-प्रथमेश गोडबोले
साखर आयुक्त कार्यालयामार्फत महाराष्ट्र राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऊस पीक नोंदणीसाठी ‘महा-ऊस नोंदणी’ हे मोबाइल उपयोजन (ॲप) तयार करण्यात आले आहे. यामार्फत ज्या शेतकऱ्यांना साखर कारखान्यात जाऊन ऊस नोंद करणे शक्य नाही, असे शेतकरी या मोबाइल उपयोजनामार्फत स्वत:च्या ऊसक्षेत्राची नोंद करू शकतात. तसेच ज्या शेतकऱ्यांनी साखर कारखान्यात ऊसक्षेत्र नोंद केले आहे, त्यांच्या नोंदणीची माहिती या उपयोजनामध्ये दिसून येणार आहे. शेतकऱ्यांना कारखान्यांकडे ऊस नोंदणीबाबत येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी हे ॲप तयार करण्यात आले असून आगामी काळात हे खरोखरच उपयुक्त आहे किंवा कसे, हे समजणार आहे. मात्र, या ॲपमुळे उसाची नोंदणी एका क्लिकवर करणे शक्य झाले आहे.
या ॲपची गरज का पडली?
ऊस हे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देणारे नगदी पीक आहे. ग्रामीण भागात ऊस नोंदणीबाबत दरवर्षी गाळप हंगामादरम्यान तक्रारी येत असतात आणि उसाची तोड होण्याबाबत शेतकरी चिंतेत असतात. त्यामुळे साखर आयुक्तालयाकडून हे ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून उसाची नोंद होणार असल्याने ऊस वेळेवर तुटण्यास मदत होऊन शेतकऱ्यांचा फायदा होईल. यामध्ये एका कारखान्याव्यतिरिक्त अजून दोन अशा एकूण तीन कारखान्यांचा पर्याय दाखल करण्याची सोय असल्यामुळे ऊस तोडणीविषयी खात्री मिळणार आहे. राज्यात उसाचे क्षेत्र वाढत आहे. या पार्श्वभूमीवर या ॲपमुळे ऊस नोंदणीबाबतचा शेतकऱ्यांचा त्रास कमी होणार आहे.
कसे आहे ‘महा-ऊस नोंदणी’ ॲप?
‘महा-ऊस नोंदणी’ ॲप वापरासाठी अत्यंत सुलभ असून उद्घाटन झाल्यापासून हे ॲप गुगल प्ले-स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी ते डाउनलोड केल्यानंतर त्याद्वारे त्यांना आपल्या चालू हंगामातील ऊसक्षेत्राची माहिती भरावी लागणार आहे. ॲपमध्ये ऊस लागवडीची जिल्हा, तालुका, गाव आणि गट क्रमांकनिहाय माहिती भरल्यावर इतर माहितीसह ऊसक्षेत्राची माहिती भरावी. त्यानंतर कोणत्या कारखान्याला या ऊस नोंदणीसाठी कळवायचे यासाठी कारखान्यांचे तीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. साखर आयुक्तालय ही माहिती संबंधित जवळच्या कारखान्याकडे पाठवून देईल. त्यानंतर शेतकऱ्याला साखर कारखान्यामधील आपली ऊस नोंदणीची माहिती पाहता येईल, या ॲपच्या माध्यमातून साखर आयुक्तालय राज्यातील १०० सहकारी आणि १०० खासगी अशा एकूण २०० कारखान्यांकडे ऊस नोंदणीची माहिती पाठवू शकणार आहे.
हे ॲप कसे वापराल?
सर्व प्रथम गूगल प्ले-स्टोअरमधून ‘महा-ऊस नोंदणी’ हे ॲप डाउनलोड करून घ्यावे. ॲप डाउनलोड केल्यानंतर राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी आपल्याकडील चालू हंगामातील ऊसक्षेत्राची माहिती नोंदविण्यासाठी ‘ऊसक्षेत्राची माहिती भरा’ असे दिसून येईल. त्या ठिकाणी आपण बटण दाबावे. त्यानंतर ‘ऊसक्षेत्र नोंद करावयाच्या शेतकऱ्याची माहिती’ हे पृष्ठ दिसून येईल. त्यामध्ये क्रमाने माहिती भरावी. या ठिकाणी आपणास आपण उपयोजनामध्ये प्रविष्ट केलेली ऊस नोंद, साखर कारखान्याने स्वीकारलेली ऊस नोंद आणि साखर कारखान्याने नाकारलेली ऊस नोंद दिसून येईल.
घरबसल्या ऊस नोंदणी करता येणार?
साखर कारखान्यात जाऊन ऊस नोंदणी करणे शक्य होत नाही, असे शेतकरी या मोबाइल ॲपमार्फत स्वत:च्या ऊसक्षेत्राची नोंद करू शकणार आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांनी साखर कारखान्यात ऊसक्षेत्र नोंद केली आहे, त्यांच्या नोंदणीची माहिती या ॲपमध्ये दिसून येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या आपल्या उसाची नोंदणी करणे शक्य होणार आहे, असे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना ॲपचा फायदा काय?
या ॲपमुळे घरबसल्या किंवा शिवारातून ऊस नोंद करू शकणार आहेत. हे ॲप मराठीतून असून वापरण्यास सुलभ आहे. हे ॲप तांत्रिकदृष्ट्या सोपे आहे. याशिवाय या ॲपमध्ये माहिती भरणे कष्टप्रद नाही. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस नोंदणीसाठी साखर कारखान्यांचे उंबरठे झिजवण्याची गरज या ॲपमुळे राहिलेली नाही. राज्यातील शेतकऱ्यांना ऊस नोंदणीचे स्वातंत्र्य या ॲपच्या माध्यमातून प्रथमच मिळत आहे. शेतकऱ्याने एकदा नोंदणी करताच त्याचा ऊस कापून नेण्याची सक्ती साखर आयुक्तालयाकडून करण्यात येणार असल्याने कोणत्याही शेतकऱ्याचा ऊस बिगरनोंदणी किंवा बिगरकापणीचा राहणार नाही.