिला आहे. त्यांच्यामध्ये उन्हाळ्यात स्थानांतरण करताना समस्या येऊ शकतात. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर ही मोहीम राबवण्यात येईल. राज्यातील विविध भागातून सुमारे एक हजार २५० चितळ व हरणे गांधीसागरमध्ये आणण्याचे उद्दिष्ट आहे.
चित्त्यांच्या नव्या अधिवासाचा वाद काय?
दुसऱ्या तुकडीत दक्षिण आफ्रिकेतून येणारे काही चित्ते राजस्थानमधील मुकुंद्रा व्याघ्रप्रकल्पात ठेवण्याची विनंती या क्षेत्रातील तज्ज्ञांनी केंद्राला केली होती. तसेच राजस्थान सरकारने देखील २०२२ मध्ये राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाला पत्र लिहून चित्ते स्वीकारण्याची तयारी दर्शवली. मात्र, गुजरात जसे सिंहासाठी ओळखले जाते, तसेच मध्य प्रदेश चित्त्यांसाठी ओळखले जावे म्हणून तेथील सरकारने हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला. त्यावेळी राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार होते आणि चित्त्याचा नवा अधिवास म्हणून मुकुंदा व्याघ्रप्रकल्प नाकारण्यामागे हेदेखील एक कारण होते. चित्त्याच्या एकापाठोपाठ एक होणाऱ्या मृत्यूनंतर सर्वोच्च न्यायालयानेदेखील मुकुंद्रा व्याघ्रप्रकल्पाचा चित्त्याचा नवा अधिवास म्हणून विचार करावा, असे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, न्यायालयाच्या निर्देश देखील डावलण्यात आले आणि कोट्यवधी रुपये खर्चून गांधीसागर चित्त्यांसाठी विकसित करण्यात आले.
हेही वाचा : विश्लेषण : इस्रायल आणि हमासदरम्यान युद्धविरामाला उशीर का? चर्चेचे घोडे नेमके कुठे अडते?
चित्त्यांना अधिवास आणि खाद्य पुरेसे आहे?
वाघ आणि सिंहांच्या तुलनेत चित्त्यांना धावण्यासाठी आणि शिकार करण्यासाठी विस्तीर्ण प्रदेशाची आवश्यकता असते. भारत आणि दक्षिण आफ्रिकेची तुलना केल्यास दक्षिण आफ्रिकेपेक्षा भारतात प्रति चौरस किलोमीटरमध्ये अधिक प्राणी राहू शकतात. मात्र, चित्त्याला सिंह आणि वाघांपेक्षा अधिक क्षेत्र लागते. ते त्यांची शिकार अधिक काळ पकडून ठेवू शकत नाही. कुनोप्रमाणेच गांधीसागर अभयारण्यातही चित्त्यांसाठी शिकारीचे आव्हान आहे. आतापर्यंत त्यांच्यासाठी मध्य प्रदेशातीलच वेगवेगळ्या ठिकाणाहून चितळ व हरणे आणून सोडली आहेत. तर पावसाळ्यानंतर आणखी काही हरणे सोडण्यात येणार आहेत. ही संख्या नैसर्गिकरित्या वाढली नाही तर मात्र शिकारीच्या शोधात चित्ते बाहेर पडून मानव-वन्यजीव संघर्षाची शक्यता नाकारता येत नाही.
rakhi.chavhan@expressindia.com