प्रयागराजमध्ये १३ जानेवारीपासून महाकुंभ मेळा सुरू झाला असून, २६ फेब्रुवारीपर्यंत हा मेळा चालणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाकुंभात साधू आणि भक्तांची मोठी गर्दी झाली असल्याचे चित्र आहे. धार्मिक श्रद्धा आणि परंपरेचे प्रतीक असणाऱ्या या मेळ्यात लाखो लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यासाठी येतात. महाकुंभाचा दुसरा दिवस आणि पहिले अमृतस्नान १४ जानेवारीला मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर झाले आहे. अमृतस्नानाला शाही स्नानदेखील म्हटले जाते. महाकुंभ सुरू झाल्यानंतर नदीमध्ये स्नान करण्याचा पहिला मान साधूंना असतो. सर्वांत आधी श्री पंचायती आखाडा महानिर्वाणी आणि श्री शंभू पंचायती अटल आखाड्यातील साधू यांनी अमृतस्नान केले, असे वृत्त ‘पीटीआय’ने दिले.
महाकुंभात १३ आखाडे सहभागी होत आहेत. साधूंच्या स्नानानंतर हजारो भक्तांनी प्रयागराज येथे असणाऱ्या संगमात (गंगा, यमुना व पौराणिक सरस्वतीचा संगम) स्नान केले. अमृतस्नान किंवा शाही स्नान म्हणजे काय? मकर संक्रांतीचे महत्त्व काय? महाकुंभात स्नान करण्यासाठी इतर कोणत्या शुभ तारखा आहेत? मकर संक्रांतीच्या दिवशीच याचे आयोजन का केले जाते? त्याविषयी जाणून घेऊ.
हेही वाचा : कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव कसा असतो?
अमृतस्नान म्हणजे काय?
कुंभ मेळा दर १२ वर्षांनी प्रयागराज, हरिद्वार, नाशिक-त्र्यंबकेश्वर व उज्जैन येथे नदीकाठी भरतो. या नद्या म्हणजे प्रयागराजमधील तीन नद्यांचा संगम (गंगा, यमुना व पौराणिक सरस्वतीचा संगम), गंगा, गोदावरीव क्षिप्रा. कुंभ काळात या नद्यांमध्ये स्नान केल्याने पापे धुतली जातात, असा लोकांचा समज आहे. परंतु, कुंभ कालावधीतील काही तारखा ग्रह, सूर्य व चंद्र यांच्या संरेखनानुसार विशेष शुभ असतात. कुंभ मेळ्यात शेकडो साधू त्यांच्या आखाड्यांचा किंवा गटांचा भाग म्हणून हजेरी लावतात. हा धार्मिक प्रसंग असल्याने, साधू सर्वांत आधी स्नान करतात. या विधी स्नानाला पारंपरिकपणे शाही स्नान, असे म्हटले जाते. मात्र, यंदापासून या स्नानाला अमृतस्नान म्हटले जात आहे. या स्नानाकडे हिंदू धार्मिक श्रद्धांनुसार पाहिले जात आहे, कारण- असे मानले जाते की, ज्या चार ठिकाणी अमृत किंवा अमरत्वाचे अमृत, समुद्रमंथनानंतर सांडले गेले, त्या ठिकाणी कुंभ मेळा साजरा केला जातो.
मकर संक्रांत म्हणजे काय?
१४ जानेवारी हा मकर संक्रांतीचा दिवस आहे, ज्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो तेव्हा त्याला संक्रांत म्हणतात; पण मकर संक्रांत विशेष असते. कारण- हे दक्षिणेकडून उत्तरेकडे सूर्याची हालचाल दर्शवते. हिवाळा संपला आहे आणि उष्णता, सूर्यप्रकाशाच्या दिवसांची ही सुरुवात असल्याचे दर्शवले जाते. “मकर संक्रांतीसह सूर्य उत्तरेकडे सरकत आहे आणि अशा प्रकारे उत्तरायण कालावधी सुरू झाला आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार हा काळ देवांचा दिवस आहे. अशा प्रकारे हे उत्सव साजरा करण्याचे एक कारण आहे. सहा महिन्यांनंतर सूर्य दक्षिणायन (दक्षिणेकडे) अवस्थेत असेल, जी देवांची रात्र असेल. तसेच, सूर्य आता धनू राशीतून निघून गेला आहे. हा ३० दिवसांचा कालावधी असतो; ज्यामध्ये शुभ कार्ये केली जात नाहीत,” भारतीय ज्योतिष अध्यात्माचे अध्यक्ष डॉ. रमेश कुमार उपाध्याय म्हणाले.
उपाध्याय यांनी स्पष्ट केले की, मकर संक्रांतीचे दुसरे कारण म्हणजे मकर राशीचा स्वामी सूर्याचा पुत्र शनी आहे. “बऱ्याच हिंदू श्रद्धा आणि विधी कुटुंब व प्रियजनांना केंद्रस्थानी ठेवतात. सूर्य आपल्या मुलाच्या घरी जात असल्याने, ते उत्सव साजरा करण्याचे एक कारण आहे. मकर संक्रांती किती महत्त्वाची आहे याचे एक द्योतक हे आहे की, महाभारतातील भीष्म पितामह आपल्या मृत्यूची वेळ निवडू शकत होते आणि त्यांनी आपल्या मृत्यूसाठी उत्तरायण हा काळ निवडला.” असे उपाध्याय यांनी सांगितले. मकर संक्रांती हा कापणीचादेखील सण आहे, जो या वेळी देशाच्या इतर भागांमध्ये साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी नदीत स्नान केल्याने आध्यात्मिक पुण्य प्राप्त होते, असे मानले जाते आणि जर ते कुंभाशी जुळले, तर त्याचे फायदे अनेक पटींनी वाढतात, अशीही मान्यता आहे.
हेही वाचा : लॉस एंजेलिसमध्ये आग विझवण्यासाठी ‘पिंक पावडर’चा वापर कसा केला? पर्यावरणासाठी हे किती घातक?
यावेळी कुंभातील इतर महत्त्वाच्या स्नानाच्या तारखा कोणत्या आहेत?
१४ जानेवारीच्या मकर संक्रांतीनंतर २९ जानेवारीला मौनी अमावस्या आणि ३ फेब्रुवारीला वसंत पंचमी आहे. कुंभ मेळ्याच्या शेवटच्या दिवशी २६ फेब्रुवारीला येणारी शिवरात्रीही महत्त्वाची तारीख आहे. महाकुंभातील अमृतस्नानाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व खूप आहे. या काळात ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार नद्यांचे पाणी अमृतासारखे झालेले असते. त्यामुळे याला मोक्षप्राप्तीचा प्रमुख मार्गदेखील मानला जातो. आखाड्यांचे साधू-महंत संगमाच्या काठावर पोहोचून अमृतस्नान करतात. त्यांचे आगमन भाविकांसाठी खूप प्रेरणादायी असते. कुंभ मेळा हा दर तीन वर्षांनी असतो, महाकुंभ मेळा दर १२ वर्षांनी असतो आणि महाकुंभ मेळा सर्वांत पवित्र मानला जातो. कुंभ मेळ्याचे चार प्रकार आहेत. पूर्ण कुंभ, अर्ध कुंभ, कुंभ मेळा व महा (महान) कुंभमेळा.