Archaeology of Mahabharat: पांडवांची राजधानी असलेलं इंद्रप्रस्थ हे शहर आज फक्त महाभारताच्या पानांमध्ये आणि लोककथांमध्ये उरलेलं एक पौराणिक शहर आहे. पण तीच राजधानी जमिनीखाली खरोखर दडलेली असेल का? भीमाची गदा, अर्जुनाचे गांडीव धनुष्य, कुंतीचे मंदिर परिसर हे सारे पृथ्वीच्या पोटात दडलेले असू शकते का? या प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठीच भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग (ASI) पुन्हा एकदा दिल्लीच्या पुराणा किल्ल्याकडे वळला आहे. या किल्ल्याची ओळख मुघल बादशहा हुमायूनच्या मृत्यूशी जोडलेली आहे, तोच किल्ला काही इतिहासकारांच्या मते पांडवांच्या इंद्रप्रस्थ या राजधानीच्या जागेवर बांधलेला आहे.
हा शोध म्हणजे केवळ ऐतिहासिक उत्खनन नव्हे, तर भारताच्या पौराणिक स्मृतींचे ऐतिहासिक सत्यात रुपांतरण करण्याचा प्रयत्न आहे. ही एक अशी शोधयात्रा आहे जिथे पुरावे, श्रद्धा आणि संशोधन एकत्र येते, अशी धारणा आहे. दिल्लीच्या पुराणा किल्ल्याचा इतिहास मुघल बादशहा हुमायूनशी जोडलेला आहे. हाच तो किल्ला आहे ज्याच्या पायऱ्यांवरून घसरून हुमायूनचा मृत्यू झाला होता. मात्र काही इतिहासकारांचे मत आहे की, या ठिकाणीच पांडवांनी त्यांची राजधानी इंद्रप्रस्थ वसवली होती.
महाभारत काळात जेव्हा धृतराष्ट्राने आपले राज्य पांडव आणि कौरव यांच्यात वाटून दिलं, तेव्हा कौरवांना हस्तिनापूर मिळालं आणि पांडवांना खांडवप्रस्थ. खांडवप्रस्थ ही एक दाट जंगलाने वेढलेली जागा होती, जिथे सूर्यप्रकाशसुद्धा पोहोचत नसे. भगवान श्रीकृष्ण आणि विश्वकर्म्याच्या मदतीने पांडवांनी त्या जंगलाचे रुपांतर भव्य राजधानीत केले आणि तिथे इंद्रप्रस्थ वसवले. असं म्हटलं जातं की, महाभारत काळातील इंद्रप्रस्थ म्हणजेच आजची दिल्ली आहे. आता भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग पांडवांची राजधानी इंद्रप्रस्थ शोधण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे. त्यासाठी दिल्लीतील पुराणा किल्ल्यात उत्खनन लवकरच सुरू होणार आहे. एएसआयने यासाठी मंजुरी दिली आहे. अशा परिस्थितीत हा प्रश्न उभा राहतो की, एएसआय पुराणा किल्ल्यातच इंद्रप्रस्थ का शोधत आहे? आणि मुघल काळात बांधलेला हा किल्ला इंद्रप्रस्थवरच बांधलेला आहे का, हे कसं ठरवणार?
हुमायूनचा मृत्यू याच किल्ल्यात झाला होता
दिल्लीच्या पुराणा किल्ल्याचा इतिहास हुमायूनशी निगडित आहे. याच किल्ल्याच्या पायऱ्यांवरून पडून हुमायूनचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मुघलांनी हा किल्ला सोडला. असं म्हणतात की, जिथे हा किल्ला बांधण्यात आला, तेच स्थळ पांडवांची राजधानी इंद्रप्रस्थ होते. आता एएसआय इथे उत्खनन करणार आहे. सांगायचं झालं तर, या किल्ल्याच्या बांधकामाची सुरुवात हुमायूनने १५३३ साली केली होती. १५४० मध्ये शेरशाह सूरीने त्याचे काम पुढे नेले आणि अखेर १५५५ मध्ये हुमायूनने ते पूर्ण केलं.
स्वातंत्र्यानंतर सहाव्यांदा उत्खनन
देश स्वतंत्र झाल्यानंतर दिल्लीतील पुराणा किल्ल्यात इंद्रप्रस्थच्या शोधासाठी आतापर्यंत सहा वेळा उत्खनन झालं आहे. प्रथम १९५४-५५ मध्ये एएसआयने इथे उत्खनन सुरू केलं. त्यानंतर १९६९-७३, २०१३-१४, २०१७-१८ मध्येही उत्खनन झालं. शेवटचं उत्खनन २०२३ मध्ये झालं. विशेष बाब म्हणजे यंदाचं उत्खनन किल्ल्याच्या विविध भागांत केलं जाणार आहे. गरज भासल्यास पूर्वी उत्खनन झालेल्या भागांनाही पुन्हा उघडण्यात येणार आहे. मागच्या वेळी सुमारे ६ मीटर खोदकाम केलं गेलं होतं, मात्र यंदा यापेक्षा अधिक खोलवर उत्खनन होईल, अशी अपेक्षा आहे.
आतापर्यंत काय सापडलं?
पूर्वी झालेल्या उत्खननात मौर्यकाल, शुंग, कुषाण, गुप्त, राजपूत, सल्तनत व मुघल कालखंडातील अवशेष सापडले आहेत. मात्र पांडवांच्या इंद्रप्रस्थचे ठोस पुरावे अद्याप सापडलेले नाहीत. तरीही एएसआय त्या दिशेने प्रयत्नशील आहे.
इंद्रप्रस्थचा पत्ता कसा सापडणार?
पूर्वी झालेल्या उत्खननात, कुंती मंदिराजवळील स्थळी ९०० वर्षे जुनी राजपूत काळातील भगवान विष्णूची मूर्ती तसेच १२०० वर्ष जुनी गजलक्ष्मी आणि गणेश मूर्ती सापडली आहे. त्यामुळे इतिहासकारांना आशा आहे की, याच ठिकाणी इंद्रप्रस्थचे काही पुरावेही सापडू शकतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा किल्ला एका उंच टेकाडावर बांधलेला आहे आणि तीच टेकडी पांडवांनी इंद्रप्रस्थची राजधानी म्हणून निवडली असावी. त्यामुळे या उत्खननातून त्या पुरातन टेकडीचे पुरावे शोधले जाणार आहेत. नकाशा, पुरावे आणि पुरातत्त्वशास्त्र या त्रयीच्या आधारे इंद्रप्रस्थचे काही ठोस अवशेष सापडले, तर केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासाचाच नव्हे, तर संपूर्ण भारतीय पुरातत्त्व संशोधनाच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक क्षण ठरेल.
पौराणिक कथा आणि ऐतिहासिक संशोधन यामध्ये एक धूसर सीमारेषा असते. इंद्रप्रस्थ हे आजही अनेक भारतीयांच्या श्रद्धेचा आणि सांस्कृतिक स्मृतीचा भाग आहे. मात्र एखाद्या विश्वासाला इतिहासात रूपांतरित करण्यासाठी पुरावे आवश्यक असतात. भारतीय पुरातत्त्व विभाग पुराणा किल्ल्यात जेव्हा पुन्हा एकदा खोदकाम सुरू करेल, तेव्हा त्यामागे केवळ पांडवांच्या कथांचा मागोवा नसून, भारताच्या पुरातन शहर संस्कृतीच्या अस्तित्वाची पडताळणी करण्याचाही प्रयत्न असेल. भविष्यात या उत्खननातून इंद्रप्रस्थच्या अस्तित्वाचे ठोस पुरावे सापडले, तर हे केवळ पुरातत्त्वशास्त्रासाठीच नव्हे, तर आपल्या सांस्कृतिक अस्मितेसाठीही मोलाचे ठरेल. काहीच सापडलं नाही, तरीही हा शोध आपल्याला आपल्या इतिहासाच्या गाभ्याशी नेणारा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल. कारण इतिहास ही काही केवळ घडलेल्या घटनांची नोंद नसते.