विश्वातील अव्वल बुद्धिबळपटू अशी ख्याती असलेला मॅग्नस कार्लसन आणि इयन नेपोम्नियाशी यांनी नुकत्याच न्यूयॉर्क येथे झालेल्या प्रतिष्ठेच्या जागतिक अतिजलद (ब्लिट्झ) अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे संयुक्त जेतेपद पटकावले. या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच दोन खेळाडूंना जेतेपद विभागून देण्यात आले. मात्र, ही कामगिरी ऐतिहासिकपेक्षा वादग्रस्तच अधिक ठरली. या दोनही खेळाडूंवर अगदी ‘फिक्सिंग’चेही आरोप लावण्यात आले. नक्की हे प्रकरण काय आणि कार्लसन पुन्हा वादात कसा सापडला, याचा आढावा.
अंतिम फेरीत काय घडले?
कार्लसन आणि नेपोम्नियाशी यांनी विविध टप्पे पार करताना अंतिम फेरीत स्थान मिळवले. हे दोन खेळाडू यापूर्वी जगज्जेतेपदाच्या लढतीतही एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. दोघांनाही एकमेकांचे कच्चे दुवे आणि बलस्थाने ठाऊक आहेत. त्यामुळे जागतिक अतिजलद स्पर्धेची अंतिम फेरी अपेक्षेप्रमाणे चुरशीची झाली. कार्लसनने पहिले दोन डाव जिंकत २-० अशी भक्कम आघाडी मिळवली. मात्र, त्यानंतर त्याने सावध पवित्रा अवलंबला आणि याचा त्याला मोठा फटका बसला. नेपोम्नियाशीने पुढील दोन डाव जिंकत लढतीत २-२ अशी बरोबरी साधली. विशेषत: चौथ्या डावात नेपोम्नियाशीने आपल्या अश्वाचा बळी देत खेचून आणलेला विजय उल्लेखनीय ठरला. पुढे नियमित डावांअंती असलेली बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी ‘सडनडेथ टायब्रेकर’चा अवलंब करण्यात आला.
हेही वाचा : History of chess: बुध्दिबळाची जन्मभूमी कुठली; भारत का चीन?
u
‘टायब्रेकर’मध्येही कोंडी कायम
कार्लसन आणि नेपोम्नियाशी यांच्यात जेतेपद पटकावण्यासाठी कमालीची जिद्द दिसून आली. ‘टायब्रेकर’मध्ये या दोघांनी ९८ टक्क्यांच्या अचूकतेने चाली रचल्या. त्यामुळे ‘टायब्रेकर’मधील तीनही डाव बरोबरीत सुटले. जोपर्यंत विजेता मिळत नाही, तोपर्यंत खेळत राहण्याचा पर्याय दोघांकडे होता. मात्र, त्यांनी तसे केले नाही.
जेतेपदासाठी ‘फिक्सिंग’?
‘टायब्रेकर’मधील तीन डावांअंती बरोबरीची कोंडी फुटू न शकल्याने कार्लसन आणि नेपोम्नियाशी यांनी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या (फिडे) अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कार्लसनने विभागून जेतेपद देण्याविषयी सुचवले आणि ‘फिडे’ने ते मान्यही केले. मात्र, त्यानंतर समाजमाध्यमांवर एक चित्रफीत व्हायरल झाली. यात ‘फिडे’शी चर्चा करण्यापूर्वी कार्लसन आणि नेपोम्नियाशी यांच्यात संवाद झाल्याचे दिसून आले. ‘‘आपण फिडेसमोर जेतेपद विभागून देण्याचा प्रस्ताव ठेवू. त्यांनी हे मान्य न केल्यास आपण ‘टायब्रेकर’मध्ये छोटे-छोटे डाव खेळू. हे डाव बरोबरीत सोडवून त्यांना आपला प्रस्ताव मान्य करण्यास भाग पाडू,’’ असे कार्लसनने नेपोम्नियाशीला सांगितले. हे एक प्रकारे ‘फिक्सिंग’च आहे असा आरोप समाजमाध्यमांवरून करण्यात आला.
श्रीनाथ, निमन यांच्याकडून टीका
कार्लसन आणि नेपोम्नियाशी यांच्यात झालेल्या संवादाची चित्रफीत व्हायरल झाल्यानंतर भारताचा ग्रँडमास्टर श्रीनाथ नारायणनने त्यांच्यावर टीका केली. ‘‘हे अनेक पातळ्यांवर चुकीचे आहे. ‘फिडे’ आपल्या अटी शिथिल करत नसल्यास कार्लसन त्यांना धमकावणार हे पुन्हा एकदा दिसून आले,’’ असे नारायणन म्हणाला. बुद्धिबळात खरी ताकद नक्की कोणाकडे आहे, असा प्रश्नही त्याने उपस्थित केला. तसेच एका चाहत्याने ‘फिडे’च्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. ‘‘हे फिक्सिंग नाही का? गेल्या वर्षी नेपोम्नियाशी आणि डुबोव यांनी लढत खेळण्यापूर्वीच ती बरोबरीत सोडवण्याचे ठरवले, त्यानंतर या दोघांनाही स्पर्धेबाहेर करण्यात आले होते. मग आता कार्लसन आणि नेपोवर कारवाई का करण्यात आली नाही?’ असे या चाहत्याने म्हटले. अमेरिकेचा ग्रँडमास्टर हान्स निमन यानेही ‘फिडे’वर ताशेरे ओढले. ‘‘बुद्धिबळाची थट्टा सुरू आहे. असे पूर्वी कधीही घडले नव्हते. बुद्धिबळाच्या जागतिक संघटनेवर एका (कार्लसन) खेळाडूचे नियंत्रण आहे हे एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा सिद्ध झाले,’’ असे निमनने ‘एक्स’वर लिहिले.
एकाच स्पर्धेत दोन वेळा वादात…
याच स्पर्धेत याआधी ड्रेसकोडचे (पेहरावसंहिता) पालन न केल्याने कार्लसन वादात सापडला होता. जागतिक जलद स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी तो जीन्स परिधान करून खेळायला आला होता. या स्पर्धेसाठी फॉर्मल कपडे (सूट आणि शूज) असा ड्रेसकोड होता. त्याचे कार्लसनने पालन न केल्याचे आढळून आल्यानंतर त्याला दंड ठोठावताना आर्बिटरनी त्याला पेहराव बदलून येण्यात सांगितले. कार्लसनने यासाठी स्पष्ट नकार देताना स्पर्धेतून माघार घेणे पसंत केले. यावरून कार्लसनवर बरीच टीका झाली. मात्र, पुढे जाऊन केवळ एका खेळाडूच्या आडमुठेपणापुढे नमते घेताना ‘फिडे’ने आपल्या ड्रेसकोडमध्ये थोडा बदल केला. त्यामुळे कार्लसनने अतिजलद स्पर्धेत खेळणे मान्य केले. या स्पर्धेत खेळाडू म्हणून त्याने लौकिकाला साजेशी कामगिरी केली. मात्र, अंतिम फेरीत अजब पाऊल उचलत त्याने पुन्हा वाद ओढवून घेतला आहे.
हेही वाचा : Hijab ban in Switzerland : स्वित्झर्लंडमध्ये हिजाब आणि बुरख्यावर का बंदी घालण्यात आली आहे?
आनंद तोंडघशी?
जीन्स पेहरावावरून कार्लसनने आनंदवर टीका केली होती. आनंदकडे योग्य स्थिती पाहून निर्णय घेण्याची क्षमता नाही, अजूनही तो (फिडे उपाध्यक्ष) पदासाठी तयार नाही, असे कार्लसनने म्हटले होते. जीन्स प्रकरणात आनंदने नियमांवर बोट ठेवले, त्यावेळी फिडेचे अध्यक्ष अर्कादी द्वोर्कोविच यांनी मात्र कार्लसनसाठी नियमांत अपवाद केला. त्यामुळे त्याला अतिजलद किंवा ब्लिट्झ प्रकारात भाग घेता आला. ती आनंदसाठी पहिली नामुष्की ठरली. पुढे कार्लसनने नियमांना आणखी बगल देत संयुक्त अजिंक्यपदाचा प्रस्ताव ठेवला, जो फिडेने मान्यही केला. अखेरीस याच कार्लसनला (आणि नेपोम्नियाशीला) विजेतेपदाच चषक प्रदान करण्याची जबाबदारीही आनंदलाच पार पाडावी लागली.