Dr. Babasaheb Ambedkar ६ डिसेंबर हा दिवस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणून पाळला जातो. ‘परिनिर्वाण’चा अर्थ मृत्यूनंतरचे ‘निर्वाण’ किंवा जीवन- मृत्यूच्या चक्रातून मुक्तता असा घेतला जातो. “मी हिंदू म्हणून मरणार नाही” ही घोषणा प्रत्यक्षात आणून बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर दोन महिन्यांपेक्षाही कमी कालावधीतच डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी निर्वाण झाले. आज बाबासाहेब प्रत्यक्षात नसले तरी त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारा वर्ग संख्येने वाढतो आहे. विचारांच्या पातळीवर जगभरात नेहमीच कार्ल मार्क्स याला पुरोगामी मानले जाते, मात्र बाबासाहेबांनी गौतम बुद्धांना त्याहीपेक्षा श्रेष्ठ मानले. आज बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने  त्यांच्या विचारांचा वारसा समजून घेण्याचा हा प्रयत्न.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुद्धाचा मार्ग मार्क्सवादी तत्त्वज्ञानापेक्षा श्रेष्ठ का?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्वत्तेची ख्याती जगशृत आहे. केवळ अर्थार्जनासाठी बाबासाहेबांनी ज्ञानाची कास पकडली नाही; तर ज्ञान आणि जीवन यांची प्रत्येक टप्प्यात त्यांनी घातलेली सांगड उल्लेखनीय आहे. मग त्या बाबी धार्मिक का असेना, त्या प्रत्येक पैलूचा अभ्यास करूनच डॉ. बाबासाहेबांनी निर्णय घेतल्याचे स्पष्ट आहे. किंबहुना या गोष्टी त्यांच्या लिखाणातूनही वारंवार समोर येतात. अशाच त्यांच्या सुस्पष्ट आणि पद्धतशीर शैलीत लिहिलेल्या एका निबंधात, बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची तुलना मार्क्सवादाशी केली आहे, त्यांच्यातील समानता आणि फरक सूचीबद्ध केले आहेत.

बाबासाहेबांनी प्रमुख धर्मांवर कठोर टीका केल्यामुळे, अनेकदा ते धर्मांच्या विरोधात होते असे समजले जाते, परंतु वस्तुतः सार्वजनिक जीवनात धर्माचे आणि अध्यात्माचे महत्त्व किती आहे याबद्दल बाबासाहेब अतिशय जागरूक होते. बौद्ध धर्म इतर धर्मांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे त्यांचे मत सुप्रसिद्धच होते, किंबहुना बाबासाहेबांनी बुद्धाचा मार्ग मार्क्सवादी तत्त्वज्ञानापेक्षा श्रेष्ठ मानला. आपल्या निबंधात त्यांनी बौद्ध धर्माची तुलना मार्क्सवादाशी केली आहे, त्यांनी नमूद केल्याप्रमाणे दोन्ही तत्त्वज्ञाने न्यायी आणि आनंदी समाजासाठी समान प्रयत्न करीत असली तरी, बुद्धाने सांगितलेली साधने आणि मार्ग मार्क्सच्या तुलनेत श्रेष्ठ आहेत.

अधिक वाचा: बुद्ध पौर्णिमा २०२३- भारतात सर्वाधिक बौद्ध लेणी का आढळतात?

डॉ. आंबेडकर पुढे लिहितात, यावर मार्क्‍सवादी सहज हसतील तसेच मार्क्‍स आणि बुद्ध यांना समान पातळीवर वागवण्याच्या कल्पनेची खिल्लीही उडवू शकतात. मार्क्स इतका आधुनिक आणि बुद्ध इतका प्राचीन! मार्क्सवादी म्हणू शकतात की बुद्ध त्यांच्या गुरूच्या तुलनेत फक्त आदिम असावा (इतकेच काय ते त्याचे महत्त्व)…. जर मार्क्सवाद्यांनी त्यांचे पूर्वग्रह मागे ठेवले आणि बुद्धाचा अभ्यास केला आणि समजून घेतले तो कशासाठी उभा होता तर मला खात्री आहे की ते त्यांचा दृष्टिकोन बदलतील.”

बुद्ध आणि मार्क्स नेमकी समानता कुठे?

बौद्ध धर्म आणि मार्क्सवाद यांच्यातील समानता दर्शविताना, बाबासाहेब प्रथम दोन्हीच्या मूलभूत तत्त्वज्ञानाविषयी मुद्देसूद सविस्तर मांडणी करतात.

त्यांनी बौद्ध धर्मासाठी, २५ मुद्द्यांची यादी केली आहे. बौद्ध तत्त्वज्ञानानुसार, “धर्माचे कार्य हे जगाची पुनर्रचना करणे आणि जग आनंदी करणे आहे, त्याचे मूळ किंवा त्याचा शेवट स्पष्ट करणे नाही; मालमत्तेची मालकी एका विशिष्ट वर्गाकडे सत्ता प्रदान करते, तर दुसऱ्या वर्गाच्या वाट्याला दुःख येते. समाजाच्या भल्यासाठी या दुःखाचे कारण नष्ट करणे गरजेचे आहे. तसेच सर्व मानव समान आहेत.” तर दुसऱ्याबाजूला मार्क्सबद्दल, लिहिताना डॉ. आंबेडकर नमूद करतात, मार्क्सच्या तत्त्वज्ञानानुसार, जे काही शिल्लक आहे ते “अग्नीचे अवशेष आहे, लहान परंतु तरीही खूप महत्वाचे आहे.” हे अवशेष त्यांनी चार मुद्द्यांमध्ये सारांशित केले आहेत, ज्यात, “तत्त्वज्ञानाचे कार्य जगाची पुनर्रचना करणे आहे आणि जगाच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण करण्यात आपला वेळ वाया घालवू नये; मालमत्तेची मालकी एका वर्गाकडे सत्ता देत असल्याने, शोषणातून दुसऱ्या वर्गाच्या पदरी दु:ख येते; समाजाच्या भल्यासाठी खाजगी मालमत्तेच्या निर्मूलनाने दु:ख दूर करणे आवश्यक आहे.” एकूणच दोन्ही तत्त्वज्ञानांचा जोर समानतेवर आणि दुःख निर्मूलनावर आहे. 

बुद्ध आणि मार्क्स यांच्या तत्त्वज्ञानात नेमका फरक काय? 

डॉ. आंबेडकर म्हणतात, बौद्ध धर्माची खासगी मालमत्ता नष्ट करण्याची वचनबद्धता त्यांच्या ‘भिक्खूंनी’ सर्व सांसारिक वस्तूंचा त्याग कसा केला यावरून स्पष्ट होते. ते लिहितात, भिक्खूंच्या मालकीचे किंवा संपत्तीचे नियम “रशियातील कम्युनिझमपेक्षा कितीतरी अधिक कठोर आहेत.’ आनंदी आणि न्याय्य समाज स्थापन करण्यासाठी बुद्धाने आस्तिकांसाठी एक मार्ग सांगितला होता. बाबासाहेब लिहितात, “बुद्धाने स्वीकारलेला मार्ग म्हणजे ‘मनुष्याने नैतिकतेच्या आधारावर स्वभाव बदलून स्वेच्छेने आनंदी आणि न्याय्य समाज स्थापन करण्यासाठी मार्ग स्वीकारणे. कम्युनिस्टांनी स्वीकारलेले मार्गही तितकाच स्पष्ट, लहान आणि वेगवान आहे. यात हिंसा आणि सर्वहारा वर्गाची हुकूमशाही समाविष्ट आहे. बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांच्यात काय समानता आणि फरक आहेत हे यातच स्पष्ट होते. मूलतः हा फरक मार्गांबद्दलचा आहे.

बुद्ध हा लोकशाहीवादीच! 

भारताच्या राज्यघटनेची प्रेरक शक्तीदेखील बुद्ध हा लोकशाहीवादी होता असेच म्हणते, असे बाबासाहेब लिहितात. “बुद्धाला हुकूमशाही मान्य नव्हती. तो लोकशाहीवादी जन्माला आला आणि तो लोकशाहीतच जगला, आणि निर्वाणही लोकशाहीतच झाले,” असे आंबेडकर लिहितात.

अधिक वाचा: विश्लेषण: बुद्ध पौर्णिमा २०२३- बुद्धमूर्तीमुळे प्रकाशात आले पहिल्या शतकातील प्राचीन जागतिकीकरण !

धर्माचे महत्त्व

डॉ. आंबेडकर लिहितात, कालांतराने कम्युनिस्ट राज्य कोमेजून जाईल असा दावा केला जातो, परंतु ते कधी होईल आणि त्या राज्याची जागा कोण घेईल याचे उत्तर कोणी देत नाहीत. “स्वतः कम्युनिस्ट कबूल करतात की त्यांच्या राज्याचा सिद्धांत हा हुकूमशाहीवर आधारित आहे, आणि तोच त्यांच्या राजकीय तत्वज्ञानातील कमकुवतपणा आहे. 

कम्युनिस्ट राज्याची जागा काय-कोण घेते हे महत्त्वाचे आहे, जर शेवटी अराजकता असेल तर कम्युनिस्ट राज्याची उभारणी हा एक निरुपयोगी प्रयत्न ठरेल. “जबरदस्तीशिवाय राज्य टिकवता येत नसेल आणि त्याचा परिणाम अराजकतेत झाला तर कम्युनिस्ट राज्यात काय चांगले आहे?. सक्ती मागे घेतल्यावर ती टिकवून ठेवणारी एकमेव गोष्ट म्हणजे धर्म. पण कम्युनिस्टांसाठी धर्म हा अनादराचा विषय आहे. त्यांच्यात धर्माचा द्वेष इतका खोलवर बसला आहे की ते साम्यवादाला मदत करणारे धर्म आणि मदत न करणारे धर्म यांच्यातही ते भेदभावही करणार नाहीत,” असेही डॉ. आंबेडकर लिहितात.

‘साम्यवाद टिकवून ठेवण्यासाठी बौद्ध धर्मच अंतिम पर्याय’

डॉ. आंबेडकर हे बौद्ध आणि ख्रिश्चन धर्मातील फरकही स्पष्ट करतात, ते लिहितात सर्वसाधारण कम्युनिस्ट धर्माचा द्वेष करताना दावा करतात की या जगात असलेल्या दारिद्र्य आणि दुःखाचे धर्माद्वारे उदात्तीकरण केले जाते, लोकांना परलोकाची स्वप्ने दाखवली जातात, परंतु हे दोष बुद्धाच्या बौद्ध धर्मात नाहीत. ते ख्रिश्चन धर्मात असल्याचेही ते नमूद करतात.  आंबेडकर म्हणतात की, बौद्ध धर्म या जगात आनंदी राहण्यासाठी आणि कायदेशीर मार्गाने संपत्ती कमाविण्याविषयी सांगतो. “सक्ती मागे घेतल्यावर साम्यवाद टिकवून ठेवण्यासाठी रशियन लोक बौद्ध धर्माकडे लक्ष देत आहेत असे वाटत नाही… ते हे विसरतात, सर्वात आधी बुद्धाने साम्यवादाची स्थापना केली कारण संघ हा हुकूमशाहीशिवाय होता.

लेनिनही अपयशी…

कदाचित त्या काळाच्या तुलनेत बुद्धाचा साम्यवाद लहान स्वरूपात असेल परंतु हुकूमशाहीशिवाय असलेल्या त्या साम्यवादाने चमत्कार घडवून आणला जे करण्यात करण्यात लेनिनही अयशस्वी ठरला  …बुद्धाची पद्धत ही माणसाचे मन बदलण्याची होती, त्याच्या स्वभावात बदल घडवून आणणे, जेणेकरून माणूस जे काही करतो, त्यात बळाचा किंवा सक्तीचा वापर न करता ते स्वेच्छेने करतो,” असे आंबेडकर लिहितात. 

ते पुढे म्हणतात की “रशियातील कम्युनिस्ट हुकूमशाहीला अद्भुत यश मिळाले आहे”, परंतु या समानतेला बंधुत्व किंवा स्वातंत्र्याशिवाय काहीच अर्थ नाही” समानता, बंधुता, आणि स्वातंत्र्य केवळ बुद्धाच्या मार्गाने एकत्र नांदू शकतात. साम्यवाद यातील एकच गोष्ट देऊ शकते. बाबासाहेबांनी मांडलेले हे विचार आज एकविसाव्या शतकातही तेवढेच खरे आणि पटणारे आहेत!

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahaparinirvana day 2023 why did babasaheb ambedkar consider gautama buddhas path superior to marxist philosophy svs
Show comments