उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्याच्या संगमात कोट्यवधी लोक स्नान करण्यासाठी येत आहेत. या महाकुंभ मेळ्यात आतापर्यंत कोट्यवधी भाविकांनी दर्शन घेतले आहे. मकर संक्रातीदिनी झालेल्या अमृत स्नानाच्या वेळी ३.५ कोटी भाविकांनी त्रिवेणी संगमावर स्नान केले. आता २९ जानेवारीला मौनी अमावास्यादिनी होणाऱ्या अमृत स्नानासाठी १० कोटी भाविक उपस्थित राहतील, असे सांगितले जात आहे. त्यामुळे प्रयागराजला येणाऱ्या वाहतूक सेवांच्या दरांत मोठी वाढ झाली आहे. प्रयागराजला येणाऱ्या विमानांच्या तिकीट किमती तर गगनाला भिडल्या आहेत. विमानांची तिकिटे महागण्याची कारणे काय? सरकार काय निर्णय घेणार? त्याविषयी जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रयागराजला जाणाऱ्या विमानांचे वाढले भाडे

‘टाइम्स ऑफ इंडिया’नुसार, चेन्नई ते प्रयागराजदरम्यानच्या २८ व ३० जानेवारीच्या परतीच्या तिकिटांची किंमत ५३,००० रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. या तारखांनाच जवळच्या कोलकाता येथून येणाऱ्या विमान तिकिटांची किंमत ३५,००० रुपयांपेक्षा जास्त आहे. मुंबई ते प्रयागराज तिकिटांची किंमत २२,००० ते ६०,००० रुपये आहे. बंगळुरू येथून जाणाऱ्या प्रवाशांना २६,००० ते ४८,००० रुपये इतका तिकीट खर्च येण्याची शक्यता आहे. विमान भाड्यात अचानक झालेली ही वाढ धक्कादायक आहे. कारण- इतर वेळी विमानाची तिकिटे पाच हजारांच्या आसपास असतात. ३ फेब्रुवारी (वसंत पंचमी), १२ फेब्रुवारी (माघी पौर्णिमा), व २६ फेब्रुवारी (महाशिवरात्री व महाकुंभाचा समारोपाचा दिवस) या दिवशी विमानांचे भाडे लक्षणीयरीत्या वाढवण्यात आले आहे.

हेही वाचा : महाकुंभमध्ये भरलेली धर्म संसद म्हणजे नक्की काय? याचे आयोजन नेहमी चर्चेचा विषय का ठरते?

दुसऱ्या शाही स्नानाचे महत्त्व अधिक आहे. पहिल्या ऋषींपैकी एक ऋषभ देव यांनी शांततेचे प्रदीर्घ व्रत मोडले आणि संगमच्या पाण्यात स्वतःला विसर्जित केले, अशी मान्यता आहे. ‘स्कायस्कॅनर’च्या म्हणण्यानुसार, २८ जानेवारीला बुकिंगची संख्या सामान्य दिवसाच्या तुलनेत ६७५ टक्क्यांनी वाढली आहे. या अहवालात असे स्पष्ट करण्यात आले आहे की, बुकिंगची संख्या गेल्या वर्षीच्या याच वेळेच्या तुलनेत १,७७६ टक्क्यांनी वाढली आहे. भारतातील विमान प्रवाशांसाठी सुटीच्या काळात अत्याधिक भाड्याची वाढ ही नेहमीच एक समस्या राहिली आहे. एका संसदीय गटाने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये सुचवले की, सरकारने विमान भाड्यातील ही अनपेक्षित वाढ रोखण्यासाठी नियमावली तयार करायला हवी.

ऑनलाइन शोधात वाद

‘स्कायस्कॅनर’च्या अहवालानुसार सुटीमध्ये पर्यटनाला जाण्याची लोकांची ओढ वाढू लागली आहे. २० जानेवारीपासून देशांतर्गत पर्यटनस्थळांच्या शोधार्थींच्या संख्येत वाढ झाली. विशेषत: वाढलेली संख्या वाराणसीलगतच्या विमानतळांच्या शोधार्थींची आहे. हैदराबाद-प्रयागराज, पुणे-प्रयागराज व प्रयागराज-मुंबई या विमान प्रवासाच्या शोधातही वाढ झाली आहे. १३ जानेवारी, १४ जानेवारी, २९ जानेवारी, ३ फेब्रुवारी, १२ फेब्रुवारी, २६ फेब्रुवारी या पवित्र स्नानांच्या महत्त्वाच्या तारखा आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने विमान प्रवासांच्या शोध घेण्यात वाढ झाली आहे. मुख्य म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या शोधातही वाढ झाली आहे. प्रयागराज प्रवासासाठी सर्वाधिक शोध घेणाऱ्या पाच विदेशी शहरांमध्ये दुबई, लंडन, अबू धाबी, सिंगापूर व दोहा यांचा समावेश आहे. प्रोसेसिंग प्लॅटफॉर्म ‘Atlys’ने प्रामुख्याने अमेरिका आणि ब्रिटनमधील पर्यटकांच्या व्हिसा अर्जांमध्ये वाढ नोंदवली आहे.

सरकार काय निर्णय घेणार?

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या म्हणण्यानुसार, या वर्षीच्या महाकुंभ मेळ्यादरम्यान विमान प्रवासभाड्यांमध्ये नाट्यमयरीत्या वाढ झाली आहे. केंद्रीय विमान वाहतूक सचिव वुमलुन्मंग वुलनम यांनी सोमवारी एअरलाइन्सबरोबर तातडीची बैठक घेण्यास सांगितले. सरकारने विमान कंपन्यांना सर्व किमतींनुसार विकल्या गेलेल्या तिकिटांची संख्या स्पष्ट करण्यास सांगितले आहे. याआधी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी सातत्याने वाढणाऱ्या विमान प्रवासभाड्याच्या दरांची तपासणी करण्याचे आश्वासन दिले होते. “मला खरोखरच या समस्येचा आणि देशातील लोकांसाठी हा प्रवास अधिक सुलभ कसा करायचा याबाबत विचार करायचा आहे,” असे नायडू म्हणाले होते. जानेवारीमध्ये नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने प्रयागराज कनेक्टिव्हिटी भारतभरातून १३२ उड्डाणांपर्यंत वाढविण्यासाठी ८१ अतिरिक्त उड्डाणे मंजूर केली.

“आम्ही केवळ भारतातूनच नाही, तर परदेशस्थ भारतीय आणि परदेशी लोकांमध्येही महाकुंभ मेळ्यासाठी प्रचंड उत्साह पाहत आहोत. पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त असल्याने विमान प्रवासभाडे वाढले आहे. एवढ्या प्रवाशांच्या राहण्याची सोय होणेही कठीण आहे,” असे ट्रॅव्हल एजंट फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष अनिल कलसी यांनी ‘मनीकंट्रोल’ला सांगितले.

हेही वाचा : ट्रम्प यांच्या ताफ्यात भारतीयांचे वर्चस्व; कोण आहेत महत्त्वाच्या पदी नियुक्ती झालेले कुश देसाई?

महाकुंभात कोट्यवधी भाविक

महाकुंभ मेळ्याला देशांतर्गत आणि इतर देशांतूनही भाविक येत आहेत. प्रवासाच्या वाढत्या खर्चामुळे सर्व यात्रेकरूंसाठी प्रवेशयोग्यतेची हमी देण्यासाठी अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. १३ जानेवारीला महाकुंभ मेळ्याची सुरुवात झाल्यापासून सुमारे १२ कोटी भाविकांनी या महाकुंभ मेळ्यामध्ये आपली उपस्थिती दर्शवली आहे. उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केलेल्या सर्वांत अलीकडील अधिकृत आकडेवारीनुसार, रविवारी दुपारपर्यंत १.१७ कोटी लोकांनी त्रिवेणी संगमात स्नान केले आहे.