कुख्यात गुंडाला, दहशतवाद्याला बेड्या ठोकण्यासाठी पोलीस किंवा तपास यंत्रणा संपूर्ण ताकद पणाला लावतात. यातील काही ‘मोस्ट वॉन्टेड’ आरोपींना पकडून देणाऱ्याला सरकार बक्षिसदेखील देते. हे बक्षिस काही हजारांपासून ते कोट्यवधी रुपयांपर्यंत असते. मध्य प्रदेश सरकारने मात्र एखाद्या आरोपीला नव्हे तर चक्क माकडाला पकडून देणाऱ्यास २१ हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. साधारण दोन आठवड्यांपासून मध्य प्रदेशमध्ये या माकडाचा शोध सुरू होता. याच पार्श्वभूमीवर एका माकडासाठी प्रशासन २१ हजार रुपये देण्यास का तयार झाले? नेमके प्रकरण काय आहे? हे जाणून घेऊ या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य प्रदेशमधील राजगड येथे एका माकडाने उच्छाद घातला होता. त्याला पकडून देणाऱ्याला तेथील प्रशासनाने २१ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. साधारण दोन आठवड्यांपासून प्रशासन त्याच्या मागावर होते. मात्र ते माकड काही त्यांच्या हाती लागत नव्हते. मिळालेल्या माहितीनुसार या माकडाने आतापर्यंत २० लोकांवर हल्ला केला होता. शेवटी त्याला पकडण्यासाठी उज्जैन येथून एका टीमला बोलवण्यात आले. या टीमने स्थानिक प्रशासनाच्या मदतीने या माकडाला पकडले.

माकड ‘मोस्ट वॉन्टेड’ का ठरले?

या माकडाने आतापर्यंत साधारण २० जणांवर हल्ला केला होता. समोर माणूस दिसताच हे माकड थेट हल्ला करायचे. या माकडाने हल्ला केल्यानंतर बहुतेक लोकांना थेट रुग्णालयात जावे लागले. अनेकांना शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी जखमा झाल्या. एका हल्ल्यात माकडाने थेट एका वयोवृद्ध माणसाला लक्ष्य केले होते. या हल्ल्यामुळे त्या माणसाच्या मांडीला गंभीर दुखापत झाली होती.

या माकडाची सगळीकडे दहशत पसरली होती. मुलांचे माकडांपासून संरक्षण व्हावे म्हणून लोक विशेष खबरदारी घेत होते. काहींनी तर घरातील बंदुका तयार ठेवल्या होत्या. याच कारणामुळे माकडाला पकडून देणाऱ्यांना २१ हजार रुपयांचे बक्षिस देण्याचे येथील स्थानिक प्रशासनाने जाहीर केले होते.

माकडाला शेवटी कसे पकडण्यात आले?

माकडला पकडण्यासाठी उज्जैनहून एक विशेष पथक बोलावण्यात आले होते. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने या पथकाने माकडाला पकडण्याचे काम केले. या पथकाने कित्येक तास माकडाच्या हालचालीवर लक्ष ठेवले. विशेष म्हणजे त्यासाठी ड्रोनचाही वापर करण्यात आला. उज्जैनहून आलेले पथक माकडाला पकडत होते, तेव्हा बघ्यांनी जय श्री राम आणि जय बजरंग बली, अशा घोषणा दिल्या. त्यामुळे काही काळासाठी राजगडच्या परिसरात वेगळेच वातावरण निर्माण झाले होते.

२१ हजार रुपयांचे बक्षिस उज्जैनमधील पथकाला मिळणार

माकडाला पकडण्याच्या या मोहिमेबद्दल राजगड महापालिकेचे सभापती विनोद साहू यांनी सविस्तर सांगितले आहे. आमच्या पालिकेकडे माकडाला पकडण्यासाठीची साधने आणि यंत्रणा नव्हती असे त्यांनी सांगितले. “माकडाला पकडण्यासाठी आमच्याकडे पुरेशी यंत्रणा नव्हती. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. जिल्हाधिकाऱ्यांनी सगळीकडे संपर्क साधल्यानंतर माकडाला पकडण्यासाठी उज्जैन येथून एक विशेष पथक राजगड येथे आले. महापालिकेचे कर्मचारी आणि स्थानिकांच्या मदतीने साधारण चार तासांत माकडाला पकडण्यात यश आले,” असे साहू यांनी सांगितले. दरम्यान येथील प्रशासनाने जाहीर केलेले २१ हजारांचे बक्षिस उज्जैन येथील विशेष पथकाला देण्यात येणार आहे.

चार तासांत माकडाला पकडण्यात यश

माकडाला पकडण्याच्या मोहिमेबद्दल वन अधिकारी गौरव गुप्ता यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “माकडाला पकडण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यांकडे संपर्क साधला. उज्जैनमधील एका पथकाने माकड पकडून देण्याची तयारी दर्शवली. हे पथक लगेच राजगड येथे आले आणि त्यांनी साधारण ४ तास मेहनत घेऊन उच्छाद घालणाऱ्या माकडाला पकडून दिले,” असे गुप्ता यांनी सांगितले. दरम्यान या माकडाला आता मोठ्या जंगलात सोडून देण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhya pradesh rajgarh most wanted monkey caught know detail information prd