इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो)ची मोहीम ‘चांद्रयान-३’चे दक्षिण ध्रुवावर यशस्वी अवतरण झाल्यानंतर भारताने इतिहास रचला. दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जगातील तिसरा देश आहे. ‘चांद्रयान-३’च्या यशस्वी मोहिमेनंतर वेळोवेळी चंद्राविषयी महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. या यशस्वी मोहिमेची घोडदौड अजूनही सुरूच आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलेल्या प्रग्यान रोव्हरने चंद्राविषयीचा महत्त्वपूर्ण डेटा प्रदान केला आहे; ज्याने वैज्ञानिकही हैराण आहेत. ‘चांद्रयान-३’ने नक्की कोणती रहस्ये उलगडली? खरंच चंद्रावर लाव्हारस होता का? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
हा शोध कसा शक्य झाला?
२३ ऑगस्ट, २०२३ रोजी भारताच्या ‘चांद्रयान-३’ मोहिमेने इतिहास घडवला. कारण त्याच्या विक्रम लँडरने चंद्रावर यशस्वी अवतरण (लॅंडींग) केले. या स्थानाला ‘शिव शक्ती’ असे नाव देण्यात आले आहे. यशस्वी अवतरणानंतर लगेचच अत्याधुनिक वैज्ञानिक उपकरणांनी सुसज्ज असलेले प्रग्यान रोव्हर विक्रम लँडरमधून बाहेर पडले आणि शोधमोहिमेस सुरुवात झाली. पुढील दहा दिवसांत, प्रग्यानने अवतरणाच्या ५० मीटर क्षेत्राच्या आत २३ वेगवेगळ्या ठिकाणी चंद्राच्या मातीचे विश्लेषण करून, अंदाजे १०३ मीटर चंद्राचा प्रवास पूर्ण केला. रोव्हरमध्ये चंद्राच्या मातीची मूलभूत रचना मोजण्यासाठी अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर (एपीएक्सएस) आणि लेझर-इंड्यूस ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप (एलआयबीएस) ही दोन उपकरणे बसवण्यात आली आहेत. अहमदाबादमधील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (पीआरएल) द्वारे विकसित केलेल्या एपीएक्सएसने मातीतील विविध घटक शोधण्यासाठी आणि त्याचे प्रमाण निश्चित करण्यासाठी एक्स-रे फ्लूरोसेन्स स्पेक्ट्रोस्कोपी आणि लेझर-इंड्यूस ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोपचा वापर केला.
‘एपीएक्सएस’ने चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या माती आणि खडकातील मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, टीटानियम (कथील) आणि लोह या खनिजांसह अनेक किरकोळ घटकांचा अभ्यास केला. प्रत्येक स्थानावरील निरीक्षणासाठी रोव्हरला २० मिनिटे ते तीन तासांपर्यंतचा कालावधी लागला. मोहिमेदरम्यान, ‘एपीएक्सएस’ने एकूण ३१ तासांचा डेटा रेकॉर्ड केला आणि दक्षिण ध्रुवाजवळील चंद्राच्या मातीच्या रचनेचे चित्रही पाठवले.
चंद्रावर लाव्हारसाचा महासागर होता का?
‘चांद्रयान -३’च्या डेटामधील सर्वात महत्त्वपूर्ण निष्कर्षांपैकी एक म्हणजे ‘लूनर मॅग्मा ओशियन’चा (एलएमओ) सिद्धांत. या सिद्धांतानुसार चंद्र एकेकाळी लाव्हारसाने पूर्णपणे व्यापलेला होता. ही चंद्राची उत्पत्ती झाल्याच्या करोडो वर्षांनंतरची गोष्ट आहे. चंद्र जसजसा थंड होत गेला, तसतसे कवच, आवरण आदींसह चंद्राच्या आत विविध स्तरांची निर्मिती झाली. या गृहीतकानुसार, चंद्राचे कवच मुख्यतः फेरोअन एनोर्थोसाइट (एफएएन) नावाच्या खडकाने तयार झाले आहे. त्यात ‘प्लाजिओक्लेज’ आढळून येते. चंद्र थंड झाल्यामुळे याच लाव्हारसाचे रूपांतर खडकांमध्ये झाले. त्यामुळेच चंद्रावर एकसारखे धातू आणि खनिजे आढळून येतात.
‘चांद्रयान-३’च्या प्रग्यान रोव्हरला दक्षिण ध्रुवाजवळील चंद्राच्या मातीमध्ये लक्षणीय प्रमाणात फेरोअन एनोर्थोसाइट आढळले. हे नासाच्या अपोलो आणि सोव्हिएत युनियनच्या लुनासारख्या पूर्वीच्या मोहिमांशी संरेखित करणारे होते. दक्षिण ध्रुव प्रदेशात फेरोअन एनोर्थोसाइटचा शोध महत्त्वाचा आहे. कारण यामुळे ‘लूनर मॅग्मा ओशियन’ खरंच अस्तित्वात होते, हे स्पष्ट होण्यात मदत होते. चंद्राच्या कवचाची दूरच्या प्रदेशातही भौगोलिकदृष्ट्या अगदी सुसंगत रचना आहे, त्यामागेही हेच कारण असल्याचे मानले जाते. त्यामुळे चंद्राचा पृष्ठभाग एकेकाळी लाव्हारसाचा एकसंध महासागर होता, या कल्पनेला दुजोरा मिळतो.
हा सिद्धांत पुरेसा आहे का?
फेरोअन एनोर्थोसाइटचा शोध ‘लूनर मॅग्मा ओशियन’च्या गृहीतकांना बळकटी देतो. ‘चांद्रयान-३’च्या डेटाने चंद्राच्या मातीत मॅग्नेशियमसमृद्ध खनिजांची उपस्थितीदेखील उघड केली आहे. या शोधामुळे ‘लूनर मॅग्मा ओशियन’ची संभाव्यता आणखी वाढते. कारण यातून हे स्पष्ट होते की, दक्षिण ध्रुवाजवळील चंद्राचे कवच केवळ फेरोअन एनोर्थोसाइटचे नसून त्याऐवजी चंद्राच्या आत खोलवर असलेल्या सामग्रीचे एक मिश्रण आहे. या मॅग्नेशियमसमृद्ध खनिजांची उपस्थिती विशेषतः मनोरंजक आहे. कारण याचा अर्थ असा होतो की, चंद्राच्या वरच्या आवरणातील सामग्री पृष्ठभागावर आली असावी आणि हे साऊथ पोल-एटकेन (एसपीए) बेसिनच्या निर्मितीदरम्यान घडले असावे. साऊथ पोल-एटकेन (एसपीए) बेसिन हे सौर यंत्रणेतील सर्वात मोठे विवर (क्रेटर) आहे.
साऊथ पोल-एटकेन बेसिन अंदाजे २,५०० किलोमीटर रुंद आणि आठ किलोमीटर खोल आहे. असे मानले जाते की, सुमारे ४.२ ते ४.३ अब्ज वर्षांपूर्वी एका मोठ्या लघुग्रहाच्या प्रभावामुळे हे विवर तयार झाले होते. या प्रभावामुळे चंद्राच्या आतील सामग्री, संभाव्यतः पृष्ठभागाच्या सामग्रीमध्ये मिसळली गेली. तसेच मॅग्नेशियमचा शोध असे सूचित करतो की, शिवशक्ती येथील चंद्राची माती ही केवळ सुरुवातीच्या चंद्राच्या कवचाचा अवशेष नाही तर त्यामध्ये खोल थरांमधील सामग्रीदेखील आहे. त्यामुळे चंद्राच्या अंतर्गत असणारी रचना आणि त्याच्या उत्पत्तीची माहिती मिळण्यास मदत होऊ शकते.
इस्रोचा हा शोध महत्त्वाचा का आहे?
चांद्रयान-३ च्या डेटातील निष्कर्ष चंद्राचा भूगर्भीय इतिहास आणि त्याच्या निर्मितीबद्दल जाणून घेण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. चंद्राचे कवच लाव्हारसाच्या महासागराने तयार झाले, या कल्पनेला हा डेटा समर्थन देतो. परंतु हे देखील सूचित करते की, नंतरच्या घटना, जसे की मोठमोठ्या खोऱ्यांची निर्मिती झाल्यामुळेच चंद्राच्या पृष्ठभागाचा आकार बदलला. प्रग्यानने नोंदवलेली मातीची एकसमान रचना भविष्यातील रिमोट सेन्सिंग मोहिमेसाठीही एक मौल्यवान आधाररेखा आहे. चंद्राच्या विविध क्षेत्रांमधील ही सुसंगतता सूचित करते की चंद्राच्या कवचाला आकार देणारी प्रक्रिया जागतिक स्वरूपाची होती.
हेही वाचा : ‘या’ देशात मुलांचे संगोपन करण्यासाठी भाड्याने मिळतात आई-वडील; ‘प्रोफेशनल पॅरेंट’ ही संकल्पना नक्की काय आहे?
भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेने केवळ चंद्राविषयीची आपली समज वाढवली नसून जागतिक अंतराळ संशोधन समुदायात भारताचे महत्त्वपूर्ण स्थान प्रस्थापित केले आहे. मोहिमेचे यश देशभरात साजरे केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ ऑगस्ट हा ‘राष्ट्रीय अंतराळ दिवस’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. कारण, याच दिवशी रोव्हरने चंद्रावर यशस्वीरीत्या अवतरण केले होते.