छत्तीसगडमध्ये ५४० कोटी रुपयांचा कथित कोळसा घोटाळा आणि २,१६१ कोटींचा मद्य विक्री घोटाळ्याच्या आरोपानांतर आता ऑनलाइन सट्टेबाजीला मदत करणारे महादेव ऑनलाइन बेटिंग प्रकरण समोर आले आहे. सक्तवसुली संचलनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडीने बुधवारी (२३ ऑगस्ट) चार आरोपींना अटक केली. सट्टेबाजी करणारे मुख्य आरोपी दुबईमधून ‘महादेव बुक’ या ऑनलाइन सट्टेबाजीचा कारभार सांभाळतात, त्यांनी आतापर्यंत पाच हजार कोटी रुपये या घोटाळ्यातून जमवले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक असताना लागोपाठ तीन घोटाळ्यांचे आरोप झाल्यामुळे छत्तीसगडचे राजकारण ढवळून निघाले आहे. महादेव बुक ऑनलाइन सट्टेबाजी कशी होते? विरोधकांनी छत्तीसगड सरकारशी याचा संबंध का लावला? अटक झालेल्यांची ओळख काय? याबाबत घेतलेला हा आढावा….

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, ‘महादेव ऑनलाइन बुक’ या संकेतस्थळावर विविध लाईव्ह खेळांवर अवैध सट्टेबाजी केली जाते. जसे की, पोकर आणि इतर पत्त्यांचे खेळ, संधीवर (नशिबावर) आधारित खेळ, क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस, फुटबॉल आणि इतर काही खेळ. या खेळांसोबतच भारतातील विविध राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीवरही इथे पैजा लावल्या जातात. यासह संकेतस्थळावर तीन पत्ती, पोकर, ड्रॅगन टायगर, व्हर्च्युअल क्रिकेट आणि इतर काही खेळ खेळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Jaipur railway track incident thar stuck in drunken misadventure shocking video goes viral
VIDEO: रील बनवण्यासाठी दारुड्यानं थेट रेल्वे ट्रॅकवर नेली थार; तितक्यात पाठीमागून मालगाडी आली अन्…थरारक शेवट
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
cash seized south mumbai ahead of assembly elections in maharashtra
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत कारवाई ; सव्वा दोन कोटींची रोख जप्त
western railway recovers 80 crore fine from ticketless passengers
विनातिकीट प्रवाशांकडून ८० कोटींची दंडवसुली; सात महिन्यांतील पश्चिम रेल्वेची कारवाई

‘महादेव बुक’ची ऑनलाइन सट्टेबाजी कशी चालते?

ईडीच्या माहितीनुसार, मेसर्स महादेव बुक या कंपनीने विविध संकेतस्थळ आणि चॅटिंग ॲप्सच्या माध्यमातून क्लोज ग्रुप्स (फक्त निमंत्रित अशा ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकतात) तयार केलेले आहेत. सध्या इंटरनेटवर अस्तित्वात असलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून महादेव बुककडून मोबाइल नंबरची जाहिरात केली जाते. मोठ्या बक्षिसाचे आमिष दाखवून लोकांनी या नंबरवर संपर्क साधण्यासाठी सांगितले जाते. या नंबरवर कॉल करता येत नाही, फक्त व्हॉट्सॲप मेसेजद्वारे संपर्क साधता येतो. एकदा का ग्राहकांनी या नंबरवर मेसेज केला की, त्यांना आणखी दोन नंबर पाठविण्यात येतात. एका नंबरवर संपर्क साधल्यानंतर, खेळ खेळण्यासाठी पैसे जमा करण्यास सांगितले जाते. पैशांच्या बदल्यात युझर आयडी आणि सट्टा लावण्यासाठी पॉईंट्स दिले जातात. जिंकलेल्या पाईंट्सचे पुन्हा पैशांमध्ये रुपांतर करून ते आपल्या खात्यात वळविण्यासाठी दुसऱ्या नंबरचा वापर करण्यात येतो.

हे वाचा >> ऑनलाइन गेमिंग-गॅम्बलिंगचे व्यसन लागू शकते? ऑनलाइन जुगारातून तरुणाईला कसे वाचवणार?

महादेव बुककडून विविध संकेतस्थळांच्या नावाने युझर आयडी देण्यात येतात. यात प्रामुख्याने laser247. com, laserbook247. com, betbhai. com, betbook247. com, tigerexch247. com आणि cricketbet9. com अशा वेबसाइटचा समावेश आहे. सट्टा लावणाऱ्या ग्राहकाची गरज आणि त्याचे प्राधान्य लक्षात घेऊन हे आयडी दिले जातात.

द इंडियन एक्सप्रेसने माहिती दिल्यानुसार, सट्टा खेळणाऱ्यांकडे पैसे गोळा करणे, युझर आयडी बनविणे, ग्राहकांना आयडींचा पुरवठा करणे आणि जिंकलेले पैसे पॅनेल किंवा शाखा प्रमुखांकडून वाटणे, अशा प्रकारे या ऑनलाइन सट्टेबाजीचे जाळे काम करते. सट्टा खेळणाऱ्या ग्राहकांना बेनामी बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करावे लागतात, पैसे प्राप्त झाल्यानंतर दुबईमधील मुख्यालयातून ग्राहकाला त्याचे पॅनेल दिले जाते. (पॅनेल किंवा शाखा क्षेत्रिय स्वरुपाच्या आहेत, त्या क्षेत्रातील ग्राहकांचे नियोजन त्यांना करायचे असते) जिंकलेल्या रकमेचा परतावादेखील या बेनामी बँक खात्यामार्फत केला जातो. ही बँक खाती फसवणूक करून किंवा बोगस कागदपत्रांद्वारे उघडण्यात आली आहेत.

महत्त्वाचे म्हणजे, महादेव बुकवरील सर्व खेळ मोठ्या चलाखीने तयार करण्यात आले आहेत. यामध्ये पॅनेल मालकांना कधीही तोटा होत नाही. जे ग्राहक नव्याने संकेतस्थळावर खेळण्यासाठी येतात, त्यांना सुरुवातीला काही प्रमाणात जिंकू दिले जाते. मात्र, त्यानंतर त्यांचे नुकसानच होत जाते.

‘महादेव बुक’ सट्ट्यामागील म्होरके

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, २०१७ साली महादेव ॲपची सुरुवात झाली. मात्र, २०२० साली कोरोना महामारीमध्ये त्यांच्याकडे ग्राहकांची रीघ लागली. २०२२ पर्यंत ग्राहकांच्या संख्येचा चढता आलेख पाहायला मिळाला. छत्तीसगडच्या भिलाई येथे राहणारे सौरभ चंद्राकर (वय २८) आणि रवि उप्पल (४३) हे महादेव ऑनलाइन बुकचे मुख्य प्रवर्तक आहेत आणि दुबईमधून ते सट्टेबाजीचा कारभार पाहतात. सट्टेबाजीवर त्यांचे पूर्ण नियंत्रण असून एकूण उत्पन्नाच्या ८० टक्के लाभांश ते स्वतःकडे ठेवतात. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघा सट्टेबाजांनी जवळपास पाच हजार कोटींची कमाई काही वर्षांमध्ये केली आहे.

मागच्या दोन वर्षांपासून दोन्ही आरोपी दुबई येथे राहत आहेत. त्याआधी दोघेही नियमितपणे दुबईत प्रवास करत होते. रवि उप्पल हा अभियांत्रिकीमध्ये पदवीधर आहे; तर सौरभ चंद्राकरचे शिक्षण कळू शकलेले नाही. दोघांविरोधात तीन महिन्यांपूर्वीच लुक आऊट नोटीस काढल्याचे छत्तीसगड पोलिसांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले.

छत्तीसगड सरकारशी धागेदोरे?

छत्तीसगड पोलिसांनी चार जणांना अटक केली. त्यामध्ये सुनील आणि अनिल दम्मानी (Dammani) हे दोन व्यावसायिक बंधू आहेत. यासोबत सह पोलिस निरीक्षक (ASI) चंद्रभूषण वर्मा आणि सतीश चंद्राकर यांनाही अटक करण्यात आले आहे. सर्व आरोपी रायपूर येथे राहणारे आहेत.

हे वाचा >> ऑनलाइन जुगारावर तामिळनाडू निर्बंध लादणार; ऑनलाइन गेमिंगवरून राज्य आणि केंद्र सरकार आमनेसामने का आले?

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, सह पोलिस निरीक्षक चंद्रभूषण वर्मा हा पोलिस खात्यातील निम्नस्तरावरील अधिकारी असला तरी त्याची या घोटाळ्यात मोठी भूमिका राहिली आहे. सरकारी यंत्रणांपासून मुख्य आरोपींचे संरक्षण करण्याचे काम तो इतके वर्ष करत होता. या संरक्षणापोटी त्याने आतापर्यंत ६५ कोटींची लाच घेतली आहे. लाचेच्या स्वरूपात मिळालेल्या पैशांचे वाटप पोलिस खात्यात वरपासून खालपर्यंत केले जाते. दर महिन्याला ५५ लाख रुपये रायपूर आणि दुर्ग जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षकांना पोहोचते केले जातात. दुर्ग, रायपूर जिल्ह्यातील काही आयपीएस अधिकारी आणि गुप्तचर विभागातील अधिकाऱ्यांना दर महिन्याला ७५ लाखांचे वितरण करण्यात येते. छत्तीसगडमध्ये २०२२ आणि २०२३ दरम्यान हे पैशांचे वाटप करण्यात आले आहे.

एएसआय वर्मा हा दुबईमध्ये बसलेले प्रवर्तक आणि छत्तीसगड सरकारमधील उच्चपदस्थ लोकांमधील महत्त्वाचा दुवा असून सट्टेबाजीचे रॅकेट विनासायस चालावे यासाठी कार्यरत होता, अशी माहिती ईडीने दिली आहे. वर्मा दर महिन्याला दुबईतील प्रमोटरकडून तगडी रक्कम मिळवत होता आणि त्या बदल्यात मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे राजकीय सल्लागार विनोद वर्मा यांच्या संपर्काचा फायदा घेऊन रवि उप्पल याची सरकारमधील वरिष्ठांशी ओळख करून देत होता. एएसआय वर्मा आणि मुख्यमंत्र्यांचे राजकीय सल्लागार विनोद वर्मा नातेवाईक असल्याचा आरोप ईडीने केला आहे.

गुरुवारी (२४ ऑगस्ट) विनोद वर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले, तसेच एएसआय वर्मा त्यांचा नातेवाईक नसल्याचेही त्यांनी सांगितले. ईडीने त्यांच्या घरी धाड टाकून घरातील दागदागिन्यांवर दरोडा टाकला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. घरातील दागिन्यांची वैध पावती दाखवूनही ईडीच्या अधिकाऱ्यांनी दागिने जप्त केले आहेत. तसेच मागच्या वर्षी एका स्थानिक वर्तमानपत्रात छापून आलेल्या काल्पनिक लेखाच्या आधारावर ईडीने ही कारवाई केली असल्याचा आरोपही विनोद वर्मा यांनी केला. सदर लेख छापणाऱ्या साप्ताहिकाच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ईडीने एक प्रेस नोट प्रकाशित करून या घोटाळ्याची माहिती उघड केली. त्यात म्हटले की, एएसआय वर्माने मे २०२२ साली या ऑनलाइन सट्टेबाजीवर तोंडदेखली कारवाई करून लाच स्वरूपात मिळणाऱ्या हप्त्यामध्ये वाढ करून घेतली होती. भविष्यातील कारवाई टाळणे, सट्टेबाजीच्या विरोधातील केसेसची नोंद न करणे, अजामीनपात्र गुन्हे दाखल न करणे यासाठी हप्ता वाढवून घेण्यात आल्याची कबुली वर्मा याने ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर दिली.

हवालामार्गे पैशांचे वाटप

आरोपींना न्यायालयात सादर केल्यानंतर ईडीने सांगितले की, रवि उप्पलने दुबईतून पाठविलेल्या पैशांच्या माध्यमातून एएसआय वर्मा त्याचा नातेवाईक विनोद वर्मा या दोघांनी रायपूर आणि दुर्ग जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा भ्रष्ट करून टाकली आहे. इतर दोन आरोपी दम्मानी बंधू यांचे दागिन्यांचे दुकान आणि पेट्रोल पंप आहे. अवैध धंद्यातून हवाला मार्गे मोठी रक्कम वळती करण्यात या दोघांनी मदत केल्याचे पोलिसांनी सांगितले. हवालाच्या माध्यमातून आलेला पैसा पोलिस आणि राजकीय पुढाऱ्यापर्यंत पोहोचवला जायचा.

दम्मानी बंधू प्रत्येक एक लाख हवालामार्गे वळते करण्यासाठी १०० रुपयांचे कमिशन घेत होते. मागच्या काही वर्षांत त्यांनी ८० ते १०० कोटी रुपये वळते केले असून त्यातून सहा लाखांची कमाई केली आहे. दम्मानी बंधू दुबईतील रवि उप्पल याच्याशी फोनवरून संपर्कात होते. त्यांच्या आभूषण ज्वेलर्सचा वापर हवालामार्गे पैसे मिळवण्यासाठी केला जात होता. घोटाळ्यातून मिळालेले पैसे एएसआय वर्मा याकडे दिले जात होते.

चौथा आरोपी सतीश चंद्राकर याने एएसआय वर्मा याच्या मदतीने जानेवारी २०२१ मध्ये महादेव बुकच्या दोन शाखांवर छापेमारी केली होती. भविष्यात अशी छापेमारी रोखण्यासाठी चंद्राकरलाही एक शाखा/पॅनेल देण्यात आले होते. या पॅनेलच्या माध्यमातून चंद्राकर चांगला नफा कमवत होता.

चारही आरोपींचे वकिलपत्र सय्यद झिशान यांनी घेतले आहे. चारही आरोपी निर्दोष असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. ईडीने त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले असून यासाठी कोणताही पुरावा दिलेला नाही, असा युक्तीवाद त्यांनी केला. ईडीने १४ दिवसांची कोठडी मागितली, ज्याचा आम्ही विरोध केला असून आता फक्त सहा दिवसांची कोठडी ईडीला मिळाली आहे, असेही झिशान यांनी सांगितले.

ईडीने पाऊल उचलण्यापूर्वी छत्तीसगड पोलिसांची कारवाई

छत्तीसगड पोलिसांनी या सट्टेबाजीविरोधात २०२१ मध्ये कारवाई केली होती. तेव्हापासून ७५ एफआयआर नोंदविण्यात आले असून देशभरातून ४२९ लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. १९१ लॅपटॉप, ८५८ स्मार्टफोन आणि सट्टेबाजीशी निगडित सामान, महागड्या गाड्या आणि अडीच कोटी रुपयांची रोकड छत्तीसगड पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेली आहे.

छत्तीसगड पोलिसांनी सांगितले की, या घोटाळ्यासाठी ३०३३ बँक खाती वापरण्यात आली. तपास सुरू केल्यापासून १०३५ बँक खाती गोठविण्यात आली आहेत. या खात्यात १५.५० कोटी रुपये जमा करण्यात आले होते. आंध्र प्रदेशमधून ऑनलाइन सट्टेबाजी चालविणाऱ्या सूत्रधारांवरही एफआयआर नोंदविण्यात आले आहेत.